Showing posts with label गर्द सभोती. Show all posts
Showing posts with label गर्द सभोती. Show all posts

Friday, 28 October 2022

कान्हाळाची राई/ Myristica Swamps

लाखो वर्षांपासून हा अधिवास अस्तित्वात आहे. अगदी डायनोसोर होते, तेव्हापासून. 

झाडांना फुलं यायला सुरुवात झाली आणि सपुष्प वनस्पतींचा वंश पृथ्वीवर नांदू लागला, तेव्हापासून.

भूस्तरांच्या उलथापालथी होत लाव्हारसापासून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला, त्याच्याही आधीपासून.

Myristica swamp! गोड्या पाण्याचा, दलदलीचा, दाट हिरव्या जंगलाने झाकलेला अधिवास. Myristica ही सपुष्प वनस्पतींच्या म्हणजे angiosperm च्या Magnoliid वंशातील, Myristicaceae कुळातील एक प्रजाती. पृथ्वीवर जन्माला आलेल्या पहिल्या सपुष्प वनस्पतींचा हा वंश. आपलं जायफळ हे myristica प्रजातीतील. Myristica swamp मधे इतर वृक्षांबरोबर जायफळाच्या कुळातले वृक्ष प्रामुख्याने आढळतात.

लाखो वर्षांपासून निरनिराळ्या आपत्तींना यशस्वीपणे तोंड देत तगून राहिलेला हा अधिवास आज जवळजवळ ९०% संपून गेला आहे. काही थोडे तुकडे पश्चिम घाटात आणि अंदमान - निकोबार मध्ये शिल्लक राहिले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'कान्हाळाची राई' ही महाराष्ट्रात उरलेली एकमेव Myristica swamp आहे. दिवाळीत ही अद्भुतसुंदर राई पाहायला मिळाली. 


भाताच्या शेताच्या कडेकडेने, बांधावरून तोल सांभाळत राईजवळ पोचायचं, तिथे पायातले शूज उतरवून, चप्पल किंवा फ्लोटर्स घालून किंवा अनवाणीच स्थानिक माहितगाराबरोबर राईत जायचं. राईतुन दहा वाटांनी पाणी बाहेर धावत असतं. त्यातल्याच एका ओहोळाचा हात धरून राईत जायचं. 

पाण्यातून चुबुक चुबुक आवाज करत आत जाताजाता आपण अंधाऱ्या, गूढ वातावरणात प्रवेशतो. इथले तपकिरी शेवाळी बुंध्यांचे वृक्ष सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत उंचच उंच वाढत जातात. बारमाही वाहणाऱ्या पाण्यात टिकून राहाण्यासाठी त्यांच्या बुंध्यातूनच असंख्य मुळांचे पाय फुटतात. हे मुळांचे पाय तिरके वाढून जमिनीत घुसतात आणि झाडाला आधार देतात. इथल्या Gymnocrantha canarica (Kanara nutmeg) च्या जमिनीखाली आडव्या वाढणाऱ्या मुळांना जमिनीवर येणारे उभे फुटवे फुटतात. जमिनीवर काही उंचीपर्यंत वाढून, यु टर्न घेऊन ही Knee roots पुन्हा जमिनीत घुसतात आणि झाडाला आधार देतात. झाडाला आधार देण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी त्यांच्यावर रंध्रे असतात. सतत पाण्याखाली असणाऱ्या इथल्या जमिनीतील ऑक्सिजनच्या अभावामुळे मुळांमध्ये घडून आलेलं हे अनुकूलन (adatptation). 

Knee roots of Gymnocrantha canarica

                                                 

जमिनीतून वर येऊन पुन्हा खाली वळलेले knee roots

मोठ्या प्रमाणात आढळणारा जायफळाचा आणखी एक भाऊबंद म्हणजे Myristica fatua. याचं नावच Magnificent Nutmeg! कसलं भारी ना? याच्या फळाच्या टणक फळ आवरणाच्या आत आणखी एका लालभडक, चिवट आवरणाच्या आत बी असते. जशी जायफळाच्या आत जायपत्री असते, तशी ही रामपत्री. या रामपत्रीसाठी इथले खेकडे ही फळं आपल्या बिळात खोल नेतात. लाल रामपत्री खातात आणि बिया तशाच ठेवतात. बऱ्याच बिया तिथेच रुजतात.   

