Friday, 8 May 2026

आज चांदणे उन्हात हसले....

 आज चांदणे उन्हात हसले....

Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre, पेंढारी

शहरं, त्यांचा विस्तार आपण फारसा टाळू शकत नाही. त्याच्या बाहेरील कक्षेतील परिसरात खेडी किंवा गावं आणि शहरं यांचा मेळ दिसतो.

उतरत्या छपरांची घरं, शेतं, गोठे, मध्येच कारखाने, सॉफ्टवेअर कंपन्या, उंच डोंगरावर झाडी, तर कुठे Gliricidia सारख्या रांगेत लावलेल्या वनस्पती..किंवा उंचच उंच डोंगरावर टुमदार बंगला, नद्या.. त्यांच्या तीरावरील विस्तीर्ण झाडी किंवा तीरावरील नवीन येणारे प्रकल्प.. हे सगळंच आपण प्रवासात बघत असतो.

अशाच एका प्रवासात आम्ही अचानक थांबलो, नांदे -चांदे -घोटावडे कडून सुस रस्त्याला यायला लागलो की.. एके ठिकाणी शेतात काहीच नव्हतं, काटक्या आणि वळलेलं गवत, तापणारे खडक, मोठ्या शिळा, शेजारी फक्त करवंदाची आणि कोंढुराची झुडुपे तेव्हढी हिरवी होती, काटेरी असली तरी त्यात बऱ्याच पक्षांचा टिव-टिवाट होता. भोरड्या आणि बुलबुलांचाच आवाज तेव्हढा ओळखायला आला,

उन्हाळ्यात शेताच्या बांधावर, लक्ष वेधून घेणारं झाड पूर्ण निष्पर्ण, टोकाला काहीशी मोजकी पाने, सगळ्या पानांची तोंडे आकाशाच्या दिशेला, शेताचा बांध रस्त्यापेक्षा बराच उंच होता, एखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी hording लावावं तशी चार पाच झाडे एक रांगेत बांधावर उंच उभी होती, कुणीही हे चित्रं पहिलं तर विसरू शकणार नाही, यालाही कारण तसचं होतं,

भर उन्हात .. चांदणं ..

चमकदार पांनानसोबत लगडलेली फुले.. फुलांचा परिमळ काय तो वर्णवा, निसर्गाने इथून वळणाऱ्या वाटसरुसाठी हा सुगंध अंथरला असावा, रस्त्यावरून थेट ह्या फुलांजवळ पोचता येईना, बांध उंचावर आणि खाली पाणी वाहून जायला दोन चार फुट खोल चर .. मग लक्षात आलं की इथे पेंढाऱ्याची अनेक झुडुपे आहेत, काही उंच तर काही ठिकाणी जमिनीतून उगून आलेली बिल्लास भर रोपेही आहेत, वाळलेलं गवत आणि काटे बाजूला करत झाडांजवळ पोचले, पांनाची लकाकी उन्हं झेलत होती, सुकलेलं मृत झालेलं, गंजलेलं वाटावं असं झाड मोजक्या पानानमुळे अतिशय तेजस्वी वाटत होतं, फुलांचा सुगंध जणू वैशाखाची धगधग शांत करीत होता. एका उंच पेंढाऱ्याच्या झाडावर अगदी वर वासनवेल तिचा दुपट्टा उडवून घेत होत होती.

पेंढाऱ्याला खूप कमी फांद्या आडव्या वाढलेल्या दिसल्या, झाडाची वाढही अगदी सरळ झालेली.. काही फांद्यांना तर पानेही नव्हती पण टोकाला फुले होती. फांद्यांना काही ठिकाणी काटेही होते, काही ठिकाणी तर खोडालाच बोटभर फांदी येऊन त्यावर कळ्या आलेल्या दिसल्या, खोड आणि फांद्या किंचित लाल, तपकिरी रंगाच्या होत्या.. फांद्या सरळ, ताठ, चौकोनी असून, लहान फांद्या पसरणाऱ्या आणि दाटलेल्या दिसल्या त्यामुळे एक प्रकारची जाळी तयार झालेली दिसली, यात एक घरटही सापडलं.. कदाचित मुनिया सारख्या पक्ष्याचं असावं. खूप शोधल्यावर एकाच ठिकाणी एक फळ सापडलं.

फळ बोरापेक्षा मोठे, अंडाकृती किंवा लंबगोलाकार, गुळगुळीत, हिरवट पिवळे; बिया गुळगुळीत, चपट्या.

पाने आकाराने अंडाकृती पण किंचित टोक असलेली, अंदाजे दोन ते तीन इंच लांबीची, काही ठिकाणी पाने छोट्या फांद्यांच्या टोकावर गुच्छयात ओंजळी प्रमाणे आलेली दिसली. पाने कोवळ्या अंकुरांवर समोरासमोर किंवा लहान फांद्यांच्या टोकांवर जुडग्यांमध्ये दिसली.


फांद्यांच्या टोकांवर त्यांच्या लहान देठांवर फुले एकटी तर गुच्छातही दिसली, फुले मोठी, पांढरी आणि अतिशय सुगंधी. पुष्पकोष वरच्या बाजूला नळीसारखा, बोथट पाच दात असलेला. फुलाच्या पांढऱ्या, मऊ आणि सुगंधी सहा सहा पाकळ्या दिसून आल्यात. त्या जाडसर व बाहेर पसरलेल्या असल्यामुळे फूल ताऱ्यासारखे भासले. पाकळ्या एकावर एक अशा रचलेल्या होत्या. पाकळ्यांच्या खाली असलेले हिरवट छोटे पुष्पदल कळीचे संरक्षण करतात. ही सगळी तळाशी घंटेसारखे जोडलेले दिसून आलेत. पुंकेसर फुलाच्या मध्यभागी पिवळसर रंगात स्थिर दिसून आलेत.

