टेकडीवरच्या माळावर एक लेकुरवाळी बाभूळ आहे. कोतवाल (Drongo), चास (Indian Rollar), बुलबुल, धानचिमण्या वगैरे छोटी मंडळी तिच्या अंगाखांद्यावर कायम किलबिलत असतात. सुगरणी तिथे दरवर्षी खोपे बांधतात. कधीतरी तिथे अगदी शांतता असते कारण बाभळीच्या शेंड्यावर एखादी कापशी घार सावजाची टेहळणी करत बसलेली असते. ही जागा तिच्यासाठी Vantage point असते. अगदी मोक्याची जागा. आसपासचा केवढातरी परिसर तिच्या टेहळणी टापूत येतो. या बाभळीच्या शेजारी आणखीही मंडळी आहेत. एक मोईचं झाड वाढतंय, थोडी टणटणी वाढली आहे, आणि बाभळीला बिलगून वर वर चढत एका वेलीने बाभळीच्या माथ्यावर आपला संसार मांडला आहे. ही वेलही बाभळीसारखीच लेकुरवाळी आहे. मुंग्या, अफिड्स, सनबर्ड्स, वेगवेगळे कीटक, फुलपाखरं, त्यांच्या अळ्या - असा सगळा गोतावळा तिच्याबरोबर नांदतो. ही हरणदोडी! आणखी एक देखणी वेल. बाभूळ आणि ही हरणदोडीची वेल या सख्ख्या मैत्रिणी आहेत. "चंद्रिके गं सारिके गं - बरी हायस नव्हं?" अशी एकमेकींची मायेने विचारपूस करत एकमेकींच्या गळ्यात गळे घालून नांदतात. टेकडीवर आणखीही कुठे कुठे ही हरणदोडी बाभळीच्या, खैराच्या, चारोळीच्या झाडांच्या आधाराने, आपला पसारा आटोक्यात ठेवून गुण्यागोविंदाने राहाते. हरणदोडी ही बहुवर्षायु woody climber आहे. वेलीच्या खोडाच्या आकारावरून वेल बरीच जुनी आहे ते कळतं, पण तिचा पानांचा पसारा मात्र त्यामानाने आटोपशीरच. टेकडीच्या पायथ्याशी पाषाण-NDA रस्त्याकडेला रामनगर कॉलनीच्या गेटसमोर एका तारेच्या कुंपणावरही ही वेल पसरली आहे. बहुदा बरेच वर्षांपासून आहे. त्या वेलीच्या दाट, गार सावलीत एका चांभारदादांनी आपलं दुकान थाटलं आहे! एकदा त्या वेलीच्या फळांचे फोटो काढायला गेलो, त्यावेळी तिच्या पानावर blue tiger फुलपाखराची अळी शांतपणे चरताना दिसली - milkweed प्रकारची (म्हणजे पान/ देठ/ खोड तोडल्यास चीक येणारी) वेल असल्याने tiger आणि crow जातीची फुलपाखरं हरणदोडीच्या आसऱ्याला असतात (host plant).
आम्ही राहातो त्या परिसरात अगदी घराच्या अंगणात म्हणावी अशी एक टेकडी आहे. टेकडीवर चढून थोडं सपाटीवर चालत गेलं की गर्द हिरवं रान सुरु होतं. या रानाची, इथे नांदत असलेल्या अदभुत वनस्पती-प्राणी-कीटकविश्वाची ओळख करून घेण्याच्या आमच्या प्रवासातले काही आनंदक्षण तुम्हा सर्वांबरोबर साजरे करण्यासाठी हा ब्लॉगप्रपंच! - रुपाली, अश्विनी
Labels
- Arbrus precatorius
- asperagus
- Cassia tora (तरोटा)
- Chinese lovegrass
- Dregea volubilis
- gard sabhoti
- Lagerstroemia
- Pterocarpus marsupium
- कहांडळ
- कांडोळ sterculia urens
- केकताड
- गर्द सभोती
- गुंज
- घायपात
- चिलार
- टिटवी
- दीपमाळ
- दुरंगी बाभूळ
- धावडा
- नाणा
- बिबळा
- बीजा
- बोंडारा
- मुरुडशेंग
- शतावरी
- सिगमकाटी
- सीतेचे पोहे
- हरणदोडी
Showing posts with label Dregea volubilis. Show all posts
Showing posts with label Dregea volubilis. Show all posts
Saturday, 19 June 2021
जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती!
