Sunday, 25 October 2020

काटंकिंजाळ केकताड

 

"काटंकिंजाळ केकताडाचा ह्यो पांढराफेक वाख कसा हुतो गं आये ?"

"बाळा, पाण्याच्या पोटात केकताडाची आग थंड हुती नि त्येचाच रेसमागत मऊलूस वाख हुतो." काट्यावरची पोटं' या उत्तम बंडू तुपे यांच्या आत्मचरित्रात त्यांची आई त्यांना काटेरी केकताडाच्या पोटातल्या रेशमी मायेबद्दल सांगते. केकताड, म्हणजेच घायपातापासून वाख बनण्याचा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय. या वाखापासून दोरखंड बनवला जाई. घायपाताची पानं डोहाच्या पाण्यात दहा-बारा दिवस भिजत ठेवायची, त्यापासून वाख काढायचा आणि त्याचा दोरखंड वळायचा. घायपातापासून दोरखंड करण्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत घायपात मुद्दाम लावला जात असे. दोरखंडाला बरेच पर्याय उपलब्ध झाल्यानेही असेल बहुदा, पण हल्ली मात्र याची मुद्दाम लागवड केली जात नाही. पण शेताच्या बांधांवरून हा बरेच ठिकाणी वाढलेला दिसतो.


टेकडीवरही तुरळक काही ठिकाणी घायपात आहेत. बांधांवरून आहेत, मुद्दाम लावलेले असावेत.

घायपात! नावातच घातपाताचा संशय, शिवाय एकंदरीत नूरही नामांकितच. थेट जमिनीतून वर येऊन झुपक्यात वाढलेली, एक दीड मीटर लांब, रुक्ष हिरव्या रंगाची  मांसल पाने. त्यांच्या दोन्ही कडांवर आणि टोकाला बारीक, अणकुचीदार, पिवळसर काट्यांचा कडक पहारा. पुन्हा, एक रोप लावलं की यांच्या मुळांपासून निघणारे फुटवे एकाशेजारी एक वाढत, आपल्या काटेरी तलवारी परजत उभ्या असणाऱ्या सैन्याची पलटणच तयार करणार. काय बिशाद की कोणी याच्या वाटेस जाईल!

टेकडीच्या एका भागात ग्लिरिसिडियाचं एकसुरी जंगल आहे. तिथे फक्त ग्लिरिसिडियाच आहे. अगदीच कुठेतरी दोनपाच इतर झाडे आहेत. तिथे गेलं की ग्लिरिसिडियाचा उग्र गंध सतत जाणवत राहातो. पावसाळी दिवसात तो गंध, तिथली अंधारी सावली आणि थंड हवा हे सगळे मिळून एक विचित्र, गूढ वातावरण तयार होतं. या जंगलात इतर झाडं नसली, तरी इथे एक लांबचलांब घायपाताचा पट्टा मात्र पसरलेला आहे. घायपाताच्या काटेरी तलवारींचं सैन्य मुळांचे फुटवे फुटत फुटत आडवंतिडवं पसरलेलं आहे.

तसा हा घायपात मूळचा मेक्सिकोमधला. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी त्याला इथे आणला. तिकडे यांच्या ब्लु अगेव या प्रजातीपासून अगेव सिरप तयार करतात. तो गोड रस मधाला पर्याय म्हणून वापरला जातो. आपल्याकडे जरी घायपाताचा असा काही उपयोग करीत असल्याचे ऐकिवात नसले, तरी यांच्या उग्र, रुक्ष बाह्यरूपाच्या आत मधाचा गोडवा असणार नक्कीच. आयुष्यभर असा सर्वांशी फटकून राहाणारा घायपात आयुष्याच्या अखेरीच्या दिवसात जरासा मवाळतो. म्हणजे पानांचा काटेरी आवेश तोच असतो, पण आतली कधी दिसलेली कोवळीक जागी होते. त्याच्या पानांच्या वर्तुळामधून फुलोऱ्याचा दांडा वर येऊ लागतो आणि उंचच उंच वाढू लागतो. दांड्यांच्या वरच्या टोकाकडच्या बाजूला आडवे फांदोरे फुटून त्यावर आभाळाकडे तोंड केलेल्या हिरव्या कळ्यांचे घोस दिसू लागतात आणि तो असा एकदम मायाळू, कुटुंबवत्सलच बनून जातो. गेले सात आठ महिने आम्ही टेकडीवरच्या दोन घायपातांवर असे फुलोऱ्याचे पंधरा-वीस फूट उंच दांडे पाहात आहोत. साधारण जुलै महिन्यात त्यातून पिवळ्या रंगाची फुलं डोकावू लागली आणि त्यावर बुलबुल, सनबर्डस आणि किडे-मधमाशांची झुंबड उडू लागली. यथावकाश ही फुलंही गळाली. मध्ये काही काळ टेकडीवर जाणं झालं नाही. जेव्हा गेलो, तेव्हा त्या फुलांच्या जागी घायपाताच्या  कटिखांद्यावर छोटीछोटी बाळं जन्मलेली!!