या फुलाच्या सुगंधामुळे या वनस्पतीला Divine Jasmine म्हणतात, या उल्लेखामुळे ही वनस्पती घराघरातील अंगणात, सोसायत्यांमध्ये अंगणात असावी असं सारखं वाटू लागलं,

एखाद्या वनस्पतीला संशोधकावरून आणि तिच्या मूळच्या जागेवरून नामकरणाची ही पद्धत मला फार आवडते, त्या नावासोबतच तिचा इतिहासही प्रवास करत असतो.

Danish शास्त्रज्ञ Anders Jahan Retzius यांनी सर्वप्रथम १७८१ मध्ये त्यांच्या 'Observationes Botanicae' या प्रकाशनात 'Gardenia uliginosa' या नावाने या वनस्पती प्रजातीचे वर्णन केले. म्हणून वनस्पतीशास्त्रीय नामकरणामध्ये, "(Retz.)" हा उल्लेख सूचित करतो की Retzius हे त्या प्रजातीचे मूळ लेखक आहेत.

त्या नंतर फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ Jean-Louis Marie Poiret यांनी 1817 मध्ये या प्रजातीचे पुनर्वर्गीकरण केले. आणि ही वनस्पती Randia ulignosa (Retz.) Poir अशी ओळखली जाऊ लागली. भारतात १९७९ मध्ये  D. D. Tirvengadum आणि C. Sastre या शास्त्रज्ञांनी या प्रजातीचे पुनर्वर्गीकरण केले. आणि याचे Tamilnadia uliginosa असे नामकरण झाले, या वनस्पतीचे Tamilnadia हे प्रजातीचे नाव भारतीय राज्य तमिळनाडूवरून आले आहे, जिथे ही वनस्पती प्रामुख्याने नोंदवली गेली आहे आणि मूळची आहे. यात Gardenia मधून Randia आणि नंतर Tamilnadia करण्यात आले, तर मूळ प्रजातीचे नाव (uliginosa) कायम ठेवण्यात आले.

Tamilnadia uliginosa

Family: Rubiaceae (कॉफी फॅमिली)

Common name: Divine Jasmine

Botanical Name:

Gardenia uliginosa Retz. in Observ. Bot. (1781)

Posoqueria uliginosa (Retz.) Roxb. (1824)

Randia uliginosa (Retz.) Poir. (1812)

Xeromphis uliginosa (Retz.) Maheshw. 1961

Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre in 1979

 

मराठी नाव:  पेंढारी, पेंढरा, पेंडारी, पेंडर, पेंडू, पेंढूर 

संस्कृत नाव: पिण्डालु, पिण्डितक

 

झाडाचे मुळं, पाने, कच्ची आणि पिकलेली फळे याचा अनेक आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केल्याचा उल्लेख आढळतो, गुरे ढोरे, शेळ्या बकऱ्या याचा पाला खातात, डायरिया, दाढ दुखी, अतिसार अशा अनेक आजारांवर उपचारासाठी हे झाड उपयुक्त ठरते.

 

टेकड्या, डोंगर हे जर आपण व्यापत असू तर या दैवी सुगंधाची निर्मिती आपण आपल्या बागांमध्ये, घराजवळ अशी केली तर.. हा नैसर्गिक सुगंध आपल्या आजूबाजूला आपल्या परसात दरवळू लागला तर...माणसाने मिरावला तर.. असा सुगंध ज्याला पैशाचं मोल नाही, कसला हव्यास नाही, कशाशी तुलाना नाही, त्यावर कुणाची मालकी नाही..

म्हणूनच तर हे सगळं दिव्य आणि दैवी.

 

Ref: https://powo.science.kew.org/taxon/urn:lsid:ipni.org:names:767328-1

https://www.jbsd.in/Vol%209%20No%201/Jasbir%20Bagga97-99.pdf

https://www.researchgate.net/publication/337393965_AN_UPDATED_REVIEW_ON_TAMILNADIA_ULIGINOSA

https://efloraofindia.com/efi/tamilnadia-uliginosa/

https://www.researchgate.net/publication/337393965_AN_UPDATED_REVIEW_ON_TAMILNADIA_ULIGINOSA

https://indiaflora-ces.iisc.ac.in/FloraPeninsular/herbsheet.php?id=8673&cat=7

रूपाली भोळे

Proopalee@gmail. Com

Saturday, 7 March 2026

अंकोळ

 सरता फाल्गुन म्हणजे झाडाझाडांवर रंगांची उधळण आणि श्वासाश्वासात सुगंधांचा मृदंग. पळस-पांगाऱ्याच्या केशरी पताका, काटेसावरीच्या  गर्द लालसर-गुलाबी फुलवऱ्यात नादावलेली उन्हं, धम्म पिवळी गणेर, टबूबिया -जकरंदा वगैरे परदेशी मंडळीही रंगांच्या उत्सवात सजलेली. 