रानजायफळ

जायफळाच्या भाऊबंदांच्या जोडीला इथे रानबिब्बा (Holigarna arnottiana), वेत (Calamus pseudotenuis), धेड उंबर (Ficus hispida), भेर्ली माड (Caryota urens), सरळसोट झाडांच्या बुंध्यांवर नाजूक चिवटपणे चढलेल्या बेंदर्लीच्या वेली (Pothos scandens) ही मंडळीही दिसली. 

Myristica swamp हा अनेक उभयचरांचा अधिवास आहे आणि त्याबरोबरच, त्यांच्यावर जगणाऱ्या भक्षक प्राणी-पक्ष्यांचाही. आम्ही राईत हिंडत असताना एका blue eared kingfisharने दर्शन दिलं. इथे तिबोटी खंड्या, म्हणजेच oriental dwarf kingfisher ही हजेरी लावतो ही माहितीही कळली. 

कान्हाळाच्या राईच्या एका बाजूला प्रचंड प्रमाणात रबर लागवड झाली आणि राईतलं पाणी कमी झालं. पूर्वी कमरेइतक्या पाण्यातून चालावं लागे, तिथे आता जेमतेम घोट्याच्या वर पाणी असतं. पूर्वी इथे दिवसाही अंधार असे. आता प्रकाशाचे कवडसे जमिनीपर्यंत येतात. गेल्या वर्षी २.५९ हेक्टर क्षेत्राच्या या कान्हाळाच्या राईला ’जैविक विविधता वारसा स्थळ (biodiversity heritage site)’, म्हणून राज्य सरकारची मान्यता मिळाली. स्थानिकांनी राईला देवराई म्हणून जपले आहेच, शिवाय तिच्या संवर्धनासाठीही ते प्रयत्न करत आहेत. रबराचे मळे, भातशेती, काजूच्या बागा, सुपारीच्या बागा, या सगळ्यांच्यामधे कान्हाळाची राई जीव मुठीत धरून जगते आहे. तिने आजवरच्या सगळ्या नैसर्गिक उत्पातांना तोंड दिलं पण या आपत्तीपुढे मात्र ती हतबल झाली आहे. तिच्या संवर्धनासाठी योग्य प्रयत्न झाले नाहीत, तर हा प्राचीन वारसा आपण गमावून बसू. 

- अश्विनी केळकर 

 
बेंदर्ली वेल




अधिक वाचनासाठी: 

https://www.natureinfocus.in/western-ghats-on-the-edge/the-primitive-swamp-forests-of-the-western-ghats
यात एक छोटीशी documentary आहे, जरूर बघा.

Crabs and Myristica seeds:
https://www.jstor.org/stable/43831721

Floristic study:
https://www.researchgate.net/publication/356186756_Studies_on_Northernmost_Myristica_Swamp_Ecosystem_in_Western_Ghats_at_Bambarde-Hewale_Maharashtra_India

Saturday, 12 March 2022

दिल हूम हूम करे...

अर्थाअर्थी काही संबंध नसताना कधी कधी काही गाणी उगाचच मनात वस्तीला येतात. झाडाच्या नावाशी असलेल्या उच्चारसाधर्म्यामुळे असेल किंवा 'हूम हूम' च्या नादातल्या गंमतीमुळे, त्या दिवशी हुमाच्या/ हुंबाच्या झाडांपाशी रेंगाळताना हे गाणं मनात वाजत राहिलं आणि त्यातल्या ओळीही -

तेरी झोरी डारूँ, सब सूखे पात जो आए

तेरा छुआ लागे, मेरी सूखी डार हरियाए

दिल हूम हूम करे...

माझ्या फांद्यांवरची सगळी हिरवी पानं झडून गेली आहेत. ही सगळी सुकलेली पानं, सारं शुष्कपण तुझ्याच झोळीत देईन. मला फक्त तुझा एक स्पर्श हवाय. संजीव स्पर्श. त्या स्पर्शानं माझ्या सुकलेल्या फांद्याफांद्यांमध्ये हिरवं चैतन्य सळसळणार आहे.

