Showing posts with label asperagus. Show all posts
Showing posts with label asperagus. Show all posts

Friday, 28 August 2020

घेउनी सर्वस्व माझे - एकदा बहरून जाईन

मी टेकडीवर नियमित जायला सुरुवात केली ती मे महिन्यात. टेकडीवरचा माळ पिवळा-सोनेरी होता, त्यावेळी. रुपाली मला नेहमी इथल्या शतावरीबद्दल सांगायची. पण त्यावेळी मलाच काय, पण तिलाही शतावरीचा मागमूस कुठे दिसला नाही. जून महिना सुरू होऊन एक पाऊस येऊन गेल्यावर मात्र माळाचं रूप झरझर पालटू लागलं. माळ हिरवा होऊ लागला, मृगाचे किडे दिसू लागले, शंभर पायांचे मिलीपीड्स् जागे झाले....आणि माळावरच्या एका झुडुपांच्या बेटावर नाजूक हिरवी लवलव दिसू लागली. त्या झुडुपांमधे रुपालीने शतावरी दाखवली. मुख्य खोडाला फुटलेल्या असंख्य बारीक बारीक हिरव्या फांद्या आणि पर्णकांडे (पानांसारखीच दिसणारी पण पुढे फांदीत रुपांतरीत होणारी रचना), फांदीच्या आणि पर्णकांडाच्या तळाशी एक नाजुकसा बाकदार काटा आणि प्रत्येक पेरावर छोट्या लांबुळक्या दोन तीन पानांचे गुच्छ. किती नजाकतीची मांडणी! माळावर जरा इकडेतिकडे पाहिलं, तर शतावरीची असंख्य झुडुपं दिसली. मग टेकडी उतरतानाही ती वाटेकडेला आढळू लागली. इतके दिवस कुठे लपली होती ही?

मधे दोनचार दिवस गेले. आता शतावरीच्या फांद्यांवर कळ्यांचे बारीक बारीक मणी दिसू लागले एकाच पेरावर पान आणि कळी. पानागणिक कळ्या आल्या. आता आम्ही फुलांची वाट पाहू लागलो. आणखी दोन दिवसांनी टेकडी चढताना एका ठिकाणी एका वेगळ्याच, अपरिचित सुगंधाच्या हलक्या लहरीने आम्ही थबकलो. ती जागा सोडली की तो गंध जणवायचा नाही. पुन्हा तिथे आलं की - ’हवेत अत्तर तरते गं’ असा माहौल! फुलं तर कोणत्याच झाडावर दिसत नव्हती. मग पायवाटेकडेला लक्ष गेलं, तर कडेला शतावरी अंगोपांगी फुलली होती! काय देखणा सोहळा होता तो! छोट्या झुबक्यात एकाआड एक रचनेतली सहा पाकळ्यांची पांढरीशुभ्र फुलं; त्याच्या तळातून डोकावणारे, डोक्यावर लाल गुलाबी परागकोष मिरवणारे पुंकेसर आणि मधोमध मणी ठेवल्यासारखा दिसणारा स्त्रीकेसर! पानागणिक फुलं फुलली होती आणि अशा मनमुक्त फुललेल्या त्या शतावरीवर मधमाशांची, मुंगळ्यांची झुंबड उडाली होती. वाट चढून वर माळावर गेलो तर तिथल्या शतावरीच्या झुडुपातही हाच आनंदोत्सव! सलग दोन चार दिवस आम्हीही तो आनंदोत्सव अनुभवला.



आणखी एक आठवडा मधे टाकून पुन्हा जेव्हा टेकडीवर गेलो, तेव्हा मात्र फुलांचा मागमूसही कुठे दिसेना. सगळा बहर ओसरुन आता त्या फुलांच्या  जागी फळांचे बारीक बारीक हिरवे मणी लगडले होते. जुलैच्या मध्यावर जेव्हा टेकडीवर गेलो त्यावेळी ते मणी लाल काळे झालेले दिसले. आता हे रसाळ काळे मणी पक्षी खातील, काही नुसतेच गळून जातील आणि आतलं बी पुन्हा नव्याने रुजण्यासाठी मातीत झोपून जाईल. हिवाळा उन्हाळ्याचं चक्र चालू राहील आणि शतावरी पुन्हा अज्ञातवासात जाईल- पुढच्या पावसाळ्यात पुन्हा सर्वस्व उधळत बहरण्यासाठी. 


--------------------------------------
शतावरी
टेकडीवर आढळणारी ही रानटी शतावरी म्हणजे Asparagus racemosus  (आणि जी बाजारात विकायला येते, ती भाजीची शतावरी म्हणजे Asparagus officinalis.)
कुळ (family): Liliaceae
पाने ४ ते ७ mm लांब, निमुळती. याची पाने म्हणजे रुपांतरीत खोडे असतात. खोड हिरवे, काटेरी. फुलोरा मंजि-यांसारख्या रचनेत येतो. छोटी २ ते ३ mm आकाराची

फुले सहा पाकळ्यांची आणि घंटेच्या आकाराची असतात.  .  
रानटी शतावरीची मांसल मुळे औषधात वापरतात. थोडे जुने झुडूप उपटले असता त्याला अनेक मांसल कंद/ मुळ्या आलेल्या दिसुन येतात. (शतावरीला शंभर मुळ्या असतात असे म्हणतात!)
इतर नावे: सतावर, सतावरी, सतमुली, नारायणी, अतिरसा, वरी, श्वेतमुळी.

------------------------------------------

-अश्विनी केळकर