अशा झमझमाटात वेताळ टेकडीवर खाणीच्या कडेला, जरा आडबाजूला एक अंकोळ पांढुरक्या, मंद सुवासिक फुलांनी बहरलेला असतो. आजूबाजूला चाललेल्या रंगगंधाच्या उत्सवाशी त्याचं काही घेणंदेणं नसतं. पिवळट तपकिरी पानांनी अंकोळाच्या पायाशी गादी घातलेली असते आणि सगळ्या काटेरी उघड्या फांद्या रेघारेघा कोरलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या लांबट कळ्यांनी आणि छोट्या छोट्या कारंज्यांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी  सजलेल्या असतात. कळ्या उमलतात तेव्हा त्याची निदले (Sepals) बाहेरच्या बाजूला कमान टाकून आतल्या दिशेला वेटोळी करतात. मग त्याच्या आत निमुळत्या, पांढरट, मऊ लव असलेल्या पाकळ्यांचं चक्र. त्याच्या आत डोक्यावर पिवळट केशरी परागकोश घेऊन उभे असलेल्या पुंकेसरांचं चक्र आणि मधोमध डोकं वर काढून उभा असलेला स्त्रीकेसर. अगदी जवळ गेल्याशिवाय याचा मंद  गंध जाणवणार नाही आणि फुलांची नजाकत तर  मुद्दाम निरखल्याशिवाय लक्षातच येणार नाही.







इथे अंकोळ आहे हे कळल्यानंतर जानेवारी ते एप्रिलच्या काळात वेगवेगळ्या वेळी याची फुलं दिसतात का ते बघायला येत होते. तीन वर्षे त्यांनी हुलकावणी दिली. कधी बहर संपून गेलेला असायचा तर कधी उन्हाच्या तडाख्यात कळ्या करपून गेलेल्या असायच्या. गेल्यावर्षी मात्र सगळ्या शुभवेळा जुळून आल्या आणि फुललेल्या अंकोळाच्या दर्शनाचं  भाग्य लाभलं. नुसता अंकोळच नव्हे, तर त्याच्यावरच्या मधमाशांच्या झुंडी आणि शिंजीरांच्या कसरतीही. मात्र, इथे एक थोरला अंकोळ आहे तोच फक्त फुलतो. त्याच्या आजूबाजूचे चिल्ले पिल्ले अंकोळ अद्याप फुलं धरत नाहीत. फुलांचा बहर संपल्यावरही अंकोळाला भेट दिली, पण इतका फुलूनही थोरल्या अंकोळवर अद्याप फळं धरलेली बघितली नाहीत. काय कारण असावं, माहिती नाही.

रामायणात किष्किंधाकांडामध्ये  राम आणि लक्ष्मण कमळफुलांच्या पम्पा सरोवरापाशी येतात. सीतेच्या आठवणींनी राम विकल झालेला आहे. इथे पम्पा सरोवराकाठच्या वृक्षराजीचं वर्णन आहे. त्यात वावळ, बकुळ, पळस, काटेसावर, शिरीष, चंदन अशा अनेक झाडांबरोबर अंकोळाचाही उल्लेख आहे. अशा रमणीय प्रदेशात सीतेबरोबर राहाता आलं तर मला कोणत्याच भोगांची अभिलाषा राहाणार नाही असं तो लक्ष्मणाला सांगतो आहे. गेल्यावर्षी हंपीला गेलो, तेव्हा हे सारं वर्णन डोक्यात होतं. मुख्यतः अंकोळ बघायचा होता. मातंग टेकडीवर हिरवेगार अंकोळ बघायला मिळाले. बदामीलाही, चौथ्या लेण्यांकडे जाताना उभ्या कड्याला खेटून उभा राहिलेला एक देखणा अंकोळवृक्ष बघितला.

आदिशंकराचार्यरचित "शिवानंद लहरी" मध्ये एका श्लोकात अंकोळाबद्द्ल एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे. 

अङ्कोलं निजबीजसन्ततिरयस्कान्तोपलं सूचिका

साध्वी नैजविभुं लता क्षितिरुहं सिन्धुः सरिद्वल्लभम् ।

प्राप्नोतीह यथा तथा पशुपतेः पादारविन्दद्वयं

चेतोवृत्तिरुपेत्य तिष्ठति सदा सा भक्तिरित्युच्यते ॥ ६१॥

यात अंकोळाची बी आणि अंकोळाचे झाड, लोखंडी सुई आणि चुंबक, पतिव्रता स्त्री आणि तिचा पती, वेल  आणि तिचा आधारवृक्ष, नदी आणि समुद्र अशी रूपके वापरून अद्वैत सिद्धांत सांगितला आहे.  

यात झाडाखाली विखरून पडलेल्या अंकोळाच्या बिया, जेव्हा पावसाळ्यात विजा चमकतात, तेव्हा झाडाच्या ओढीने परत झाडाकडे येतात आणि खोडावर चिकटून बसतात अशा लोकसमजाचा आधार आहे. 

आंदाळ या तामीळ संत-कवयित्रीने रचलेल्या "नच्चियार तिरुमौल्ली" या भक्तिकाव्यावरच्या एका आख्यानातही अशाच एका समजाचा उल्लेख आहे. कालियाच्या विषाने जळून गेलेला कदंब कृष्णाच्या पदस्पर्शाने परत जिवंत होतो, यावर शंका घेणाऱ्यांना आख्यानकर्ता विचारतो, आंब्याची कोय अंकोळाच्या तेलात भिजवून रुजवली, की क्षणात तिचा वृक्ष बनून त्याला आंबे लागतात हे तुम्हाला माहिती नाही का? मग कृष्णाच्या पदस्पर्शाने कदंबाला संजीवनी मिळाली यावर अविश्वास का दाखवता? यामध्येही, विजा लवताना जेव्हा अंकोळाच्या बिया झाडाच्या खोडावर चिकटतात तेव्हा त्या गोळा करून त्यांचं तेल काढलं आणि त्यात आंब्याची कोय भिजवून ती रुजवली तर क्षणात रुजते आणि फळ धरते असा समज आहे. 

