Friday, 9 October 2020

पैचान कौन!

 तसं पाहिलं तर झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत. एखादया झाडाची ओळख पटली नाही की त्याच्या पानाफुलांची, खोडाची, फांद्यांची निरीक्षणं लिहून काढायची, फोटो काढायचे, पुस्तकं आणि वेबसाईटी धुंडाळून त्याची ओळख शोधायची, आणि नाहीच जमलं तर आमच्या वनस्पतीतज्ञ मित्रमैत्रिणींकडे, गुरूंकडे धाव घ्यायची यातून आम्ही टेकडीवरचं वानसवैविध्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. टेकडी वाचणं, समजुन घेणं आणि त्यातून शिकणं हा फार म्हणजे फारच मजेचा आणि आनंदाचा उद्योग आहे. प्रत्येक टेकडीभेट आमच्या ओंजळीत एकतरी साक्षात्काराचा क्षण टाकत असते :)

’झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत’ हा साक्षात्कार आम्हाला घडवला तो टेकडीवर मुबलक आढळणा-या, पण बरेच दिवस ओळखीची एकही खूण न दाखवणा-या एका झाडाने. दरवेळी आम्ही त्याच्यापाशी जायचो, पानाचे फोटो काढायचो, वर्णनं लिहायचो - पाने साधी आहेत, एकांतरीत आहेत, देठापाशी गोलाकार आणि टोकाला रुंद आहेत, पानांच्या खालच्या बाजूस मऊ लव, मध्यशीर फुगीर आणि लालसर, देठही लालसर, खोडाची साल सुटी होऊन खोडावर पांढरट चट्टे दिसत आहेत, खोड पेरूसारखे आहे, पानांना कसलाही वास नाही...अशी सगळ्या प्रकारची वर्णनं लिहून झाली. गूगल लेन्स वापरून शोध घेतला, महाजन सरांच्या पुस्तकात शोधलं. (शेवटी कुकसाहेबांच्या पुस्तकातही शोधायचा प्रयत्न केला - पण त्यात कसं शोधावं तेच कळेना :D ). खोडाची साल निघते आहे, तर सालईचा भाऊबंद असेल का अशा (अडाणी) शंकेने एकदा त्याच्या खोडावर सापडलेला डिंक आणि सालही जाळून पाहिली - नाकपुड्या फुलवत काही सुगंध वगैरे येतोय का ते पाहिलं - पण नुसताच जळका वास.    


ज्ञानेश्वरीत म्हणलं आहे, "तरी जाणिजे झाड फुलें। का मानस जाणिजे बोलें॥" - फुलांवरून झाडाची ओळख होते आणि बोलण्यावरून अंतरंगाची. वनस्पतीशास्त्रातही, वनस्पतीचं कुळ (Family) हे त्याच्या फुलाच्या रचनेवरून ठरतं. (सारख्या रचनेची फुलं येणारे वृक्ष, वेली, झुडुपं एकाच कुळातली असतात.) हे झाड काही अद्याप फुलायला तयार नव्हतं आणि आपली ओळख द्यायला तयार नव्हतं. 

मग सप्टेंबर मध्ये, फुलपाखराचे फोटो काढण्याचे अयशस्वी प्रयत्न चालू असताना, रुपालीने थोड्या अंतरावरचं एक बहरलेलं झाड दाखवलं. कमरेपर्यंत वाढलेलं गवत तुडवत आम्ही झाडाजवळ पोचलो. सोनसळी रंगाच्या बारीक बारीक फुलांचे झुपके प्रत्येक पानाच्या बेचक्यातुन फुलले होते. पाकळ्या नसलेल्या छोट्या फुलांचे आणि कळ्यांचे गेंद, आणि नुकतीच आलेली हिरव्या रंगाची पंखवाली फळं.  ..भराभर फायली ओपन झाल्या..आणि साक्षात्कार झाला - हा तर धावडा!  कॉम्ब्रेटेसी.. अर्जुन-आईनाच्या कुळातलं झाड..पंखवाल्या बिया! मग पानांकडे लक्ष गेलं...तर दुसरा साक्षात्कार झाला - इतके दिवस जे झाड आपल्याला ओळख देण्यासाठी झुलवतंय, ते हेच लालसर देठांच्या पानांचं झाड! ...तरी जाणिजे झाड फुलें!! 

