Showing posts with label दुरंगी बाभूळ. Show all posts
Showing posts with label दुरंगी बाभूळ. Show all posts

Saturday, 12 September 2020

तेरा झुमका रे...

बावधनच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर हिंडताना कुठेतरी टेकडीच्या उतारावर, माळावर ती अशी आपल्याच नादात उभी असते. कसला डामडौल नाही, तामझाम नाही की सुगंधाची उधळण नाही. अगदीच साधीसुधी. हलक्या गुलाबी, पिवळ्या रंगाचे झुमके म्हणजे हिच्या शृंगाराची परीसीमा. हिच्या साधेपणातलं सौंदर्य आणि नजाकत लांबून लक्षातही येत नाही. आणि तिने ते झुमके घातलेले नसतील तर तिचं हे वेगळेपण कळूनही येत नाही.

                                         

ही दुरंगी बाभूळ. सिगमकाटी. साधीसुधी वनकन्या ही, पण हिची संस्कृत नावं फारच जड - वीरवृक्ष, बहुवारक, महाकपित्थ...! 

आमच्या टेकडीवर ही बाभूळ जिथे आहे, तिथे वेगवेगळ्या झाडांचा नुसता दाटवा झालेला आहे. त्यात बेलाची दोन-तीन झाडे आहेत, घटबोर आहे, वावळा आहे, काही वेलींच्या जाळ्या आहेत. त्यात या दोन मध्यम उंचीच्या सिगमकाट्या आपला आब सांभाळून उभ्या आहेत. मे महिन्यात त्यांनी सुरू केलेला गुलाबी-पिवळ्या झुमक्यांचा शृंगार आता कळसाला पोचला आहे. 

या झुमक्यांमध्ये दिसणारे गुलाबी आणि पिवळे केसर म्हणजे खरेतर यातले पुंकेसर. त्या केसरांच्या तळाशी छोट्या पाकळ्यांची पेल्याच्या आकाराची फुले दिसतात. त्यातही, गुलाबी तु-यातली फुले नुसतीच दिखाऊ. प्रत्यक्ष फलनाचं काम करतात ती पिवळ्या तु-यातली फुलं. फोटो झूम करून पाहिले तर पिवळ्या फुलांमधले पुंकेसरांचे गुच्छ सहजच दिसतील. कळी अवस्थेत पोपटी-गुलाबी मण्यांसारखी दिसणारी ही फुलं कोमेजतात तेव्हा गुलाबी रंग पांढरट होत जातो आणि पिवळा रंग फिकूटत जातो. फुलं सुकतात आणि वेलांटीच्या वळणावळणाच्या हिरव्यागार शेंगा त्यांची जागा घेतात. 

सध्या या झाडांवर कळ्या, फुले, सुकलेली फुले आणि शेंगा सगळंच दिसत आहे. 

हल्ली रोज पाऊस पडतो आहे. उन्हाळ्यातलं त्यांचं धूळमाखलं रूप आता पालटलं आहे. सकाळी सकाळी टेकडीवर गेलं की सकाळच्या कोवळ्या उन्हात आपल्या पानांत, काट्यांवर, फुलांमधे ओथंबलेले पावसाचे थेंब सुकवत उभ्या असलेल्या या दोघी कशा लोभस दिसतात! 

बरेचदा दुरंगी बाभळीलाच शमी (खेजडी/ सौन्दड) म्हणतात. पण दोघींच्या पानांच्या रचनेत, फुलांच्या रंगात आणि रचनेत काहीच साम्य नाही. बहुदा आकर्षक फुलांमुळे असेल, पण अनेकदा दुरंगी बाभळीचीच रोपं शमीची रोपं म्हणून खपवली जातात. सौंदड आणि दुरंगी बाभूळ भारतभर, विशेषतः कमी पावसाच्या प्रदेशात मुबलक आढळतात. आमच्या गावी दुरंगी बाभळी होत्या. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या टेकडीवर जेव्हा दुरंगी बाभूळ पाहिली, तेव्हा गावाकडची मैत्रीणच खूप वर्षांनी भेटल्यासारखं वाटलं :)  

-अश्विनी

---------------------------------------------------------

दुरंगी बाभळीची ओळख: 

वनस्पतीशास्त्रीय नाव: Dichrostachys cinererea 

(डाय-क्रो-स्टॅकिस म्हणजे दोन रंगांचे तुरे आणि सायनेनेरिया म्हणजे राखाडी रंगाचे (खोड))

कुळ (family): Mimosaceae

पाने: Bipinnately compound. मुख्य शिरेवर फुटलेल्या पाच ते दहा उपशिरा आणि प्रत्येक उपशिरेवर पर्णिकांच्या पंधरा ते वीस जोड्या. पण सगळा ऐवज मिळून एका साधारण ४ ते ८ सेमी इतकाच पसारा. पाने फुटतात त्याच बेचक्यातून कळ्यांचे तुरेही फुटतात आणि टोकदार सरळ काटेही. 

इतर नावे: सिगमकाटी, वीरवृक्ष, बहुवारक, महाकपित्थ, वीरतरू, गोया खैर, दीर्घमूल.