घायपाताच्या बिया झाडावरच रुजतात आणि वाढतात. ही बाळं पुरेशी मोठी झाली की तहानलाडू भूकलाडूची शिदोरी बांधून देऊन घायपात त्यांचं बोट सोडतो आणि ती त्या उंच मनोऱ्याच्या महालातून जमिनीवर येऊन रुजू लागतात. मुख्य घायपाताची भूमिका आता संपलेली असते. फुलोऱ्याचा दांडा वाळून जातो आणि त्याबरोबर घायपातही.

- अश्विनी केळकर

----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.



Friday, 16 October 2020

आम्ही आंदिच्या बायका, तुम्ही कान देऊन आयका..

 

-रूपाली भोळे

मार्च महिन्यात टेकडी सोनेरी दिसायची. टिटव्या, चंडोल, चिमण्या, सुगरणी काळ्याभोर मातीत आणि सोनेरी गवतात सतत सोबत करायच्या. एके ठिकाणी माळरानाचा मोकळा भाग संपून दाट झाडीचा परिसर सुरू होतो. एका वळणावर आलं की वाटायचं की आता वाट संपली. पुढे राडारोडा, टेकाड असं काहीसं दिसायचं. पुढे जावं की नाही या द्विध्येत असतांनाच एकदा एका देखण्या वृक्षानं लक्ष वेधून घेतलं. वेशीवरील त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंडयावर कोतवाल शांत होता. जवळ जवळ रोजच कुठला तरी पक्षी नक्की तिथे लांबूनच दिसे. हा वृक्ष आपलं फळाफुलांचा डेरा सावरीत उभा होता. एक म्हणजे एकही पान नाही! फुलं आंब्याच्या मोहरासारखी, फळं घोसानं . . जांभळसर हिरवी . . किंचित चिप्पट, दोन्ही बाजूनी चेपल्यासारखी . . दोन पावलं पुढे आल्यावर परत तेच झाड, तसाच पसारा . . फुलांच्या मंजिऱ्याही तशाच . . पण काही फळं मात्र गोल घुमटाकार. फळं म्हणवीत की नाही? . . तज्ज्ञांना दोन्ही झाडांची फळे दाखवली . . दोन्हीही मोईचीच झाडं . .


आमचे शिलिंब(मावळात)मधील आप्पा या झाडाला मोगर असं म्हणतात.

अश्विनीची सोबत मिळाल्यावर कानाकोपऱ्यात कुठेही शिरण्याचे धाडस होऊ लागलं. पण दरवेळी वाट मोईवरून जाई. मे महिन्यात झाडाला पालवी दिसू लागली. निष्पर्ण फांदीला टोकाला फळांचे घोस आणि मध्यभागी नवीन पानं. हळूहळू फळांची संख्या कमी झाली. पाने तरारून मोठी होऊ लागली. पण ते गोल तपकिरी गोळे मात्र तसेच . .




पावसाळ्यात पर्णसंभार जड झाला . . मोई नटू लागली . . दोन महिन्यांपूर्वी निष्पर्ण असलेला वृक्ष बहरू लागला. पानं मोठी, संयुक्त, पर्णीका विषम संख्येत, पानं टोकदार, पण पानाच्या शिरा मात्र ठसठशीत.

पानांच्या मुख्य शिरेजवळ त्याच पिवळसर तपकिरी गाठी. पानाच्या आरपार असणाऱ्या. म्हणजे ही फळं नाहीत. जसा पावसाळा सुरू झाला या गाठींची संख्या वाढू लागली.


मोईच्या पर्णीकेतील मुख्य शिर आणि उपशिरेजवळ या गाठी दिसून आल्या. काही ठिकाणी पानांना  छोटी भोकंही दिसली. या गाठींना इंग्रजीत gall असं म्हणातात तर मराठीत गुल्म. आपण बऱ्याचदा उंबराच्या पानांवर पाहिलेले असतात अगदी तसेच फोड.