महाजन सरांच्या पुस्तकात तीन प्रकारच्या धावड्यांची माहिती आहे - धावडा (Anogeissus latifolia), महाधावडा (Anogeissus acuminata) आणि रेशम धावडा (Anogeissus sericea). टेकडीवर आढळतो तो Anogeissus latifolia- रुंद पानांचा धावडा! हा पुण्यातल्या सगळ्याच टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात आढळतो. याचा डिंक गमघट्टी किंवा घाटी गम म्हणुन ओळखला जातो. डिंकाचे अनेक उपयोग आहेत - विशेषतः कापड उद्योगात आणि स्फोटकांच्या उद्योगात बाईंडर म्हणून. अनेक पेयांमध्ये हा डिंक emulsifier आणि stabilizer म्हणून वापरला जातो. तसेच पॉलिमर आणि पेट्रोलियअम उद्योगातही. बाभळीच्या डिंकासारखाच हा डिंकही खाद्य पदार्थात वापरला जातो. राणी बंग लिखित ’गोईण’ मधे याच्या सालीचे, डिंकाचे, बुंध्याचे पारंपरिक उपयोग दिलेले आहेत. यातल्याच एका लोकगीतात, लक्ष्मणाने सीतेला वनात सोडल्यावर त्या निबीड वनाचे वर्णन करताना ’येन-धावडे स्वर्गाला जाती - ससे खोडाशी दडती’ अशा ओळी आहेत. त्या लोकगीतातला, स्वर्गाची उंची गाठणारा धावडा काही इथल्या परिसरात अद्याप आढळला नाही. इथली सगळी धावडे मंडळी बेताच्या उंचीची आहेत.     

धावड्याला बंगालात चकवा म्हणतात. आम्हालाही याने ’पैचान कौन’ म्हणत इतके दिवस चांगलंच चकवलं होतं. आम्हाला हसायला आलं ... धावडाही पानापानांत फुललेल्या फुलाफुलातुन हसत उभा होता!  
- अश्विनी केळकर
------------------------------------------
धावडा : Anogeissus latifolia
Family: Combretaceae 
इतर नावे: Button tree, Indian gum tree, धौया, धौरा, इंद्रवृक्ष, धवल, धुरंधर. 
फुलांचे, पानांचे आणि खोडाचे वर्णन वर दिलेले आहेच. 
फळे: पिवळसर तपकिरी, पंखवाली फळे फुलांसारखीच एका झुपक्यात दाटीवाटीने असतात.








Friday, 2 October 2020

एल्गाराचा देत इशारा ..

एल्गाराचा देत इशारा..

आमच्या टेकडीवर एक पळस आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये तो फुलतो आणि कायच्या काय सुंदर दिसतो. त्या दिवशी पळसाचे पूर्ण चित्र मिळावे म्हणून जरा लांब उभे राहिले, पण पळस काही कॅमेऱ्यात मावेना. डोळ्याशी कॅमेरा लावून मी अजून थोडं, अजून थोडं करीत पाठीमागे चालायला लागले. एकदाचा मिळाला छान.



पण हे काय, कपड्यात, केसात पकडून कुणीतरी मागे खेचतंय, हा एवढा काटेरी विळखा . . ही वेल आहे की झुडुप? बाभुळ म्हणावे की नाही? किती हा आडदांडपणा . . कायच्या काय चिडले मी. ही वनस्पती एका शेतवजा जागेच्या बांधावर हात पाय पसरून उभी होती. स्वतःला कसंबसं सोडवत मी त्यातून बाहेर पडले. खोडाला काटे, पानात काटे . . तिच्या अंगभर फक्त लालसर जांभळे काटे . . किती तिखट असावं एखाद्याने! आणि उन्हाळ्यातही हिरवी पाने! . . कायच्या काय होतं हे! . . तिचा आवेश पाहून, बांध  ओलांडून पलीकडे जाणं माणसालाच काय गुरांनाही या जन्मी शक्य नाही हे लक्षात आलं. वाघही हिला बघून परत फिरत असावा की काय म्हणून हीच नाव tiger stopper असंही सापडलं.



तिच्या आजूबाजूला तिनं कुणालाही फारसं वाढू दिलं नव्हतं की फिरकू दिलं नव्हतं. तिचे उघड्या तोंडाचे खिसे/शेंगा मात्र कायमस्वरूपी लक्षात राहिल्या. शेंगांनी आपली तोंडे आकाशाच्या दिशेने उघडी ठेवली होती . . आणि आतील काळ्या लांबट बिया स्पष्ट दिसत होत्या. शेंगा कायच्या काय छान दिसत होत्या. त्या भरीव टपोऱ्या वाटत होत्या. घरी येऊन नाव शोधले तर ही ‘चिलार’, झुडुपासारखी वेल, नावातही चिली होतंच. 

मला रागच होता. नेहमी पळसाजवळून जाताना मी तिला लांबूनच तिरकस बघायचे. तिच्या जवळून जाताना काटयांकडे बघून “संतापी, रागीट” असं मनातल्या मनात म्हणायचे आणि पुढे जायचे. जसा पावसाळा जवळ येऊ लागला, तशी ती भरभरा वाढताना दिसू लागली. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पिवळ्या फुलांचे तुरे फांद्यांच्या टोकाला दिसले. मधमाशा तिच्या काट्यांना भीत नव्हत्या. 