असे आणखीही काही लोकसमज दक्षिणेकडच्या राज्यात असावेत. म्हणूनच कित्येक देवळामध्ये अंकोळाचे जुने वृक्ष स्थानवृक्ष म्हणून सांभाळलेले आहेत. याचं वनस्पतीशास्त्रीय नाव Alangium salviifolium - यातलं Alangium हे तमीळ Alinzil वरुन आलेलं आहे.  

ते काही असो, पण आंब्याच्या कोयीलाही क्षणात रुजवून फळ धरायला लावणारं ते अंकोळाचं फळ अद्याप तरी टेकडीवरच्या अंकोळाच्या (आणि माझ्याही) नशिबात नाही. 

गेल्याच आठवड्यात टेकडीवर जाऊन आले. अंकोळ बहरला आहे. काही दिवसात बहर संपेल आणि अंकोळ परत हिरवेगार होतील. मी फळाची अपेक्षा करत पुन्हापुन्हा त्याला भेट देण्याचं माझं काम करत राहीन. 









अंकोळ  Alangium salviifolium 

Family: Cornaceae 

संस्कृत नावे: अङ्कोल, गन्धपुष्प, गूढमल्लिका, गुणाढ्यक, गुप्तस्नेहा, कङ्करोल, लम्बकर्ण, पीतसार, रेचिन् विज्ञानतैलगर्भ, विशालतैलगर्भ (Flowers of India वरून)

Saturday, 8 March 2025

पारुल फूल

बंगाली लेखक दक्षिणरंजन मित्र मजूमदार यांनी १९०७ साली "ठाकुरमार झूली" या पुस्तकात बंगालमधील लोककथा एकत्रित केल्या. त्यातली एक कथा "शात भाई चंपा". एक राजा, त्याच्या सात राण्या. धाकटी राणी सर्वात आवडती. तिला दिवस गेले तेव्हा हिचं स्थान आणखी बळकट होणार म्हणून बाकी राण्या चिंतेत. राणीने सात मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला आणि ती बेशुद्ध पडली, तेव्हा बाकी राण्यांनी ती मुलं परसदारी शेणाच्या ढिगार्‍यात पुरली आणि त्यांच्याजागी धाकट्या राणीच्या कुशीत कुत्र्या मांजराची पिल्लं ठेवली. राजाने धाकट्या राणीला घराबाहेर हाकललं (बिनडोक माणूस). इकडे शेणाच्या ढिगार्‍यातून आठ झाडं उगवली आणि भराभर वाढून उंचच उंच गेली. सात झाडांवर सोनचाफ़े फुलले ाणि एकावर पारूल फुलं. राजाचा माळी फुलं काढू गेला, तर झाडं उंच जाऊ लागली. राजाने, त्याच्या सहा राण्यांनी प्रयत्न केले, तरी फुलं हातास येईनात. शेवटी धाकट्या राणीला बोलावलं, तेव्हा सगळी चाफ्याची आणि पारुलची फुलं तिच्या ओंजळीत आली तिची सात मुलंही मानवी रूपात समोर उभी ठाकली. मग राजाला खरी गोष्ट कळली, वगैरे... बंगालात या गोष्टीवर चित्रपट आणि मालिका येऊन गेल्या. १९७८ सालच्या त्या चित्रपटात लता मंगेशकरांनी गायलेलं "सात भाई चंपा जागो रे" हे अत्यंत मधुर गीत आहे https://www.youtube.com/watch?v=qvBL0M_AGR4 इथे जरूर ऐका. कथेतल्या पारुलच्या तोंडी असलेलं हे गाणं आजही बंगालमधलं लोकप्रिय बालगीत आहे.

तर, या कथेतलं पारुल फूल म्हणजे पाटलफूल. संस्कृत नाव पाटल/ पाटला/ पाटलि तर मराठी नाव पाडळ/ पाडळी. संस्कृतात "पाटल"चा अर्थच मुळी गुलाबी रंग. नाजूक झालरीसारख्या पाकळ्यांच्या, मऊ लव असलेल्या पाडळीच्या फुलांत हलक्या पिवळसर, गुलाबीसर ते गहिर्‍या गुलाबी रंगापर्यंत मनोहारी छटा आढळतात. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स/ Flame University च्या टेकडीवरून सुसच्या Sunny's world कडे जाणार्‍या वाटेवर पिवळसर फुलांच्या पाडळीची झाडं मुबलक आहेत. त्या भागाला पाडळीवन म्हणावं, इतकी आहेत. आणखी एक पिवळ्या पाडळीचा वृक्ष कर्वे रस्त्यावरच्या मृत्युंजयेश्वराच्या देवळाच्या मागच्या रस्त्यावर (तग धरून उभा) आहे. याचं इंग्रजी नाव स्नेक ट्री. फूट-दीड फूट लांबीच्या सापासारख्या फळांवरून पडलेलं. शेंगेसारखी दिसणारी ही फळं खरेतर बोंड प्रकारात मोडतात. फळाच्या आत एक धांडोरा असतो आणि त्याच्या खाचांमधे वार्‍यावर उडणार्‍या पंखधारी बिया असतात. ऐन ग्रीष्मात फुलणारा सुगंधी फुलोर्‍याचा हा वृक्ष फुलतो तेव्हाही नीट पाहिल्याशिवाय फुललेला कळत नाही. मी टेकडीवर पहिल्यांदा उंचच उंच वाढलेला पाडळ पाहिला, तो नवी पालवी आणि फुलं एकाच वेळी आलेला. 