अतिशय गुणी, देखणी असूनही कोणाला फारशी माहिती नसलेली अशी ही वेल आहे. साधारण एप्रिल - मे मधे वेलीवर कळ्यांची झुंबरं लटकू लागतात आणि पुढे बरेच दिवस ही वेल फुलत राहाते. तजेलदार हिरव्या-पोपटी रंगाची, एकमेकींना जोडलेल्या जाडसर पाच किंवा सहा पाकळ्यांची, अगदी एखादा सेंटीमीटर आकाराची हरणदोडीची फुलं विलक्षण सुंदर दिसतात. जडावाची पाचुफुलं! umbel म्हणजेच छत्रीच्या आकाराच्या गुच्छात ही फुलं येतात. फुलाच्या मध्यभागी पुंकेसर-स्त्रीकेसरांच्या जागी नुसतेच खडे जडवल्यासारखे दिसतात. ही या Asclepiadaceae कुळातल्या फुलांमधली एक अनोखी रचना असते. ती म्हणजे, या फुलांच्या पुंकेसरांत सुट्या परागकणांऐवजी एकमेकींना बारीक धाग्याने जोडलेल्या दोन परागपिशव्या असतात. परागीभवन करणारा कीटक फुलावर बसतो, त्यावेळी पिशव्यांना जोडणारा धागा कीटकाच्या पायात अडकतो आणि त्याच्याबरोबर दोन्ही परागपिशव्या आतले परागकण वाया न जाता निगुतीने दुसऱ्या फुलाकडे पोचत्या होतात (कशी गुणाची बाय ती हरणदोडी!) स्त्रीकेसरात दोन बीजांडकोश असल्याने फळेही एका देठावर जोडीने येतात. फळांवर, पानांवर छान मऊ लव असते. फळे उकलतात त्यावेळी आतल्या चंदेरी केसांच्या म्हाताऱ्या वाऱ्यावर तरंगत दूरदूर जातात.
निलिमा जोरवरांच्या रानभाज्यांच्या पुस्तकात या फुलांच्या भाजीची कृती दिलेली आहे. त्यांनी तर ही फुलं सलाडसारखी वापरतात असंही दिलं आहे. दक्षिणेकडे हिच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. बंगालात हिला ’जुकती फूल’ म्हणतात आणि ही फुलं तिथे बाजारात विकायलाही येतात!. या जुकतीच्या फुलांचा उपयोग तिकडे भाज्यांच्या स्ट्यु्ला किंचित कडवट चव येण्यासाठी करतात
(https://www.euphorhea.com/2018/03/sukto-with-jukti-phool.html ).
फुलांची भाजी आणि फुलं घालून केलेला स्ट्यु हे दोन्हीही माझ्या ’एकदा करून बघायचं आहे' च्या यादीत आहेत. हरणदोडीची संस्कृत नावं तर कमालच - हेमजीवन्ती, हेमक्षीरी, हेमलता, हेमपुष्पी, हेमवल्ली, हिमवती, जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती, क्षुपडोडमुष्टि, मधुरसा, मधुस्रव, शाकश्रेष्ठ, शार्ङ्गेष्टा, सुमङ्गला, स्वर्णजीवा, स्वर्णलता.....आणखी कितीतरी. यातले हेम, स्वर्ण या शब्दांचा संबंध हिच्या पाना-खोडातल्या पीतवर्णी चिकाशी आहे. हिला शाकश्रेष्ठाही म्हणलंय. पोषणमूल्य भरपूर असणारी ही भाजी आहे. हिचं आणखी एक मजेशीर नाव म्हणजे नाकशिंकणी- sneez wort! हरणदोडीच्या मुळ्यांचा रस नाकात गेला तर शिंका येतात (म्हणे) म्हणुन ही नावं. हरणदोडी या नावामागचं काय कारण असावं ते मात्र कळत नाही. महाजन सरांच्या पुस्तकात दिलंय की हिची जोडीने येणारी फळं हरणाच्या शिंगांसारखी दिसतात, म्हणून हरणजोडी वरून हिचं नाव हरणदोडी पडलं असावं. ...हिरवागार हरणटोळ साप आणि ही हिरव्यागार फुलांची हरणदोडी यांच्या नावातल्या ’हरणाचा’ हिरव्या रंगाशी संबंध असावा का?
मुळ्या, पानं, फुलं सगळ्याचे खाद्य आणि औषधी उपयोग असणारी; मुंग्या, फुलपाखरं, पक्षी - सगळ्यांचा गोतावळा सांभाळून असणारी; शिवाय स्वतःचा संसारही टुकीनं, नीटनेटका करणारी ही हरणीबाई सध्या तिचा जडावाच्या पाचूफुलांचा हिरवा साज ल्याली आहे. आधाराच्या वृक्षांवरही तिने मखमली पानांची पाखर घातली आहे. हरणवेलीचं हे प्रसन्न रूप आणि परिसंस्थेतलं तिचं महत्वपूर्ण स्थान अनुभवलं की जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती अशी तिची नावं किती अर्थवाही आहेत हे जाणवतं; आणि हे परिसरवैभव टिकवून ठेवणं किती आवश्यक आहे, हे ही.
-अश्विनी केळकर
--------------------------------
हरणदोडी/ हरणवेल
Botanical name: Dregea volubilis (Drege हा जर्मन वनस्पतीतज्ञ होता, तर volubilis म्हणजे twining/ आधाराभोवती गुंडाळत वर चढणारी)
Family: Asclepiadaceae (Milkweed family)
-------------------------------
#tekdi
Subscribe to:
Posts (Atom)
-
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी। रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी। रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे। अजुनी पहा या मंडित त्यांनी कोक...
-
कालच चैत्राली चांदोरकर यांनी पर्यावरण दिनानिमित्ताने लिहिलेल्या पोस्टमधे महाजन सरांची मुलाखत वाचली. त्यात त्यांनी महावेलींबद्दल सांगितलं आह...