अनेक पिवळ्या-हिरवट छोट्या घंटा एकत्र टांगल्याचा भास तिची फुले बघितल्यानंतर होई. फुले तेजस्वी आणि शांत वाटत होती. फुलल्यावर वेल देखणी, निरागस, नम्र दिसत होती.



 तिच्या पानांची, काटयांची संख्या वाढली. काटे आकडेदार किंचित खाली वळलेले . . म्हणून की काय हिला cats claw असेही नाव आहे.  खोड अजूनच बळकट व काष्ठमय दिसू लागले. तिचा अस्ताव्यस्तपणा, रांगडेपणा अजून ठळक होऊ लागला. त्या शेताच्या बांधावरील पहारेकरीच जणू ती.




टिपू सुलतानाने या झुडुपाप्रमाणे असणाऱ्या वेलीची तटबंदीकरिता मुद्दाम लागवड केली होती म्हणून त्याला म्हैसूर थॉर्न हे नाव पडले, असे म्हणतात. 

या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Biancaea decapetala

शेक्सपीयरने त्याच्या दोन नाटकात उपनायिकांना Bianca (बियांका) हे नाव दिलेलं आहे, Othello आणि Taming of the

 shrew मध्ये. Othello मध्ये बियांका ही जवळजवळ खलनायिका तर Taming of the shrew मध्ये बियांका तेजस्वी 

आणि निरागस, गोड मुलगी. हे दोन्ही गुण या वनस्पती मध्ये दिसतात.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय माहिती :

वनस्पती शास्त्रीय नाव  Biancaea decapetala

कुळ : Caesalpiniaceae

मराठी नाव : चिलार, चिल्हार, चिल्हारी, चिल्लर 

पाने : संयुक्त पाने, शिरेच्या दोन्ही बाजूस विभागलेली, साधारण २०-२२ सेमी लांब, मुख्य शिरेवरही काटे. पर्णीका आठ ते दहा जोड्यात, अंडाकृती आकाराच्या.

फुले : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिसून आली. फांदीच्या टोकास तुळशीच्या मंजिरीप्रमाणे, रंगाने पिवळसर, तेजस्वी, उलटी घंटेसारखी टांगलेली, अंदाजे दीड ते दोन सेमी परिघाची, पाकळ्या पिवळ्या काहीशा गोलाकार, केशरी पिवळी केसरदले आणि फुलाच्या बुडाशी पानासारखे उपांग.

शेंगा : आडव्या, सरळ टोकाला किंचित वाकलेल्या, तीन ते पाच काळ्या भरीव बिया. बिया वाऱ्याने किंवा धक्क्याने इतरस्त्र पडून रुजतात.

 रूपाली भोळे 

proopalee@gmail.com 


Friday, 25 September 2020

टिटिभू चांचुवरी। माप सुये सागरी॥

 कीं टिटिभू चांचुवरी। माप सुये सागरी॥मी नेणतु त्यापरी।प्रवर्ते येथ॥ (ज्ञानेश्वरी, अध्याय पहिला)

’टिटवीने (टिटिभू) जसे आपल्या चोचीने (चांचु) समुद्र मापण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे मी अल्पज्ञ गीतार्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आहे.’ 

ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायात माऊली हे टिटवीचे रूपक मांडतात. समुद्राकाठच्या घरट्यातली टिटवीची अंडी समुद्राने गिळंकृत केली, त्यावेळी टिटवीच्या जोडप्याने अंडी परत मिळवण्यासाठी समुद्राचे पाणीच उपसायला सुरूवात केली, शेवटी गरुडाने विष्णूला साकडे घालून तिची अंडी परत मिळवून दिली, या कथेचा इथे संदर्भ आहे. 