टेकडीवरचे पिवळ्या फुलांचे पाडळ पाहिल्यावर गुलाबी फुलांच्या पाटलाला पहायचे वेध लागले. इंगळहळ्ळीकर सरांच्या पुस्तकात तो woodland society त आहे असं दिलंय, पण तो काही बघता आला नाही. मग एक दिवस उषाताईंनी टेकडीवरची गुलाबी पाडळीची झाडं दाखवली.  त्यांना एकदाच इथे एक वाळलेलं गुलाबी फूल सापडलं म्हणाल्या. परमहंस नगरमधून मारुती मंदिराकडून म्हातोबाकडे जाणार्‍या टेकडीरस्त्यावर गुलाबी पाडळीची, वेगवेगळ्या वयाची आणि उंचीची सहा झाडं एकाच ठिकाणी आहेत. मग जानेवारीअखेरपासून त्या झाडांच्या मागावर राहिले, पण ती काही फुलण्याची चिन्हं दिसेनात. आजही सकाळी गेले तेव्हा प्रत्येक झाड बघितलं. सगळी झाडं राठ, जून पाने घेऊन ढिम्म उभी. यांच्यावर कधी फूल फुलणारच नाही असं वाटणारी. एक झाड ग्लिरीसिडियाजवळ उभं. याच्या फांद्या, त्याच्या फांद्या एकमेकात गुंतून गेलेल्या. ग्लिरीसिडियाच्या गुलाबीसर फुलोर्‍यात दोन गर्द गुलाबी ठिपके दिसले. मानेला रग लागेतो नीट पाहिलं, तेव्हा त्या फुलोर्‍याची नेटकी मांडणी कळत गेली. टोकाला फुललेलं फूल, त्याच्या खाली दोन कळ्या, उपशाखा, शाखा, मग मुख्य फांदी - ओबडधोबड आणि रुक्ष पानांची. पण आता उंच शेंड्यावर नाजूक गुलाबी फुलं माळलेलं ते झाड तितकंसं जून आणि ओबडधोबड वाटेना. हिमाचलमधले उंचेपुरे पहाडी मेंढपाळ आठवले - हसर्‍या चेहर्‍याचे आणि टोपीत फुलं खोवणारे! 





- अश्विनी केळकर

पाटल, पाडळ, पादरी, snake tree, Fragrant Padri Tree 

Stereospermum chelonoides/ Stereospermum suaveolens 

॑Tekdi 



Saturday, 1 June 2024

पृथ्वीच्या पोटात..

भिवसूळा caves बद्दल अश्विनी ने सांगितलं . . सोबत सर्जेराव पवार यांचा संपर्क दिला..सर्जेराव यांनी प्रवीण बेलोशे यांना सोबत पाठवलं...त्यांना आपण ‘प्रबे’ असं संबोधू या...

  
दोन दोन प्रवीण सोबत असल्याने तशी फारशी भीती जाणवली नाही ... महाबळेश्वर, भिलार, कासवांड, आणि चोरमाले वस्तीजवळ गाडी उभी केली. जांभळं, करवंद खात खात समोरचा एक डोंगर चढलो. अनेक कंद उगवून आले होते, शतावरी, अस्वली आताच फुलून आली होती... जमीन ओली होती, हिरड्यांची झाडे अशक्य फळली होती .. हवेतील गारठा फारच सुखावह होता . . डोंगर चढून सपाट जमीन..सडा सुरू झाला .. सड्यावर गेळा चकाकत होता, मधेच पाण्याची डबकी होती..जमिनीचा रंग लाल, तपकिरी ...
जांभा ही चकाकत होता.. सगळं वेगळं. . जांभळीची खुरटी झाडी गर्भार वाटतं होती... लगडलेली.. वाकलेली.. काही गवतफुले उदा., काळी मुसळी, गोधडी, डोलत येणाऱ्या पावसाची खबर ओरडुन सांगू पाहत होती . . .


पाण्याच्या डबक्याजवळील गवत बहुधा रान डूकरांनी ओराबडलेलं दिसत होतं . . चालत आम्ही पठाराच्या शेवटी पोचलो.. तर पठाराचाच काही भाग खाली खचलेला दिसला.. पठार आणि तो भाग यात अंदाजे चार पाच फुटाची भेग दिसत होती. त्या भेगेचेच एका छोट्या घळीत रूपांतर झालेले दिसले.. भूकंपामुळे ही भेग, घळ तयार झाल्याचं प्रबे दादा म्हणाले.
पृथ्वीच्या पोटात आम्ही उतरायला सुरुवात केली. जांभा आणि मधेच कुठेतरी बसाल्ट दगडांच्या अरुंद भेगेतून आम्ही प्रवास सुरू केला.
हे एव्हढ अवघड असेल याची कल्पना नव्हती ... नाही तर आम्ही दोघींनी बुट घातले असते.. आम्ही दोघींनी एकमेंकाकडे पाहिलं.. मी तुम्हाला आधीच म्हणत होतो ... इती प्रभो.
एक टप्पा पटकन उतरून माझ्या मंद वेगाला कंटाळून चिनाब एका झाडावर जाऊन चढली... पुढील वाटेत खाली वाकून जावं लागलं.. डोक्याबरोबरीचे नेचे आणि इतर झुडूपवर्गीय वनस्पती आणि वेलिंचा गुंता..अनेक झाडांनी त्यांची मुळं जमिनीला समांतर पायऱ्या प्रमाणे रचून हा उतार आमच्यासाठी सोपा केला...