टेकडीच्या उतारावर एकाच ठिकाणी हुंबाची आठ-दहा झाडं एकत्र उभी आहेत. आत्ता या झाडांचा फुलण्याचा काळ, म्हणून फुलं बघायला आम्ही आलो आहोत. सगळी झाडं निष्पर्ण, कळाहीन. खडबडीत, शुष्क, काळेभोर बुंधे आणि सगळ्या झाडांच्या तळाशी सुकलेल्या पानांचा खच. काही बुंध्यांवर घाव घालून ते तोडून नेलेले. जरा उदास वाटू लागलं. यावर्षीही नाहीतच फुलं बघायला मिळणार. पुढे उतारावर आणखी एका झाडाकडे लक्ष गेलं. त्याचीही सगळी पानं झडलेलीच, पण काळ्या कुळकुळीत फांद्यांवर तुरळक कुठेतरी बारीक बारीक पोपटी पालवी फुटू पाहाणारी, आणि अगदी शेंड्यापर्यंत कोवळ्या, तांबूस कळ्यांचे छोटे छोटे लोलक वाऱ्याबरोबर डुलत असलेले! काही लोलक उघडून तीन पाकळ्यांची अंजिरी रंगाची फुलं हसत असलेली! नवलच! हुंबाच्या फुलांची आम्ही दरवर्षी वाट पाहातो. कधीतरी एखादं फूल डुलताना दिसतं आणि सुकून जातं. यावर्षी मात्र पहिल्यांदा याला असं फुललेलं पाहिलं, तेही अशी सगळी पानं गळून गेलेली असताना. या एकट्यालाच तो संजीव स्पर्श कुठून मिळाला बरं? काय घडलं की हे एकटंच वेडं झाड असं अंजिरी हसू लागलं? की त्याला गरजच नाहीये कोणाच्या स्पर्शाची? त्याला जाणीव आहे आपल्या आतल्या चैतन्याची?

टेकडीवरच्या झाडीत या हुंबाच्या आठदहा झाडांच्या बेटाशिवाय आणखीही कुठेकुठे हुंबाची छोटी झाडं आहेत. इथल्या एका झाडाची फुलं हिरवट-पोपटी रंगाची आणि पाकळीवर मधोमध तपकिरी रेघ असलेली आहेत, तर एकाची अंजिरी रंगाची. या फुलांना साधारण केळफुलासारखा सूक्ष्म वासही आहे. अगदी छोटी, दीड सेमी आकाराची फुलं, तीन दलांची तीन मंडलं. सर्वात बाहेरचं मंडल छोट्या, हिरव्या निदलपुंजाचं (sepals). त्यानंतरच्या मंडलातल्या तीन पाकळ्या हिरव्या रंगाच्या आणि निदलपुंजासारख्याच भासणाऱ्या, पण त्यापेक्षा थोड्या लांबट. आणि आतल्या मंडलातल्या तीन पाकळ्या मोठ्या आणि रंगीत. सर्वात आत पिवळ्या परागकोषांचे ठिपके. कधी कधी एखाद्या चुकार फुलात चार रंगीत पाकळ्याही दिसतात. फुलांचे देठ लांब, लवचिक आणि वळणदार. वाऱ्याच्या लहरींबरोबर फुलांना डुलवत ठेवणारे. याची जाड देठांची, गुच्छात येणारी गोल हिरवी फळं पिकल्यावर काळपट-तपकिरी झाली की खातात. गोडसर चवीची आणि चिकट गराची ही फळं खाल्ली की जीभ काळीभोर होणार. आमच्याइथल्या झाडांवरची पिकलेली फळं खाण्याचा योग मात्र अजूनतरी आलेला नाही. सीताफळाच्या (Annonaceae) कुळातल्या, हूम/ हुमा/ हुंब/ हुंबा/ करी/ थोस्का अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या झाडाचं शास्त्रीय नाव - Miliusa tomentosa. यातल्या tomentosa चा संबंध हलकी लव असलेल्या पानांशी, तर Miliusa चा संबंध १५४७ साली De Hortorum Cultura हे उद्यानकलेवरचं पुस्तक लिहिणाऱ्या Josephus Milius Vottolinus याच्याशी. हे झाड अनेक प्रकारच्या फुलपाखरांचं पालक झाड (host plant) अहे असंही वाचनात आलं.