तर अशी ही आपल्या घरट्यासाठी आणि पिल्लांसाठी समुद्राशीही भांडणारी जहांबाज टिटवी. उन्हाळ्यात टेकडीवर फिरताना या टिटव्या आमच्याशीही कायम भांडणाच्याच पवित्र्यात असत. आमच्याशीच काय, पण घारी, कावळे, साळुंक्या, कोणालाही त्या सोडत नसत. टेकडीवर येणारा प्रत्येक जीव यांची अंडी आणि पिल्लं पळवायलाच येतो अशी यांची खात्रीच असे. कित्येकदा आम्ही त्यांना कावळे आणि घारींना चोची मारमारून, पाठलाग करकरून पळवून लावलेलं पाहिलं आहे. उन्हाळ्यात टेकडीवरचा माळ पिवळाधमक होतो. हिरव्या गवताची काडीही कुठे उरत नाही. सगळा माळ हिरवी स्वप्ने पहात पावसाकडे डोळे लावून बसलेला असतो, त्यावेळी त्या उजाड माळावर टिटवीचं जीवनचक्र फुलत असतं. हा त्यांचा विणीचा, पिलं मोठी होण्याचा काळ असतो. टिटव्या डोळ्यात तेल घालून आपल्या घरट्यावर लक्ष ठेवून असतात. पिलांना जगण्याचे धडे देत असतात. आम्ही माळावरून चालू लागलो की टिटव्या जिवाच्या आकांताने टिवटिवाट सुरू करीत. त्यांचा तो आकांत सुरू झाला की आपल्या जवळपास या पिवळ्याधम्म गवतात त्यांची पिल्लं कुठेतरी कडमडत असणार किंवा एखादं घरटं जवळपास असणार याचा अंदाज यायचा. पण घरटं काय, किंवा पिल्लं काय, कधीच कुणाचा पत्ता लागत नसे इतकी ती भवतालाशी एकरूप झालेली असत. आम्ही बापड्या आमच्या वाटेने मुकाट पुढे जायचो. आम्ही त्यांच्या अधिवासाबाहेर पडलो, की त्या शांत व्हायच्या. 

आमच्या मनात काही पाप नसताना या बयेने आमच्यावर सतत असा संशय घ्यावा या गोष्टीचा एक दिवस इतका राग आला, की आज यांची पिल्लं शोधून त्यांचे फोटो काढायचेच या इर्षेने आम्ही त्या गवतात पिल्लं शोधू लागलो. पण टिटव्यांच्या कडकलक्ष्मीच्या अवतारापुढे पाच मिनिटातच आम्ही हार मान्य करून परत फिरलो. 

एकदा मात्र आमची सकाळची टेकडीभेट अंमळ लांबली. आम्ही परतीला लागलो तेव्हा टेकडीवर सकाळी व्यायामासाठी येणारी मंडळीही उतरून गेली होती आणि माळ अगदी निर्मनुष्य झाला होता. एक बांध ओलांडुन आम्ही पुढे आलो तर अचानक टिटवीनं ठणठणाट सुरू केला. आजचा नूर जरा वेगळा दिसतोय असं म्हणत आम्ही पुढे चालू लागलो.... आणि बांधावर एक हलकी हालचाल जाणवली. निरखून बघितलं तर काहीच नाही. पण इथे घरटं किंवा पिल्लू नक्की असणार याची खात्रीच झाली. मग आम्ही दोन वेगळ्या दिशांना शोध घ्यायला सुरुवात केली. आता तर तिचा स्वर असा टिपेला पोचला की ती आम्हाला कचाकचा शिव्या घालतेय की काय असंच वाटू लागलं ’......मुडदा बशिवला तुमचा...गतकाळ्यांनो, तुम्हाला हीच जागा गावली व्हय.. चला व्हा म्होरं..... ’ टिटवीकडे लक्ष न देता मी शांत एका ठिकाणी उभं राहून खाली बांधावरचं गवत निरखू लागले. तर माझ्यापासून दोनच हातावर टिटवीचं पिल्लू एक पाय दुमडून आणि एक लांबवून अक्षरशः मेल्यासारखं निपचित पडून राहिलेलं दिसलं. त्याच्या आईने दिलेली धोक्याची सूचना त्याला बरोब्बर कळली होती. मी हाताने खूण करून रूपालीला बोलावलं. आम्ही जमतील तसे पटापट त्याचे फोटो घेतले आणि काढता पाय घेतला. पिल्लू अजूनही मेल्याचं बेअरिंग घेऊन पडलं होतं. आम्ही थोडं पुढे गेल्यावर ते तुडतुडत नाहीसं झालं आणि त्याच्या आईचे शिव्याशापही थांबले. आपला वंश टिकवून ठेवण्याची आणि पुढे नेण्याची टिटवीची धडपड आणि त्या पिल्लामधे वंशपरंपरेने उत्क्रांत होत आलेली जगण्याच्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवण्याची युक्ती याने आम्ही स्तिमित झालो होतो. 

या घटनेला चार महिने होऊन गेले. आता माळ हिरवागार झाला आहे. टिटवीची पिलं कर्तीसवरती होऊन मार्गाला लागली असावीत. कारण हल्ली आम्ही टिटवीच्या अधिवासातून जातो, त्यावेळी टिटवीच्या जोड्या गवतात निवांत, बिनघोर फिरत, आम्हाला बेदखल करत अळ्या किड्यांचा आस्वाद घेत असतात. 