आता डाव्या बाजूला मोठ्या शिळा.. त्यात मोठ्ठली भगदाड.. भगदाडाच्या बाहेर तांबडी माती.. आणि लगेच झाडी.. अजबच वाटतं होतं.. तेवढ्यात प्रबे म्हणाले अशा गुहेत कोल्हे, तरस किंवा साळिंदर यांचा अधिवास असतो.. मी आणि ती लगेच पळत जाऊन साळिंदराची ती जागा पाहून आलो. चार मोठ्ठ्या शिळा पार केल्यावर परत काही शिळा एकमेकांवर विसवल्या होत्या... त्यांच्या रचनेमुळे अधे-मध्ये उन्हाचे कवडसे डोकावत होते ... यामधून आम्ही अजून खाली उतरायला सुरुवात केली.. सतत AC सोबत घेऊन फिरतोय असं जाणवत होतं. मधेच उंचच उंच शिळा पार करतांना काही ठिकाणं अशी होती की रांगत जावं लागे तर काही ठिकाणी पोट जेवढं आत घेता येईल तेव्हढं घेऊन, शक्य होईल तेवढं बारीक होऊन चालावं लागे, स्वतःला हातावर तोलून मग पायाची दिशा (अंधारात) ठरवावी लागे.. प्रबेदादांना खडा न खडा माहित असल्याने त्यांची खूप मदत होत होती.

येणारी प्रत्येक जागा अतिशय वेगळ्या गोष्टींनी नटलेली दिसे, या अरुंद शीतल शिळेच्या भिंती जणू तांबं वापरून घडल्या अशा लाल तांबूस दिसत होत्या.. त्यावर नेचे आणि गवत फुलांची नक्षी.. आणि या भिंती मधून वर पाहावं तर वर निळीभोर आकाशाची खाप.. जळी स्थळी ओलावा, आणि ओलाव्याचा गंध.. सृष्टीचा हा नयन रम्य सोहोळा किती टीपावा आणि किती नाही असं वाटत होतं.. पुढे जाण्याची उत्सुकता होतीच..सलग अडीच तास आम्ही चालत, उतरत, चढत होतो.. आता किती राहिलं ..असे प्रश्न आता डोकावूं लागले ... त्या चिंचोळ्या दगडी भिंतींमधून एरव्ही विस्तीर्ण वाटणाऱ्या आकाशाची खाप दिसत होती.. सगळं जादुई होतं.. पृथ्वीच्या पोटात जाऊन वर छोटंसं आकाश बघायचं.. मध्येच एखादं वटवाघूळ गुहेतून उगीच इकडे तिकडे करून आम्हाला बघून जाई. या चिंचोळ्या अरुंद दगडी भिंती काय वर्णाव्या.. त्यांना मिळालेला नैसर्गिक लाल तांबूस, आणि मध्येच शेवाळीचा हिरवा रंग .. अंधारात काही ठिकाणी त्या किंचित निळसर होऊन चमकत होत्या... शेवटी एका अरुंद ठिकाणी भली मोठ्ठी शिळा उभी होती.. प्रबेदादा पटकन वर चढून गेले..तिथून सडा अगदी जवळ..पण वाट फारच अवघड..आम्ही आल्या मार्गी फिरलो..मोठ्या गुहेशेजारी न्याहारी करून परतलो...


परतीला एका दगडातील देव..म्हणजेच एका शिळेत कोरलेले भुतेश्वराच देऊळ ..आणि भोवतालची उंचच उंच राई आणि त्यावरील शेकरुंची घरटी न्याहाळून परत फिरलो.
पुन्हा भेट देण्यासाठी..

रूपाली भोळे


Monday, 22 April 2024

वाटा वाटा वाटा गं!!

ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स/ Flame University च्या टेकडीवरून सुसच्या Sunny's world पर्यंत जाता येतं हे strava वर बघून ठेवलं होतं. कितीतरी दिवसांपासून त्या वाटेने जायचं ठरवत होते. ते काल जमलं. ऑक्सफर्ड टेकडी चढून हेलिपॅडवरून पुढे गेलं की view point आहे. तिथून गोल्फ मैदानाचा श्रीमंती नजारा दिसतो. या परिसराचा पुण्याशी, उन्हाळ्याशी, पाणीटंचाईशी काही संबंध नसतो. तिथे सगळं गारेगार हिरवेगार असतं. तिथून शापुरजी पालनजीच्या वनहा कडे रस्ता जातो आणि एका ठिकाणी संपतो. मग पायवाटेने पुढे जाऊन एका दगडी कुंपणाला वळसा मारून strava चा नकाशा बघत बघत पुढे जात राहिलं की मधल्या टेकड्यांच्या निम्म्या उंचीतून चालत सूस टेकडीवरून Sunny's world पर्यंत पोचता येतं.