whatsapp वर पुण्यातल्या दुर्मिळ झाडांबद्दलची एक पोस्ट बरेचदा वाचनात येते. त्यात पुण्यात हुंबाचे केवळ दोनच वृक्ष आहेत, आणि ते सिंहगड रस्त्यावर आहेत असं लिहिलेलं आहे. हुंबाची झाडं तशी पटकन नजरेस येत नाहीत, म्हणूनही असेल कदाचित, पण टेकडीवर याची पुष्कळ झाडं असूनही त्यांची नोंद घेतली गेली नसावी. फळं/ फुलं नसतील तर आमच्यासारख्या हौशी नवशिक्यांना हे झाड ओळखता येणंही कठिण. त्यामुळेच, जेव्हा ही झाडं पहिल्यांदा पाहिली, त्यावेळी आम्हाला ती कोणती हे कळलं नव्हतं. वेताळ टेकडीवरच्या वनस्पतींवर पुस्तक लिहिणारे डॉ. सतीश फडके यांनी आम्हाला त्याची ओळख करून दिली. टेकडीवर हे झाड फुललं आहे असं संगितल्यावर झाडाफुलांवर मनस्वी प्रेम करणाऱ्या उषाताई - उषःप्रभा पागे - "मी पाहिली आहेत ही फुलं यापूर्वी, पण आपल्या टेकडीवर फुलली आहेत तर कौतुक करायला हवं" असं म्हणत धावत टेकडीवर आल्या. मग त्या झाडाचे किती फोटो आणि कौतुकसोहळा!

जिथे ही आठ-दहा झाडं एकत्र उभी आहेत, तिथे दोन झाडं बुंध्यापासून कोणीतरी कापली आहेत ही एक जाताजाता नोंद. टेकडीवर इतक्या उलथापालथी चालू आहेत, की एक दिवस बघताबघता हे हुंबाचं बेट जमीनदोस्त झालं, तरी धक्का बसायला नको.

- अश्विनी केळकर

#tekdi

Friday, 15 October 2021

आपट्याचं झाड आणि सोनपाखरं

...

एकदा तर ते घर मला गेल्या जन्मात घेऊन गेलं. त्या वेळी मी पक्षीण होते. सुगरण. आमच्या लग्नाआधी, "हे पाहा मी तुझ्यासाठी किती खोपे बांधतोय - त्यांतला हवा तो निवड" म्हणून सांगत ’तो’ माझ्यापाशी आला तो स्वतःच हळदिवा होऊन. बाभळीच्या काटेरी झाडावरच्या त्या सुरक्षित घरांची अंतरंगंही किती मऊ मुलायम होती! माझ्या स्वप्नातल्या बाळांच्याच स्पर्शासारखी जणू! मीही मोहरून मग त्याच्याजवळ गेले तेव्हा तो आणखीच साजरा दिसू लागला होता. त्या वेळीही हवा पावसाळीच होती. पिवळ्या तेजस्वी उन्हांचा सारा अर्क त्यानेच शोषून घेतला म्हणून का आभाळ तसं भरून आलं असेल आणि ढगांच्या पापण्या ओलावल्या असतील?

(सुनीता देशपांडेंच्या "आहे मनोहर तरी... मधून) 

.....

टेकडीवरच्या झाडांवर लटकलेली सुगरणींची असंख्य घरटी पाहाताना सुनीताबाईंचा हा हळदिवा पक्षी मनात रुंजी घालत असतो. 

गेल्यावर्षी आपट्याच्या झाडांवर सुगरणींची बरीच घरटी होती. अगदी पूर्ण बांधलेली. यावर्षीही त्याच झाडांवर जून महिन्यात त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली. टेकडीवर शिंदीचीही झाडं आहेत. त्याच्या चिवट पानांचा एकेक धागा काढून ते धागे त्यांनी घरट्यासाठी वापरले. सगळी घरटी झाडाच्या पूर्व दिशेच्या पसाऱ्यावर. शिंदीच्या झाडाकडून आपट्याच्या झाडाकडे अशा त्यांच्या कितीक फेऱ्या झाल्या असतील. एकेक हिरवा धागा काढून, तो घरट्य़ात आणून गुंफायचा. माना वेळावत, उलटंपालटं होत, तो नीट गुंफ़ला गेलाय ना याची खात्री करून घ्यायची. सोबतीला सततचा चिवचिवाट. किती लोभस! 