- अश्विनी केळकर

(PC वेदात्मन केळकर)
गवतात लपलेलं टिटवीचं पिल्लू


--------------------------------------

टिटवी

Red wattled Lapwing

पक्षीशास्त्रीय नाव: Vanellus indicus 

काळा गळा, गळा व छाती काळी, डोळा आणि चोचीमधे लाल मांसल भाग, चोच लाल व टोकाला काळी. 

-------------------------------------


Saturday, 19 September 2020

टीम टीम टीम तारों के दीप जले . . .

 टीम टीम टीम तारों के दीप जले .

 टेकडी आताशा छान बहरू लागलीय, खरं म्हणजे आम्हाला वाचता येऊ लागलीय. दरवेळी चढताना झाडं तोडून पडलेल्या काटक्यांवर ठिपकेवाल्या मुनियांचा घोळका गोंधळ घालत असतो. आता रोज रोज त्यांच्या समोरून जाताना वाटतं, या ओळखत असतील का आम्हाला?

 परवा जरा पाऊस ओसरल्यावर आम्ही टेकडीकडे निघालो. पावसामुळे बऱ्याच दिवसांचा खंड पडला होता खरा. संध्याकाळच्या वेळी एखाद्या खोलीत मंद दिवा लावलेला आसावा, तसा प्रकाश पहाटे पसरलेला होता. पाय ठेवायला दगड शोधत आम्ही चिखलातून चालू लागलो.

 


चढताना टाकळा, आघाडा, आग्या, दुधाळी, अनेक प्रकारची गवतं, गिरणुळची झुडपं आता ओळखीची वाटू लागली. आमच्या उपस्थितीमुळे सतत अस्वस्थ होणारं आणि आम्हाला चकवणारं टिटवीचं जोडपं आताशा अचानक शांतपणे वावरताना दिसलं. ‘पिल्लं मोठी झाली असावीतअसा अंदाज आम्ही लावला, नी पुढे चालू लागलो.

 


चढताना नेहमी कुठल्या दिशेनं जायचं, अशी चर्चा होऊन आम्ही चालू लागतो. म्हणजे हुंबाच्या बेटाकडे की तिकडे दुरंगी बाभळीकडे की चिलारकडे की पळसाकडे? खरं सांगायचं तर, चार किंवा आठ दिशांचं बंधन टेकडीला मान्यच नाही. असंख्य दिशा, असंख्य रंग, असंख्य गंध, असंख्य वाटा अशा असंख्य असंख्य गोष्टी मिळून तयार झालेला हा नैसर्गिक अधिवास.



 अश्विनीला आज कहांडळाला भेट देण्याची मनापासून इच्छा होती. आमची पावलं आपसूक त्या वाटेकडे वळली. पण पावसाळ्यात वाटाही नटतात. आपलं रूप पालटून टाकतात.

अगं, इथेच होतं, तांबड्या कुड्याच्या डावीकडे”, अश्विनी.

छे, छे, उजवीकडे”, मी म्हणाले, “जरा अजून खाली जाऊन बघू या.”

थोडं खाली उतरलो. आभाळ खूप भरून आलं होतं. आत दाट झाडीत प्रकाश तसा कमीच होता. आम्ही दोघी अचानक थबकलो. हे काय?

एवढं लालबूंद . . .

टपोरं . . .

 आणि शिस्तीत. . .

अंधूक प्रकाशात, लाल टपोरे मोठे ठिपके . . .

ओळीने . . .

एका फिकट करड्या फांदीवर रांगोळीच्या ठिपक्यांप्रमाणे पंगतीत बसले  होते.

समोरचं हे दृश्य मला त्याकडे खेचत होतं, तर शिकाकाई तिच्या काट्यांनी मला अडवू पहात होती. धामणाच्या झाडाला अशी कशी फुलं बरं?

एव्हढा गडद रंग!

 मी काही म्हणायच्या आत अश्विनी मुरूडशेंगम्हणून धावतच सुटली.

 मुरुडशेंग अंगोपांगी फुलली होती. काही फांद्या जमिनीला टेकलेल्याही होत्या. त्या सावरायला पिळूकवेलीने तिला मदतही केली होती. साधारणतः मीटर दोन मीटर उंचीची अनेक झुडूपं टेकडीवर विसावलेली होती. एवढे दिवस पानांवरून धामणाची झाडे म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो. आज जणू मुरूडशेंगेने आम्हाला बोलवून आमच्या समोर फॅशन शोच केला.

