स्थॉले जॉले बॉनोतोले लागलो जे दोल - दार खोल दार खोल..
(रवींद्रनाथ ठाकुर, गीतांजली, https://www.youtube.com/watch?v=8CbfAH_YlvE )
बंगालमधे गायलं जाणारं हे वसंतोत्सवाचं गीत! वनावनात, पानाफुलात वसंतवारे वहात असताना; सृष्टी वसंतोत्सव (दोल, दोलोत्सव) साजरा करीत असताना; त्याकडे पाठ फिरवून, मनामनांची, घराघरांची कवाडं घट्ट लावून बसलेल्यांना या आनंदात सामील होण्यासाठी केलेलं आवाहन!
...आज घराची कवाडं उघडून त्या वा-याचं स्वागत करायला खरेतर सगळे आसूसलेले आहेत पण प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात कोरोनाच्या आजाराने या ना त्या प्रकारे आपली काळी पावलं उमटवलेली असताना ना घराची दारं उघडता येताहेत, ना मनाची.
सृष्टीचा वसंतोत्सव मात्र स्थॉले जॉले बॉनोतोले अगदी ऐन भरात आहे.
मागच्या एका लेखात (गगनास गंध आला) टेकडीवरच्या बोंडा-याचा/ नाण्याचा उल्लेख केला होता. बोंडारा मेंदीच्या म्हणजे Lythraceae कुळातला. महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या तामणाचा भाऊबंद. फुलं तामणासारखीच, पण शुभ्र पांढरी, तामणापेक्षा छोटी आणि सुवासिक. सहा दलांच्या calyx वर सहा सुट्या पाकळ्या आणि त्यात मधोमध उभ्या असलेल्या आकडीदार स्त्रीकेसराभोवती असंख्य पुंकेसर. त्यातही पुंकेसरांचं बाहेरचं मंडल टोकाला हलका जांभळा रंग असलेल्या थोड्या जास्त उंचीच्या केसरांचं. आतले केसर कमी उंचीचे आणि पिवळ्या परागांच्या टोप्या घातलेले. सुरेख रचना!
फुललेला बोंडारा |
फुललेला नाणा/ बोंडारा मी यावर्षी पहिल्यांदा पाहिला. गेले वर्षभर आम्ही त्यावरची लांबट छोटी फळं बघत होतो. फळांचा आकार थेट Ice Age मधल्या खारोटीच्या तोंडातल्या अॅकोर्नची आठवण करून देणारा. फळं सुकली आणि चार भागात उकलली. आतल्या चार कप्प्यांमधे शिस्तीत उभ्या रचून ठेवलेल्या एक पंखाच्या बिया वा-याबरोबर रानोमाळ उडून गेल्या आणि जानेवारीच्या अखेरीस झाडावर बारीक बारीक कळ्यांचे मणी दिसू लागले.
कळ्या आलेल्या फांद्यांची रचनाही शिस्तबद्ध. फांदीवर दोन पाने समोरासमोर. त्याच्या बेचक्यातून फुटलेल्या दोन ते चार शाखा. त्या प्रत्येक शाखेला त्याच शिस्तीत फुटलेल्या आणखी उपशाखा आणि प्रत्येक उपशाखेच्या टोकाला कळ्यांचं त्रिकूट!
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आता बोंडारा फुलला असेल अशा अंदाजाने झाडाकडे गेलो. सगळं रूपच पालटलं होतं त्याचं!. पालवीचा पोपटी रंग झाकत झाड पूर्ण शुभ्र झालं होतं. झाडाजवळ गेल्यावर मंद सुगंध जाणवत होता आणि शुभ्र फुलो-यावर इतक्या इतक्या मधमाशा की चक्क त्यांची गुणगुण ऐकू येत होती!
"मौमाछी फिरे जाची फुलेरो दोखिना - पाखाए बाजाय तार भिकारीरो बीणा!" (मधमाशा (मौमाछी) भिक्षेक-याच्या वीणेगत आपल्य़ा पंखांची मंद तार छेडत, वसंतात फ़ुललेल्या फुलाफुलांकडून दक्षिणा घेत रुंजी घालत आहेत!) खालून वर, वरून खाली, क्षणात या फुलावर तर क्षणात त्या. मकरंद आणि परागकणांची लयलूट चालली होती . सूर्योदयाच्या वेळी कोवळ्या उन्हात न्हालेला नाण्याचा शुभ्र फुलोरा, त्याचा नाजूक सुगंध आणि मधमाशांच्या पंखांनी छेडलेल्या वीणेचं शांत पार्श्वसंगीत - समाधी लागावी असंच वातावरण होतं ते. सूर्य वर येईपर्यंत तिथेच रेंगाळलो. उन्ह वाढलं तशा मधमाशाही पांगल्या आणि आम्हीही.
मौमाखी! |
बोंडारा, नाणा, तामण वगैरे झाडं मधमाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. नंदी, नाणा, लेंड, वेंथेक्कू अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे झाड जंगलातून मध गोळा करणा-या जमातींच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ही झाडं जितकी चांगली फुलतील, तितकी भरपूर मध मिळण्याची शक्यता जास्त.
याच्या botanical नावाचा गुंता मात्र आम्हाला अद्याप सुटलेला नाही. हा Lagerstroemis microcarpa, की Lagerstroemia parviflora? दोन्हीची फळे, पाने, फुले यात फरक फक्त आकारातल्या लहानमोठेपणाचा. पण तुलना करून बघायची, तर दोन्ही प्रजाती एकत्रच पाहायला हव्यात, त्यामुळे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे.
टेकडीवर बोंडा-याची झाडं विपुल प्रमाणात आहेत. आत्ता खरेतर ती सगळी फुललेली असतील. त्यांच्या बरोबरीने मोखा फुलला असेल, खैर फुलला असेल, मोहावर फळे धरू लागली असतील.
रंगा हाशी राशी राशी ऑशोके पॉलाशे...
टेकडीवर अशोक नाही, पण मोठा पळस आता फुलाफुलातून रंग उधळत हसेल...
ओ रे गृहोबाशी - खोल दार खोल, लागलो जे दोल.... सगळी उदासी, थिजलेपण, चिंतांचं मळभ दूर होऊन वसंत ऋतूच्या या बोलावण्याला लवकरात लवकर प्रतिसाद देता येवो....
खूप छान! वाचूनसुध्दाइतकं प्रफुल्लित वाटलं,तुम्ही तर अनुभवत आहात. 👌
ReplyDelete>>सगळी उदासी, थिजलेपण, चिंतांचं मळभ दूर होऊन वसंत ऋतूच्या या बोलावण्याला लवकरात लवकर प्रतिसाद देता येवो....
आमेन!!!
मस्त लिहिलंय.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDelete🙏🙏😊
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteसुंदर! साहित्य आणि वनस्पतीशास्त्र ह्यांची इतकी छान सांगड घालता तुम्ही. त्यामुळे कुठेही नीरसता येत नाही. एक सुंदर अनुभूती मिळते वाचताना.
ReplyDeleteमन:पुर्वक धन्यवाद!!
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
ReplyDelete