 





काही काळ गेला आणि त्यांना कोणत्या अरिष्टाची चाहूल लागली माहिती नाही. पुढच्याच महिन्यात पाहिलं, तर आपट्याच्या झाडावरची सगळी घरटी  तशीच अर्धवट सोडून त्यांनी इतर झाडांकडे मोर्चा वळवला. यावर्षी टेकडीच्या पायथ्याचं एक बाभळीचं झाड त्यांनी निवडलं होतं. आसपास अगदी नरकघाण कचरा असणारं. त्या झाडावर त्यांचे संसार फुलले. 

आता आपट्याच्या झाडांवरची त्यांची ती अर्धवट बांधलेली घरटी वाऱ्यापावसात नष्ट झालेली आहेत. दसऱ्यानंतर टेकडीवर गेलं की आपट्याची झाडंही दरवर्षीप्रमाणेच ओरबाडलेली, फांद्या तोडलेली, बोडकी दिसतील. ही झाडं या सोनपाखरांमुळे आणि सोनपाखरांसाठी फुलता्त हे आपल्या गावीही नसेल.      

पण माणसं कशीही वागली, तरी झाडं काही मनात ठेवणार नाहीत. शक्य असेल तोवर पुन्हा पुन्हा सगळी शक्ती एकवटून फुलत राहातील, बहरत राहतील, हळदिव्या, सोनेरी पक्ष्यांना बोलावत राहतील. नवनिर्मितीचा उत्सव जागता ठेवतील. 

.....

दसऱ्यानिमित्त अनेक शुभेच्छा!!

- अश्विनी केळकर

 

.....

#tekdi

Saturday, 14 August 2021

दिवस आणि रात्रीच्या सीमेवरचा, सोहळा चांदणं फुलण्याचा!


 

दिवस आणि रात्रीच्या सीमेवरचा,
सोहळा चांदणं फुलण्याचा!

--रूपाली भोळे 

आमच्या टेकडीवर एक आजोबा रहातात. त्यांच्या झोपडीच्या पूर्वेकडे मोईचं बन आहे. मोईच्या बनात अधुनमधून आपटा, खैर. आणि ही जागा विशेष लक्षात रहाते, ती लाल-तांबड्या आईन्यामुळे. मोईची झाडं आता पसरून त्यांचा विशिष्ट घेर जाणवू लागलाय. एका ठिकाणी तर चारपाच जणींनी एकत्र येऊन त्यांच्या फांद्या जमिनीकडे टेकवून त्यांचा घुमट किंवा डोम तयार केलाय. पावसात, उन-वाऱ्यांत सुरक्षितपणे त्याच्या आत राहता येईल असा. आम्हाला भूलवणारे मोरांचे आवाज कादाचित इथूनच येत असावेत. मोईच्या बुडाशी वासनवेली, द्राक्षवेली, अनेक प्रकारची गवतं, रानभेंडी यांचंही अस्तित्त्व अनेक पक्ष्यांच्या, किटकांच्या पुढील पिढ्यांना संरक्षित करताहेत. काही ठिकाणी मोईच्या पानांना चाळणी प्रमाणे छिद्रे दिसत आहेत.

मोईचं बन 

जून महिन्यात टेकडीवर गेलो होतो तेव्हा एका मोईच्या झाडाला वेढलेली एक वेल का कोण जाणे पण लक्षात राहिली. तशी तिची आणि माझी पहिली ओळख गेल्या वर्षीच झाली होती




लहान बाळाच्या हाताच्या तळव्याएवढी पानं, त्यावर जणू छान कोरीव मेंदी काढल्याप्रमाणे ठळक जांभळ्या रेषा. आजोबांच्या झोपडीला पाठ करू उभं राहिलं आणि डावा हात सरळ आणि उजवा काटकोनात वळवून उभं राहिलं की बरोबर हाताच्या टोकांच्या दिशेनं या दोन वेली सापडतात.   

या वेलीचा किंचित पांढरट खोडाचा पीळ मोईला घट्ट बिलगून होता, विळखा म्हणता येईल असा.   

वेलीच्या फांद्या जांभळ्या, बारीक, शिडशिडीत. मोईला बिलगून, घट्ट वेढून सरासरा चढली असेल वेल, असं वाटत होतं. ही वेल फांजीची वेल म्हणून मला माहित होती. याच्या पानांच्या वड्या करतात, भाजी करतात, म्हणून ही माहित होती.