 

ही झुडूपे मोठ्या वृक्षांच्या छायेत होती. पानांच्या बगलेत फुले आलेली होती. फुले सुरुवातीला निळ्या रंगांची आणि लाल नंतर गडद लाल होतात. झाडाखाली गडद लाल पाकळ्यांचा सडा पडलेला दिसला. फुलाचा आकार लांबट कपासारखा, केसरदलाचा दांडा हंसाच्या मानेसारखा उंच होऊन अनेक पक्षी, किटक आणि फुलपाखरांना आकर्षित करीत होता. 

मुरूडशेंग दिसली ती घरातल्या एखाद्या आजीसारखी. ज्येष्ठ, अनुभवी, पोक्त. आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांसारखी - बऱ्याच गोष्टी माहित असल्यासारखी, बरेच अनुभव पचवल्यासारखी. बरीचशी गंभीरखंबीर, काहीशी खट्याळ. तिच्या स्वतःच्या फुलांसोबतच पिळूकवेलीचीही फुले तिच्या अंगाखांद्यांवर मनसोक्त फुललेली होती.


------------------------------------------------------------------------------------------------------ 

मुरुड शेंग, Indian screw tree

शास्त्रीय नाव: Helicteres isora

पाने: साधी, एका आड एक अशी मांडणी, कडा दातेरी, किंचितशी निमुळती..

फुले: पाच पाकळ्या, पेल्याच्या आकारासारखी, गडद लाल रंगाची.

फळे: फळे ५६ सेंमी. लांब, हिरवट तपकिरी व गोलसर, मुरडल्या सारखी, वाळल्यावर तडकून बिया विखुरतात.


रूपाली भोळे, proopalee@gmail.com

Saturday, 12 September 2020

तेरा झुमका रे...

बावधनच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर हिंडताना कुठेतरी टेकडीच्या उतारावर, माळावर ती अशी आपल्याच नादात उभी असते. कसला डामडौल नाही, तामझाम नाही की सुगंधाची उधळण नाही. अगदीच साधीसुधी. हलक्या गुलाबी, पिवळ्या रंगाचे झुमके म्हणजे हिच्या शृंगाराची परीसीमा. हिच्या साधेपणातलं सौंदर्य आणि नजाकत लांबून लक्षातही येत नाही. आणि तिने ते झुमके घातलेले नसतील तर तिचं हे वेगळेपण कळूनही येत नाही.

                                         

ही दुरंगी बाभूळ. सिगमकाटी. साधीसुधी वनकन्या ही, पण हिची संस्कृत नावं फारच जड - वीरवृक्ष, बहुवारक, महाकपित्थ...! 

आमच्या टेकडीवर ही बाभूळ जिथे आहे, तिथे वेगवेगळ्या झाडांचा नुसता दाटवा झालेला आहे. त्यात बेलाची दोन-तीन झाडे आहेत, घटबोर आहे, वावळा आहे, काही वेलींच्या जाळ्या आहेत. त्यात या दोन मध्यम उंचीच्या सिगमकाट्या आपला आब सांभाळून उभ्या आहेत. मे महिन्यात त्यांनी सुरू केलेला गुलाबी-पिवळ्या झुमक्यांचा शृंगार आता कळसाला पोचला आहे. 

या झुमक्यांमध्ये दिसणारे गुलाबी आणि पिवळे केसर म्हणजे खरेतर यातले पुंकेसर. त्या केसरांच्या तळाशी छोट्या पाकळ्यांची पेल्याच्या आकाराची फुले दिसतात. त्यातही, गुलाबी तु-यातली फुले नुसतीच दिखाऊ. प्रत्यक्ष फलनाचं काम करतात ती पिवळ्या तु-यातली फुलं. फोटो झूम करून पाहिले तर पिवळ्या फुलांमधले पुंकेसरांचे गुच्छ सहजच दिसतील. कळी अवस्थेत पोपटी-गुलाबी मण्यांसारखी दिसणारी ही फुलं कोमेजतात तेव्हा गुलाबी रंग पांढरट होत जातो आणि पिवळा रंग फिकूटत जातो. फुलं सुकतात आणि वेलांटीच्या वळणावळणाच्या हिरव्यागार शेंगा त्यांची जागा घेतात. 

सध्या या झाडांवर कळ्या, फुले, सुकलेली फुले आणि शेंगा सगळंच दिसत आहे. 

हल्ली रोज पाऊस पडतो आहे. उन्हाळ्यातलं त्यांचं धूळमाखलं रूप आता पालटलं आहे. सकाळी सकाळी टेकडीवर गेलं की सकाळच्या कोवळ्या उन्हात आपल्या पानांत, काट्यांवर, फुलांमधे ओथंबलेले पावसाचे थेंब सुकवत उभ्या असलेल्या या दोघी कशा लोभस दिसतात! 