काही विशिष्ठ परजीवी कीटक, बुरशी, कवक, विषाणू ईत्यादींच्या संपर्कामुळे वनस्पतीच्या एखाद्या भागात ही अस्वाभाविक वाढ होते आणि या गाठीची / फुगवट्याची वाढ होते. काही कीटक वनस्पतीच्या पृष्ठभागावर राहतात, भरपूर अन्नरस असलेल्या मुख्य शिरेजवळ भोसकून अंडी घालतात. आणि अशा वनस्पतींवर या परजिवी किटकांचे जिवनचक्र अवलंबून असतं. या किटकांनी स्त्रवलेल्या पदार्थामुळे पानांच्या कोशिकांची वाढ होण्यास चालना मिळते. आणि किटकांच्या वसाहतींना संरक्षण मिळते. वनस्पतीतज्ज्ञ मित्र मंदार दातार यानं या परजिवीसंबंधाची ओळख उलगडून दाखविली. मोईवरील गुल्म म्हणजेच Odinadiplosis odinae (Diptera) नावाचा किटक.

काही दिवसातच मोईची पानं गुंडाळल्यासारखी दिसली. हळूहळू जाळं-जळमट चढून पानांचा गुंता दिसू लागला. मोई आक्रसलेली, आजारी वाटू लागली. एकदा एक गुंता उलगडण्याचा प्रयत्न केला तर लालसर तपकिरी अळी भस्सकन बाहेर आली. 


मोई खूप अनुभवी, विचारी, स्थिर, झुकलेली दिसत होती. जणू आपल्या कवेत खूप इतिहास तिनं साठवून ठेवलाय असं वाटे.

मोईला इंग्रजीत Indian Ash Tree असं म्हणतात. हा वृक्ष मुळ युरोपीय पर्वतराजींमधला. आपल्याकडे मुख्यत्वेकरून हिमालयाच्या परिसरात आढळतो. पण भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ दिसून येतो. ह्या वृक्षाशी संबंधीत अनेक परिकथा, दंतकथा सागण्यात येतात. एका ग्रीक पुराणकथेनुसार युरेनस हे स्वर्गाचं व्यक्तिरूप आहे. तो पृथ्वीशी संग करतो. याचा तिच्या आणि त्त्याच्या सगळ्यात धाकट्या मुलाला राग येऊन त्यानं हातातल्या विळ्यानं युरेनसचं वृषण छाटून समुद्रात फेकून दिलं, त्याचं रक्त जमिनीवर जिथं सांडलं तिथून हे वृक्ष उगवले. एका आदिवासी गीतात मोईचे डेरे विळ्यासारखे दिसतात, असा उल्लेख आढळतो. तर नॉर्स (उत्तर युरोप) पुराणात या झाडाला Yggdrasill म्हणतात, म्हणजे त्यांच्या ओडिन नावाच्या देवतेचा घोडा. हा घोडा म्हणे नऊ विश्वांना जोडतो. काही अभ्य़ासकांच्या मते ओडिन आपल्या घोड्याला ह्या झाडाच्या बुंध्याला बांधत असे, म्हणून हे नाव पडलं असावं. मोईच्या पानांवर आढळणाऱ्या किटकांच्या नावातही ओडिन नावाशी साधर्म्य आढळते.



 

मोई असणाऱ्या परिसरात सालई (Bosewellia serrata)चंही झाड असतंच असं म्हणतात. मोई आणि सालईची झाडं पवित्र मानली जातात. मोईची पानं गळण्यापूर्वी पिवळीधमक होतात. शरदाच्या चांदण्यात मोई लांबूनच ओळखायला येते. म्हणून की काय मोवई आणि सालई या बहिणी दिवसा झाडाच्या आणि रात्री स्त्रियांच्या रूपात असतात अशी आख्यायिका आढळते.

‘गोईण’ मध्ये राणी बंग यांनी याबद्दल विस्तृत उल्लेख केला आहे. लक्ष्मणानं सीतेला रामाच्या आज्ञेवरून जंगलात सोडलं तेव्हा जंगलात सीतेचं रक्षण करण्यासाठीच लक्ष्मणाने मोवई-सालईला विनंती केली :

 

सालया मोवया रात्रीच्या बायका,

सीतामाईचा गहिवर आयका |

सालया मोवया आंदिच्या बायका,

सीतामाई गेली वनवासा,

तुम्ही कान देऊन आयका |

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Scientific Information:

शास्त्रीय नाव: Lannea coromandelica

कुळ: Anacardiaceae (आंब्याच्या कुळातील)

मराठी नावे: मोई, मोवई, मोया, शिंबट, शिमटी, (शिमाग्यात फुलणारे)

पाने/फळे/फुले: उल्लेख वरील लिखणात आला आहे.