पानांची मांडणी एका आड एक दिसून आली, फुले आलेल्या वेलीची पाने तशी आकाराने लहान वाटली, बदामाच्या आकारासारखी, पाने आणि कोवळ्या फांद्या किंचित लवयुक्त दिसल्या. पानांना मध्यातून  घडी घातली असल्याप्रमाणे अर्धवट मुडपलेली, स्पष्ट जांभळी मुख्य शीर. 

पानांवर काही बारीक काळे केसांसारखे तंतू दिसून आले होते. पण ते काय असेल हे काही लक्षात येत नव्हतं. नेहमी जाता-येता तिची ख्याली-खुशाली विचारून पुढे जायचो.  तिचं खोड, फांद्या, पानं, पानांवरची बारीक नक्षी डोळ्यात साठवायचो. पण काही केल्या फुलं काही दिसेच ना, सकाळी आम्ही जेव्हा जायचो, तेव्हा सगळी फुलं कोमेजून गेलेली, कधी दिसतील हिची फुलं?

मध्येच ऑगस्टच्या सुरुवातीला डावीकडच्या वेलीवर अजून असंख्य केसांसारखे तंतु पानांना चिटकलेले दिसून आले 
,वेगळीच बुरशी दिसतेय अस काहीसं वाटू लागलं, 

उजवीकडच्या दुसऱ्या वेलीवर मात्र काही कळ्या दिसून आल्या. पण फुलं नाहीच.

नंतर कधीतरी कळलं, हिचंच दुसरं नाव म्हणजे - सांजवेल, म्हणजे संध्याकाळी उमलणारी.

मग ठरवंल, संध्याकाळी जाऊन बघूया.



संध्याकाळी आम्ही टेकडीवर पोचलो, तेव्हा साधारण सहा वाजले असावेत. सांजवेलीला अनेक कळ्या लगडलेल्या होत्या. आणि कळ्यांच्या टोकांवर अनेक बारिक-बारिक किडे, माश्या बसलेल्या दिसत होत्या. कळ्यांच्या अवतीभवती रेंगाळत होत्या.   

 Golden Tortoise Beetle  

कळ्या अजून फुलण्याची काही चिन्हं दिसत नसल्यामुळे, अश्विनीला म्हटलं, ‘चल, तोवर ती केसाळ तंतु असलेली वेल बघून येऊ या’. थोड्या अंतरावरची ती वेल आम्ही बघायला निघालो. निट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं, की पानांवर मागे जे काळे तंतू दिसून आले होते, ते खरं तर सोनेरी कासवकिड्यांचे कोष (Golden Tortoise Beetle) होते. त्यांच्या खालून कासवकिडे येऊन पानं गट्टम करत होते.    

आम्ही हात लावल्याबरोबर ते दोन-तीन साकव किडे खाली पडले, जणू काही त्यांनी मेल्याचं सोंग केलं. ह्या कासवकिड्यांना प्लास्टिकसारखं ट्रान्सपरंट पांढरं वलय होतं आणि मध्ये पेरभर लांबीचे कासवकिडे. कासवकिड्याच्या समूहाने सबंध वेलीची पानेच्या पाने कुरतडून खाल्ली होती ,




दरम्यान दुसऱ्या वेलीवरची फुलं आता फुलली असतील म्हणून आम्ही परत उजव्या वेलीकडे निघालो. आणि लांबूनच आम्हाला मोठ्ठीच्या मोठी, टप्पोरी, पांढरी फुलं दिसू लागली. हे सगळं दृश्यच एवढं विलक्षण होतं की, आजुबाजूचा संधीप्रकाश, भवतालातले वेगवेगळे रंग, आकाशाच्या विविधरंगी छटा, पक्ष्यांची गाणी, खाली-वर होत जाणारी क्षितीजरेषा ह्या सगळ्यांनी मिळून जणू ती वेल तयार झाली आहे, असंच भासत होतं. आम्ही वेलीजवळ जाऊन पोचलो. वेलीवर काही फुलं फुललेली होती, पण काही मात्र अजून कळ्याच होत्या. एका टपोऱ्या कळीकडे आम्ही निरखून पाहू लागलो. आमच्यासारखेच कळीच्या आजुबाजूला दबा धरून बसलेले छोटे छोटे किटक, माश्या ती कळी उमलण्याची वाट पहात होत्या. आणि . . 

.