बरेचदा दुरंगी बाभळीलाच शमी (खेजडी/ सौन्दड) म्हणतात. पण दोघींच्या पानांच्या रचनेत, फुलांच्या रंगात आणि रचनेत काहीच साम्य नाही. बहुदा आकर्षक फुलांमुळे असेल, पण अनेकदा दुरंगी बाभळीचीच रोपं शमीची रोपं म्हणून खपवली जातात. सौंदड आणि दुरंगी बाभूळ भारतभर, विशेषतः कमी पावसाच्या प्रदेशात मुबलक आढळतात. आमच्या गावी दुरंगी बाभळी होत्या. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या टेकडीवर जेव्हा दुरंगी बाभूळ पाहिली, तेव्हा गावाकडची मैत्रीणच खूप वर्षांनी भेटल्यासारखं वाटलं :)  

-अश्विनी

---------------------------------------------------------

दुरंगी बाभळीची ओळख: 

वनस्पतीशास्त्रीय नाव: Dichrostachys cinererea 

(डाय-क्रो-स्टॅकिस म्हणजे दोन रंगांचे तुरे आणि सायनेनेरिया म्हणजे राखाडी रंगाचे (खोड))

कुळ (family): Mimosaceae

पाने: Bipinnately compound. मुख्य शिरेवर फुटलेल्या पाच ते दहा उपशिरा आणि प्रत्येक उपशिरेवर पर्णिकांच्या पंधरा ते वीस जोड्या. पण सगळा ऐवज मिळून एका साधारण ४ ते ८ सेमी इतकाच पसारा. पाने फुटतात त्याच बेचक्यातून कळ्यांचे तुरेही फुटतात आणि टोकदार सरळ काटेही. 

इतर नावे: सिगमकाटी, वीरवृक्ष, बहुवारक, महाकपित्थ, वीरतरू, गोया खैर, दीर्घमूल. 


            










Friday, 4 September 2020

लालोलाल मेरा रंग....

 

लालोलाल मेरा रंग...

आमची टेकडी म्हणजे एखाद्या जादुगाराच्या पोतडीसारखी आहे. दरवेळी काहीतरी नव्या, अनपेक्षित आणि सुखद जादूचा अनुभव आम्हाला मिळत असतो. समोरच्या भागातून टेकडीवर चढून गेलो की मोठ्ठा सपाट भाग लागतो, तो ओलांडून उजवीकडे चालत चालत गेलो की टेकडीवरच्या नवनवीन आणि अद्भूत वनस्पती अक्षरशः गुंगवून टाकतात. उजवीकडे नाहीच वळलो, तर समोर एक खोलगट दरीसारखा भाग दिसतो. त्यात इतस्ततः पडलेले दगड आणि आडदांड माजलेली अजून काही झाडं, वेली. उजवीकडे वळताना नेहमी वाटायचं एकदा केव्हातरी खाली जाऊन बघू या. थोडं खाली उतरलो तर दगडांमध्ये टेंबुरणी, हेनकळ, बुच पांगारा आणि फणशीची, अशी अनेक झाडं गवतासकट दाटीदाटीने  होती.



आणि एका फणशीच्या झाडाला टेकून एक वेल उभी होती. गंमतच वाटली मला. हे फणशीचं झाडं असं वेलीसारखं कसं? मला लवकर फरक कळला नाही. खाली पाहिलं, तर असं लाललाल डोळ्यांनी माझ्याकडे कुणीतरी बघताय असंच वाटलं. ते डोळे चमकत होते. थोडी भितीच वाटली. म्हटलं हे असे कसे किटक? पण नाही, त्या गुंजा होत्या. लाल लाल चमकणारा रंग आणि त्यावर शोभून दिसणारा काळा ठिपका.  म्हणजे ही वेल गुंजेची असावी. हे लक्षात आल्यावर सगळ्यात आधी थोडासा पाला तोंडात टाकला. आधी थोडासा खाऊन पाहिला, मग अजून खाल्ला, बकाबका. लहानपणी खाल्ला होता एवढा ताजा गुंजपाला, तो आता कितीतरी वर्षांनी मिळाला. लहानपणी पहूरला रहायचे, तेव्हा मळ्याच्या बांधावर होत्या गुंजेच्या वेली. तेव्हा खाल्ला होता, तो आता परत खाल्ला आणि तहान भागवून तृप्त झाले.



मे महिन्याच्या शेवटी, काही शेंगांमध्ये बिया होत्या, बऱ्याचशा खाली इकडे-तिकडे सांडलेल्या होत्या. खूपच गंमत वाटली. बराच वेळ थांबले मग मी तिथे, वेलीचं निरिक्षण करत. वेल साधारण आठ-दहा फुटांपर्यंत वाढलेली होती आणि खोड किंचित पांढुरकं वाटलं. मग टेकडीवर गेलो, की एकदा गुंजेचा वेल बघून यायचा, हा दिनक्रमच ठरला जणू.