खोड: पांढरट मळकट, गुळगुळीत

मोईची साल वेदानाशमक असल्याने अंगदुखी, दाढदुखीच्या औषधानमध्ये वापरतात. मोईची पाने शिजवून खरचटणे, लचकणे सूज, यावर बाहेरून लावतात, शिवाय पाला गुरांसाठी चार म्हणून उपयुक्त आहे. लाकूड टिकाऊ, कोरीव कामांसाठी वापरले जाते.

 

Friday, 9 October 2020

पैचान कौन!

 तसं पाहिलं तर झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत. एखादया झाडाची ओळख पटली नाही की त्याच्या पानाफुलांची, खोडाची, फांद्यांची निरीक्षणं लिहून काढायची, फोटो काढायचे, पुस्तकं आणि वेबसाईटी धुंडाळून त्याची ओळख शोधायची, आणि नाहीच जमलं तर आमच्या वनस्पतीतज्ञ मित्रमैत्रिणींकडे, गुरूंकडे धाव घ्यायची यातून आम्ही टेकडीवरचं वानसवैविध्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. टेकडी वाचणं, समजुन घेणं आणि त्यातून शिकणं हा फार म्हणजे फारच मजेचा आणि आनंदाचा उद्योग आहे. प्रत्येक टेकडीभेट आमच्या ओंजळीत एकतरी साक्षात्काराचा क्षण टाकत असते :)

’झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत’ हा साक्षात्कार आम्हाला घडवला तो टेकडीवर मुबलक आढळणा-या, पण बरेच दिवस ओळखीची एकही खूण न दाखवणा-या एका झाडाने. दरवेळी आम्ही त्याच्यापाशी जायचो, पानाचे फोटो काढायचो, वर्णनं लिहायचो - पाने साधी आहेत, एकांतरीत आहेत, देठापाशी गोलाकार आणि टोकाला रुंद आहेत, पानांच्या खालच्या बाजूस मऊ लव, मध्यशीर फुगीर आणि लालसर, देठही लालसर, खोडाची साल सुटी होऊन खोडावर पांढरट चट्टे दिसत आहेत, खोड पेरूसारखे आहे, पानांना कसलाही वास नाही...अशी सगळ्या प्रकारची वर्णनं लिहून झाली. गूगल लेन्स वापरून शोध घेतला, महाजन सरांच्या पुस्तकात शोधलं. (शेवटी कुकसाहेबांच्या पुस्तकातही शोधायचा प्रयत्न केला - पण त्यात कसं शोधावं तेच कळेना :D ). खोडाची साल निघते आहे, तर सालईचा भाऊबंद असेल का अशा (अडाणी) शंकेने एकदा त्याच्या खोडावर सापडलेला डिंक आणि सालही जाळून पाहिली - नाकपुड्या फुलवत काही सुगंध वगैरे येतोय का ते पाहिलं - पण नुसताच जळका वास.    


ज्ञानेश्वरीत म्हणलं आहे, "तरी जाणिजे झाड फुलें। का मानस जाणिजे बोलें॥" - फुलांवरून झाडाची ओळख होते आणि बोलण्यावरून अंतरंगाची. वनस्पतीशास्त्रातही, वनस्पतीचं कुळ (Family) हे त्याच्या फुलाच्या रचनेवरून ठरतं. (सारख्या रचनेची फुलं येणारे वृक्ष, वेली, झुडुपं एकाच कुळातली असतात.) हे झाड काही अद्याप फुलायला तयार नव्हतं आणि आपली ओळख द्यायला तयार नव्हतं. 