पूर्णपणे स्थानिक आणि नैसर्गिक वनस्पतीवैभव असलेला हा परिसर आहे. पण आता पडझडीला सुरुवात झालेली आहे. खालून काँक्रीटच्या जंगलाचा अजगर पुढेपुढे येऊ लागलेला आहे. 

मोह, नाणा, कहांडळ, पाडळ, चारोळी, दहिवण, मेडशिंगी, बहावा, आईन, बेहडा, सालई, मोई, खैर, पेटरा, धामण अशी सगळी जिवाभावाची मंडळी भेटली. नैसर्गिकरीत्या रुजवण झाल्याने इथे एकेका प्रकारच्या झाडांची बेटं असल्यासारखी झाली आहेत. म्हणजे एका भागात सगळी नाण्याचीच झाडं, एका भागात कितीतरी पाडळी, एका भागात चारोळी, असं. चारोळ्या पिकल्या आहेत, मोहाला फळं धरली असली तरी कुठेकुठे अजूनही फुलं शिल्लक आहेत. चारोळी आणि मोहाची चव घेत, मेडशिंगी आणि नाण्याचा दरवळ अनुभवत, पाडळीच्या फुलांची नजाकत बघत आणि असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत नऊ किलोमीटर अंतर कधी संपलं ते कळलंही नाही.

Crested Bunting/ तुरेवाला भारीट /  युवराज 

चारोळी 

पाडळ 

कहांडळ 

पाडळ

बेहडा 

मेडशिंगी 

पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरच्या या पायवाटा खरेतर पुण्याची वेगळी ओळख बनू शकतात असं एक (भाबडं) स्वप्न मी बघत असते - त्या काँक्रीटच्या अजगराला टेकड्यांपासून दूर ठेवलं गेलं आहे, आणि या वाटा आहेत तशा जतन केल्या जात आहेत, स्वच्छ ठेवल्या जात आहेत, पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरच्या अशा शंभरेक वाटांचं मार्किंग झालं आहे, त्याचे नकाशे उपलब्ध आहेत, लोक त्या वाटांवरून चालत पुण्याचा हिरवा वारसा अनुभवत आहेत, झाडांची ओळख करून घेत आहेत, उन्हाळ्यात ती जगावीत म्हणून प्रयत्न करत आहेत, ते सगळे ट्रेलस पूर्ण करणाऱ्यांना वनखात्याकडून छोटंसं टोकन मिळत आहे...................

...........असो.

- अश्विनी

सुस टेकडीवरून सिम्बायोसिस 

सुस टेकडीवरून ऑक्सफर्ड टेकडी  


Saturday, 23 September 2023

दगडांचे सण

 दगडांचे सण.

गौरी गणपतीचा काळ घरात जसा उत्साही असतो तसा निसर्गातही. पावसाचा वर्षातील सरता काळ. याच काळात सह्याद्रीत असलेली माळरानं फुलू लागतात. काळ्या जर्द पाषाणाला हिरव्या विविध प्रकारच्या गवतांची वलयं घेरू लागतात. अधुनमधून येणारी पावसाची सर ही गवताची उंची वाढवते. उन्हाळ्यात तापणारा, शुष्क निर्जीव वाटणारा हा खडक / दगड या काळात अतिशय सक्रीय आणि जिवंत वाटत असतो. याच काळात दगडाभोवती, दगडावर जीवन फुलत असतं.

पावसाला सुरुवात झाल्यावर काही काळातच तेरडा, सोनकी अशा वनस्पतींच्या उगवणीला सुरुवात होते. आणि श्रावणाच्या शेवटाला यांचा बहर मोहरून टाकतो. आषाढातील आषाढ आमरी, एकपानी या काळात फुलून गेलेल्या असतात. वाऱ्यासोबत डोलणारी फुलं, त्यांच्यात तालात मिसळणारी गवतं आणि या सगळ्यांना चिटकून असणारी भाताची पिकं हे चित्र अतिशय स्वर्गिय वाटत असतं. याच काळात मातीत येणारं रानआलं, रानहळदही फुलून येतं. कंदयुक्त करांद्यांच्या वेलीच्या फुलांची तोरणंही उन, वारा, पावसाच्या उत्सवात सहभागी असतात. चिरायत, तिळवण, फोडशी, इफिजिनिआ अशा अनेक वनस्पती सड्यावर , सड्याच्या बाजूला गवतात दिसून येतात.

आषाढातील आषाढ आमरी हिरव्या आकाशी दिवसा चांदण्यांसारखी चमकून जाते. तर त्यानंतर चिमूटभर जांभळी चिरायत श्रावणात या गवतावर तिच्या चार जांभळ्या गर्द पाकळ्यांनी कोरीव रांगोळी आखते. आणि तिचा मधोमध पिवळा ठिपका फारच शोभून दिसतो. श्रावणात आणि भाद्रपदात सकाळच्या उन्हात अंग शेकायला अनेक सरपटणारे प्राणी दगडावर (जिथे सहजासहजी कुणाला दिसणार नाही तिथे) येऊन बसतात.