ऑगस्ट महिन्यात पाऊस सुरु झाल्यावर गुंजेकडे गेलो. वेलीला नवीन बारीक फांद्या फुटलेल्या दिसत होत्या. खूप कोवळी पानं आली होती. गुंज मस्त फुललेली होती. पानांच्या बगलेतून लाल गुलाबी नाजुक फुलांचे घोस दिसून आले. ही पाने संयुक्त होती तर त्यांना आठ ते पंधरा पर्णीका आढळून आल्या. वेलीच्या कोवळ्या पाननपेक्षा जून हिरव्या गडद पानांची चव गोड लागली. नखभर फुलातून मग बोटभर शेंग बाहेर येते. शेंग चपटी असते. अजून काही ठिकाणी वाळलेल्या शेंगा दिसत होत्या. शेंग वाळली की तडकते आणि तिच्यातल्या लालचुटूक बिया इतस्ततः पसरतात. वेलीच्या कडेला लाल रंगाचा चतुर शांत पणे बसलेला होता.



गंमत म्हणजे, एवढ्या मोठ्या टेकडीवर गुंजेची ही वेल अजूनतरी एकाच ठिकाणी दिसलीय. दुसरं म्हणजे, जिच्या आधारानं ती टेकून उभी होती त्या फणशीची छोटी रोपं आणि गुंजेची छोटी रोपं अग्गदी सारखी वाटत होती.



पण जेव्हा जेव्हा मी ही वेल बघायचे, तेव्हा लक्षात यायचं ते तिचं उभं रहाणं. सर्वसाधारणपणे वेली नजिकच्या झाडाला गुंढाळत वर जातात. ही टेकून उभी होती. एखाद्यानं झाडाला रेलून, आपला सगळा भार त्यावर टाकून उभं राहवं, तश्शी. काही काही वेलींकडे पाहताच त्या स्त्रिया आहेत असं वाटतं. आता तसं का वाटतं, ते काही सांगता येणार नाही. पण वाटतं, हे मात्र खरं. गुंजेला पहिल्यांदा पाहिलं आणि नंतरही जेव्हा जेव्हा पाहिलं, तेव्हा मला असंच वाटलं. ती ज्या पद्धतीनं रेलून उभी होती, त्या रचनेवरून असेल कदाचित, कदाचित तिच्या पर्णसांभारवरून, कदाचित फळांवरुन असेल. नाही माहित. गुंजेचं एक नाव रती आहे म्हणतात. कामदेवाची सखी रती - गुंज अगदी शोभून दिसते.



 गुंजेच्या बीला हिंदीत रत्ती म्हणतात, गुंजेचं वजन कायम असतं म्हणून तिला वजनाचं माप म्हणून वापरतात. रतीभर सोनं म्हणजे गुंजभर सोनं. आठ रती म्हणजे एक मासा आणि आठ माश्यांचा एक तोळा. सोनं मोजण्यासाठी गुंजेच्या बियांचा वापर करतात म्हणून गुंजेची सतत सोन्याशी तुलना होते खरी. पण नुसत्या गुंजेच्या बियांचेही ओवून दागिने करतात. गुंजेच्या लाललाल बीवर एक छोटासा काळा ठिपका असतो. कबीरानं त्याच्या एका दोह्यात ह्या बीचं वर्णन करून तिला अमर करून टाकलंय.

सोना कहे सुनारको, उंचा मेरा मोल |

काली मूहके गुंजको, मेरे संग मत तोल ||

गुंज काहे सुनारको, लालोलाल मेरा रंग |

मूह हुआ मेरा काला, जब सोना तोला मेरे संग ||

 

गुंज

शास्त्रीय नाव: Arbrus precatorius

कुळ(family) : Leguminosae

पाने संयुक्त, साधारणतः तीन ते पाच सेमी लांबीचे, एका पानाला आठ ते पंधरा पर्णीकांच्या जोड्या, पर्णीका लंब गोलाकार,

फुले फिकट गुलाबी रंगाची, फुले घोसाने आलेली आढळली. एका फुल साधारण अर्धा ते एक सेमी लांबीचे, वाल किंवा मटाराच्या फुलांप्रमणे फुले वाटली.

फळे शेंगांच्या स्वरूपात, बिया चमकणाऱ्या, लाल भडक रंगाच्या, वर काळा ठिपका असलेल्या, कठीण, गुळगुळीत, बी विषारी, ते खाल्लं जात नाही. पण काजळ करायला ते वापरतात, किंवा डोळे आले तर डोळ्याला बी लावतात. ह्या ऐकीव गोष्टी, निश्चित असं काही माहित नाही.


रूपाली भोळे, proopalee@gmail.com