 . . आणि त्या स्वर्गिय क्षणाच्या आम्ही साक्षिदार झालो. आमच्या डोळ्यांदेखत ती इवलिशी कळी हळूहळू उमलत गेली आणि तिचं एका देखण्या, टप्पोऱ्या, डौलदार फुलात रुपांतर झालं. सृष्टीचा हा नयनमनोहर चमत्कार आम्ही थेट बघत होतो, प्रत्यक्ष ! मग अजून एक, अजून आणखी एक. एका पाठोपाठ एक कळ्या उमलत होत्या, अंधुक होत चाललेल्या वातावरणात गर्द, दाट हिर्व्या पानांच्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग परीघ वाढवत दिसू लागला. एकेक फुल फुलू लागताच संपूर्ण आसमंत त्या फुलांच्या मंद मादक वासानं सुगंधीत होऊ लागला. आणि एकेक फुल जसंजसं उमलायचं तसंतशी फुलाच्या आतल्या मधावर डल्ला मारायला आजुबाजू्च्या किड्यांची फौज फुलाच्या घेऱ्यात भस्सकन शिरायची. जादूने भरलेला-भारलेला सोहळा आपल्या डोळ्यांनी, नाकांनी किती टिपू आणि किती नको, असं आम्हा दोघींना झालं. टेकडीनं आम्हाला हा सुखाचा क्षण बहाल केला होता, तो आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. आपण राहतो त्या परिसरात एवढ्या अमूल्य गोष्टी आहेत, केवळ काही पावलं चालून जाताच सृष्टीचा हा चित्तचक्षुचमत्कारिक सोहळा आपण स्वादू शकतो, अनुभवू शकतो - याचंच अप्रूप वाटत राहतं.

 



निसर्गानं प्रछन्नपणे मांडलेल्या या उत्सवाला पुन्हा अनुभवण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पावलं आपसूकच टेकडीकडे वळली. संध्याकाळ खरंतर होऊन गेली होती, कालच्यापेक्षा जरासा उशिरच झाला होता. बरीचशी फुलं तर उमलूनही गेली असतील. आम्ही पटापटा टेकडी चढू लागलो. पायाशी येणाऱ्या दगड-धोंड्यांची तमा बाळगता, चिखल, राडा-रोडा तुडवत कशातरी आम्ही एकदाच्या वेलीपर्यंत पोचलो. आणि उमलणारी फुलं बघतबघत शांत झालो.

 

सांज, संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्रीला जोडणारा काळ, उजेड आणि अंधार यांच्यामधला पुल. सांज जसजशी ढळत जाते, रात्रीच्या अंधाऱ्या चादरीवर एकेक चांदणी चमकू लागते. एकेक करता करता सगळं आकाश चांदण्यांनी फुलून जातं. रात्र हळूहळू उमलू लागते. संध्याकाळी सांजवेलीवर फुलं उमलतात नी वाऱ्यासोबत त्यांचा सुगंध आकाशाला जाऊन भिडतो. रात्रीच्या वेळी आकाशात चांदण्या फुलण्याचा प्रवास सांजवेलीच्या फुलण्यापासूनच तर सुरु होत नसावा?   

 ---------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय नाव: Rivea hypocrateriformis, Convolvulus hypocrateriformis

कुळ: Convolvulaceae

Midnapore Creeper, Commom night glory, कल्मीलता

स्थानिक नावे: मराठी: फांग, फांजी, तमिळ: मुसुटाईकोडी बुधीकीराई, कानडी: बोड्डी कुरा

Hypocrateriform:  hypo म्हणजे खालच्या बाजूला, आत, crater म्हणजे bowl वाडग्या सारखं आणि form म्हणजे आकार. जुन्या ग्रीक भाषेतल्या शब्दावरून हे नाव तयार झालेलं असून त्याचा ढोबळमानानं अर्थ वाडग्यासारख्या आकाराखाली आधारासाठी नळीसारखा भाग असतो, अशी फुलं.   

या सदाहरित वेलीची पाने आणि कोवळे शेंडे भाजी साठी वापरतात, तर मुळे आणि बिया, खोड  औषध म्हणून त्वचा विकार, डोकेदुखी, खोकला अशा अनेक विकरांवर गुणकारी असल्याचे वाचनात आले.

 

रूपाली भोळे, proopalee@gmail.com

15 ऑगस्ट 2021