मग सप्टेंबर मध्ये, फुलपाखराचे फोटो काढण्याचे अयशस्वी प्रयत्न चालू असताना, रुपालीने थोड्या अंतरावरचं एक बहरलेलं झाड दाखवलं. कमरेपर्यंत वाढलेलं गवत तुडवत आम्ही झाडाजवळ पोचलो. सोनसळी रंगाच्या बारीक बारीक फुलांचे झुपके प्रत्येक पानाच्या बेचक्यातुन फुलले होते. पाकळ्या नसलेल्या छोट्या फुलांचे आणि कळ्यांचे गेंद, आणि नुकतीच आलेली हिरव्या रंगाची पंखवाली फळं.  ..भराभर फायली ओपन झाल्या..आणि साक्षात्कार झाला - हा तर धावडा!  कॉम्ब्रेटेसी.. अर्जुन-आईनाच्या कुळातलं झाड..पंखवाल्या बिया! मग पानांकडे लक्ष गेलं...तर दुसरा साक्षात्कार झाला - इतके दिवस जे झाड आपल्याला ओळख देण्यासाठी झुलवतंय, ते हेच लालसर देठांच्या पानांचं झाड! ...तरी जाणिजे झाड फुलें!! 

महाजन सरांच्या पुस्तकात तीन प्रकारच्या धावड्यांची माहिती आहे - धावडा (Anogeissus latifolia), महाधावडा (Anogeissus acuminata) आणि रेशम धावडा (Anogeissus sericea). टेकडीवर आढळतो तो Anogeissus latifolia- रुंद पानांचा धावडा! हा पुण्यातल्या सगळ्याच टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात आढळतो. याचा डिंक गमघट्टी किंवा घाटी गम म्हणुन ओळखला जातो. डिंकाचे अनेक उपयोग आहेत - विशेषतः कापड उद्योगात आणि स्फोटकांच्या उद्योगात बाईंडर म्हणून. अनेक पेयांमध्ये हा डिंक emulsifier आणि stabilizer म्हणून वापरला जातो. तसेच पॉलिमर आणि पेट्रोलियअम उद्योगातही. बाभळीच्या डिंकासारखाच हा डिंकही खाद्य पदार्थात वापरला जातो. राणी बंग लिखित ’गोईण’ मधे याच्या सालीचे, डिंकाचे, बुंध्याचे पारंपरिक उपयोग दिलेले आहेत. यातल्याच एका लोकगीतात, लक्ष्मणाने सीतेला वनात सोडल्यावर त्या निबीड वनाचे वर्णन करताना ’येन-धावडे स्वर्गाला जाती - ससे खोडाशी दडती’ अशा ओळी आहेत. त्या लोकगीतातला, स्वर्गाची उंची गाठणारा धावडा काही इथल्या परिसरात अद्याप आढळला नाही. इथली सगळी धावडे मंडळी बेताच्या उंचीची आहेत.     

धावड्याला बंगालात चकवा म्हणतात. आम्हालाही याने ’पैचान कौन’ म्हणत इतके दिवस चांगलंच चकवलं होतं. आम्हाला हसायला आलं ... धावडाही पानापानांत फुललेल्या फुलाफुलातुन हसत उभा होता!  
- अश्विनी केळकर
------------------------------------------
धावडा : Anogeissus latifolia
Family: Combretaceae 
इतर नावे: Button tree, Indian gum tree, धौया, धौरा, इंद्रवृक्ष, धवल, धुरंधर. 
फुलांचे, पानांचे आणि खोडाचे वर्णन वर दिलेले आहेच. 
फळे: पिवळसर तपकिरी, पंखवाली फळे फुलांसारखीच एका झुपक्यात दाटीवाटीने असतात.








Friday, 2 October 2020

एल्गाराचा देत इशारा ..

एल्गाराचा देत इशारा..

आमच्या टेकडीवर एक पळस आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये तो फुलतो आणि कायच्या काय सुंदर दिसतो. त्या दिवशी पळसाचे पूर्ण चित्र मिळावे म्हणून जरा लांब उभे राहिले, पण पळस काही कॅमेऱ्यात मावेना. डोळ्याशी कॅमेरा लावून मी अजून थोडं, अजून थोडं करीत पाठीमागे चालायला लागले. एकदाचा मिळाला छान.



पण हे काय, कपड्यात, केसात पकडून कुणीतरी मागे खेचतंय, हा एवढा काटेरी विळखा . . ही वेल आहे की झुडुप? बाभुळ म्हणावे की नाही? किती हा आडदांडपणा . . कायच्या काय चिडले मी. ही वनस्पती एका शेतवजा जागेच्या बांधावर हात पाय पसरून उभी होती. स्वतःला कसंबसं सोडवत मी त्यातून बाहेर पडले. खोडाला काटे, पानात काटे . . तिच्या अंगभर फक्त लालसर जांभळे काटे . . किती तिखट असावं एखाद्याने! आणि उन्हाळ्यातही हिरवी पाने! . . कायच्या काय होतं हे! . . तिचा आवेश पाहून, बांध  ओलांडून पलीकडे जाणं माणसालाच काय गुरांनाही या जन्मी शक्य नाही हे लक्षात आलं. वाघही हिला बघून परत फिरत असावा की काय म्हणून हीच नाव tiger stopper असंही सापडलं.