कंदयुक्त वनस्पतींना तर पावसाची चाहुल कशी लागते कुणास ठाऊक. पावसाळ्याच्या आधीच त्यांचे कोंब डोकावू लागतात. पावसाळ्यात श्रावण भाद्रपदात त्या वाढतात, फुलतात, फळतात आणि नंतर परत लपून बसतात ते पुढील पावसाची वाट पाहत. नेचे वनस्पती हिरव्या, सक्रिय होतात. भारंगी, दिंडा यासारख्या झुडुप युक्त वनस्पती याच काळात फुलतात आणि माशांनी, भुंग्यानी, किटकांनी भरून गच्च असतात.
सड्यावर, माळावर उगवून येणाऱ्या या वनस्पती म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्थाच असते. कोणतीही परिसंस्था अनेक जैविक आणि अजैविक घटक मिळून तयार होते. यात


सरपटणारे प्राणी, किटक, माशा, फुलपाखरं, तेथील माती, दगड, हवामान, पावसाचे प्रमाण सगळे सगळे असतात. यांची आपापसात देवाण घेवाण सतत चालू असते.
याच काळात एका विशिष्ट वनस्पतीनं लक्ष वेधून घेतलं. अगदी छोटसं, नखभरही नसावं असं जांभळट गुलाबी फुल, पाच पाकळ्यांचं. या वनस्पतीला पानंच दिसेनात. बुटकी, बोटभरही उंच नसावी ही वनस्पती. लक्ष वेधून घेतलं ते आजुबाजूच्या पाण्याच्या / दवाच्या थेंबांनी; सकाळच्या सुर्यप्रकाशात हे दवबिंदू चमकत होते. त्या दवबिंदूंवर पहुडलेलं हे छोटंसं फुल. दगडा-खडकात कमी मातीत किंवा खडकाच्या भेगेत उमलून आलेलं. तिला पानं नव्हतीच. छोट्या छोट्या फांद्या आणि त्याला दवबिंदूंची झालर.

तिचं नाव Drosera Indica, ड्रोसेरा म्हणजे मद्यासारखे चिकट दवाचे थेंब.


गंमत म्हणजे दुपारच्या वेळीही तिच्या फांद्यावरच दव तसंच होतं, बाजूच्या गवता वरील दव आता नव्हतंच, पण हिच्या भोवती गच्च ओलेपण वाटत होतं, फुलं किंचितस कोमेजली होती. दव मात्र उन्हातही चमकत होतं. या वनस्पतीच्या प्रकाराला sundew म्हणलं जातं, थोडक्यात सूर्यप्रकाश आल्यावर ज्याचं दव टिकून रहातं, अशा वनस्पतींचा हा प्रकार... वर म्हटल्याप्रमाणे या परिसंस्थेत नेमका हिचा सहभाग कशासाठी?
ही अशा ठिकाणी असते की जिथे कमी माती, पावसाचा लहरीपणा, पोषण मूल्यांची कमतरता आहे. ही किटकभक्षी वनस्पती आहे. निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की त्यांना पोषणाकरिता किटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजन युक्त पदार्थ, क्षार - जरी जमीन, पाणी यांपासून मिळत असले तरी ते त्यांच्या गरजेपेक्षा कमी असतात. किटकांच्या शरीरातून त्यांना हे पदार्थ मिळू शकतात. त्यांच्या पात्यावर विशिष्ट स्पर्शके असतात. या स्पर्शकांच्या टोकाला हे दवबिंदूंसारखे सूर्यप्रकाशात चमकणारे थेंब दिसतात. याच थेंबामुळे किटक वनस्पतीकडे आकर्षिले जातात. एखादा कीटक पात्यावर बसतो त्यावेळी स्पर्शकांना त्याच्या आगमनाचा संदेश पोहोचतो व त्यांच्या उद्दीपनास एकदम सुरुवात होते. त्यांच्यातील घट्ट रस स्रवतो आणि कीटक त्यात रुतून बसतो. या ठिकाणी जे स्पर्शक असतात ते आपल्या द्रवाने त्याचा पूर्ण निकाल लावतात व त्यातील नायट्रोजनयुक्त अन्न पचवून टाकतात. आणि इतर उपयुक्त नसलेले पदार्थ विघटन होण्यासाठी त्या किटकाच्या सांगाड्याबरोबर तसेच राहू दिले जातात. अशी ही या छोट्याश्या वनस्पतीची जगण्याची रीत. कालांतरानं तिला फळ येतात, फळांच्या बीयांमधून तिचा प्रसार होतो.
पोषणमूल्यांची अनुपलब्धता या वनस्पतीला संपवू शकत नाही, उलट त्यामुळेच ती आपली पोषणाची पद्धत शोधून काढते. कोरड्या पाषाणानजीक, खडकांच्या भेगांमधून ती आपलं जीवन फुलवते. पावसाळ्याच्या अली-पलीकडे सृष्टी अशा पद्धतीन सजत असते, जिकडे तिकडे रंगीबेरंगी बहर आलेला असतो, कदाचित म्हणूनच आपल्या संस्कृतीत बरेचसे सण-उत्सव याच मोसमात येतात. निसर्गाबरोबर आपणही सृष्टीच्या रंगात रंगून जातो. पण आपल्या सणा-समारंभांच्या कल्पना मात्र आगळ्याच असतात, सृष्टीला तिच्या वेगानं, तिच्या पद्धतीनं बहरू दिलं तर खऱ्या अर्थानं सण साजरे होतील.
Botanical name: Drosera indica
Family: Droseraceae (Sundew family)
Common name: Flycatcher, Sundew, Dew plant, Indian Sundew
स्थानिक नावे: दवपर्णी, गवती दवबिंदू, दहिंवर
रूपाली भोळे