तिच्या आजूबाजूला तिनं कुणालाही फारसं वाढू दिलं नव्हतं की फिरकू दिलं नव्हतं. तिचे उघड्या तोंडाचे खिसे/शेंगा मात्र कायमस्वरूपी लक्षात राहिल्या. शेंगांनी आपली तोंडे आकाशाच्या दिशेने उघडी ठेवली होती . . आणि आतील काळ्या लांबट बिया स्पष्ट दिसत होत्या. शेंगा कायच्या काय छान दिसत होत्या. त्या भरीव टपोऱ्या वाटत होत्या. घरी येऊन नाव शोधले तर ही ‘चिलार’, झुडुपासारखी वेल, नावातही चिली होतंच. 

मला रागच होता. नेहमी पळसाजवळून जाताना मी तिला लांबूनच तिरकस बघायचे. तिच्या जवळून जाताना काटयांकडे बघून “संतापी, रागीट” असं मनातल्या मनात म्हणायचे आणि पुढे जायचे. जसा पावसाळा जवळ येऊ लागला, तशी ती भरभरा वाढताना दिसू लागली. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक पिवळ्या फुलांचे तुरे फांद्यांच्या टोकाला दिसले. मधमाशा तिच्या काट्यांना भीत नव्हत्या. 



अनेक पिवळ्या-हिरवट छोट्या घंटा एकत्र टांगल्याचा भास तिची फुले बघितल्यानंतर होई. फुले तेजस्वी आणि शांत वाटत होती. फुलल्यावर वेल देखणी, निरागस, नम्र दिसत होती.



 तिच्या पानांची, काटयांची संख्या वाढली. काटे आकडेदार किंचित खाली वळलेले . . म्हणून की काय हिला cats claw असेही नाव आहे.  खोड अजूनच बळकट व काष्ठमय दिसू लागले. तिचा अस्ताव्यस्तपणा, रांगडेपणा अजून ठळक होऊ लागला. त्या शेताच्या बांधावरील पहारेकरीच जणू ती.




टिपू सुलतानाने या झुडुपाप्रमाणे असणाऱ्या वेलीची तटबंदीकरिता मुद्दाम लागवड केली होती म्हणून त्याला म्हैसूर थॉर्न हे नाव पडले, असे म्हणतात. 

या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Biancaea decapetala

शेक्सपीयरने त्याच्या दोन नाटकात उपनायिकांना Bianca (बियांका) हे नाव दिलेलं आहे, Othello आणि Taming of the

 shrew मध्ये. Othello मध्ये बियांका ही जवळजवळ खलनायिका तर Taming of the shrew मध्ये बियांका तेजस्वी 

आणि निरागस, गोड मुलगी. हे दोन्ही गुण या वनस्पती मध्ये दिसतात.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय माहिती :

वनस्पती शास्त्रीय नाव  Biancaea decapetala

कुळ : Caesalpiniaceae

मराठी नाव : चिलार, चिल्हार, चिल्हारी, चिल्लर 

पाने : संयुक्त पाने, शिरेच्या दोन्ही बाजूस विभागलेली, साधारण २०-२२ सेमी लांब, मुख्य शिरेवरही काटे. पर्णीका आठ ते दहा जोड्यात, अंडाकृती आकाराच्या.

फुले : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिसून आली. फांदीच्या टोकास तुळशीच्या मंजिरीप्रमाणे, रंगाने पिवळसर, तेजस्वी, उलटी घंटेसारखी टांगलेली, अंदाजे दीड ते दोन सेमी परिघाची, पाकळ्या पिवळ्या काहीशा गोलाकार, केशरी पिवळी केसरदले आणि फुलाच्या बुडाशी पानासारखे उपांग.

शेंगा : आडव्या, सरळ टोकाला किंचित वाकलेल्या, तीन ते पाच काळ्या भरीव बिया. बिया वाऱ्याने किंवा धक्क्याने इतरस्त्र पडून रुजतात.

 रूपाली भोळे 

proopalee@gmail.com