-रूपाली भोळे
मार्च महिन्यात टेकडी सोनेरी दिसायची. टिटव्या, चंडोल, चिमण्या, सुगरणी
काळ्याभोर मातीत आणि सोनेरी गवतात सतत सोबत करायच्या. एके ठिकाणी माळरानाचा मोकळा
भाग संपून दाट झाडीचा परिसर सुरू होतो. एका वळणावर आलं की वाटायचं की आता वाट
संपली. पुढे राडारोडा, टेकाड असं काहीसं दिसायचं. पुढे जावं की नाही या द्विध्येत असतांनाच
एकदा एका देखण्या वृक्षानं लक्ष वेधून घेतलं. वेशीवरील त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंडयावर
कोतवाल शांत होता. जवळ जवळ रोजच कुठला तरी पक्षी नक्की तिथे लांबूनच दिसे. हा वृक्ष
आपलं फळाफुलांचा डेरा सावरीत उभा होता. एक म्हणजे एकही पान नाही! फुलं
आंब्याच्या मोहरासारखी, फळं घोसानं . . जांभळसर हिरवी . . किंचित चिप्पट, दोन्ही
बाजूनी चेपल्यासारखी . . दोन पावलं पुढे आल्यावर परत तेच झाड, तसाच पसारा . .
फुलांच्या मंजिऱ्याही तशाच . . पण काही फळं मात्र गोल घुमटाकार. फळं म्हणवीत की
नाही? . . तज्ज्ञांना दोन्ही झाडांची फळे दाखवली . . दोन्हीही मोईचीच झाडं . .
आमचे शिलिंब(मावळात)मधील आप्पा या झाडाला मोगर असं म्हणतात.
अश्विनीची सोबत मिळाल्यावर कानाकोपऱ्यात कुठेही शिरण्याचे धाडस होऊ लागलं. पण दरवेळी वाट मोईवरून जाई. मे महिन्यात झाडाला पालवी दिसू लागली. निष्पर्ण फांदीला टोकाला फळांचे घोस आणि मध्यभागी नवीन पानं. हळूहळू फळांची संख्या कमी झाली. पाने तरारून मोठी होऊ लागली. पण ते गोल तपकिरी गोळे मात्र तसेच . .
पावसाळ्यात पर्णसंभार जड झाला . . मोई नटू लागली . . दोन महिन्यांपूर्वी निष्पर्ण असलेला वृक्ष बहरू लागला. पानं मोठी, संयुक्त, पर्णीका विषम संख्येत, पानं टोकदार, पण पानाच्या शिरा मात्र ठसठशीत.
पानांच्या मुख्य शिरेजवळ त्याच पिवळसर तपकिरी गाठी. पानाच्या आरपार असणाऱ्या. म्हणजे ही फळं नाहीत. जसा पावसाळा सुरू झाला या गाठींची संख्या वाढू लागली.
काही विशिष्ठ परजीवी कीटक, बुरशी, कवक, विषाणू ईत्यादींच्या संपर्कामुळे
वनस्पतीच्या एखाद्या भागात ही अस्वाभाविक वाढ होते आणि या गाठीची / फुगवट्याची वाढ
होते. काही कीटक वनस्पतीच्या पृष्ठभागावर राहतात, भरपूर अन्नरस असलेल्या मुख्य
शिरेजवळ भोसकून अंडी घालतात. आणि अशा वनस्पतींवर या परजिवी किटकांचे जिवनचक्र
अवलंबून असतं. या किटकांनी स्त्रवलेल्या पदार्थामुळे पानांच्या कोशिकांची वाढ
होण्यास चालना मिळते. आणि किटकांच्या वसाहतींना संरक्षण मिळते. वनस्पतीतज्ज्ञ
मित्र मंदार दातार यानं या परजिवीसंबंधाची ओळख उलगडून दाखविली. मोईवरील गुल्म म्हणजेच Odinadiplosis odinae (Diptera) नावाचा किटक.
काही दिवसातच मोईची पानं गुंडाळल्यासारखी दिसली. हळूहळू जाळं-जळमट चढून
पानांचा गुंता दिसू लागला. मोई आक्रसलेली, आजारी वाटू लागली. एकदा एक गुंता उलगडण्याचा
प्रयत्न केला तर लालसर तपकिरी अळी भस्सकन बाहेर आली.
मोई खूप अनुभवी, विचारी, स्थिर, झुकलेली दिसत होती. जणू आपल्या कवेत खूप इतिहास
तिनं साठवून ठेवलाय असं वाटे.
मोईला इंग्रजीत Indian Ash Tree असं म्हणतात. हा वृक्ष मुळ युरोपीय
पर्वतराजींमधला. आपल्याकडे मुख्यत्वेकरून हिमालयाच्या परिसरात आढळतो. पण भारतात अनेक
ठिकाणी याचा आढळ दिसून येतो. ह्या वृक्षाशी संबंधीत अनेक परिकथा, दंतकथा सागण्यात
येतात. एका ग्रीक पुराणकथेनुसार युरेनस हे स्वर्गाचं व्यक्तिरूप आहे. तो पृथ्वीशी
संग करतो. याचा तिच्या आणि त्त्याच्या सगळ्यात धाकट्या मुलाला राग येऊन त्यानं
हातातल्या विळ्यानं युरेनसचं वृषण छाटून समुद्रात फेकून दिलं, त्याचं रक्त जमिनीवर
जिथं सांडलं तिथून हे वृक्ष उगवले. एका आदिवासी गीतात मोईचे डेरे विळ्यासारखे
दिसतात, असा उल्लेख आढळतो. तर नॉर्स (उत्तर युरोप) पुराणात या झाडाला Yggdrasill म्हणतात, म्हणजे त्यांच्या ओडिन नावाच्या देवतेचा घोडा. हा
घोडा म्हणे नऊ विश्वांना जोडतो. काही अभ्य़ासकांच्या मते ओडिन आपल्या घोड्याला ह्या
झाडाच्या बुंध्याला बांधत असे, म्हणून हे नाव पडलं असावं. मोईच्या पानांवर
आढळणाऱ्या किटकांच्या नावातही ओडिन नावाशी साधर्म्य आढळते.
मोई असणाऱ्या परिसरात सालई (Bosewellia serrata)चंही झाड असतंच असं
म्हणतात. मोई आणि सालईची झाडं पवित्र मानली जातात. मोईची पानं गळण्यापूर्वी पिवळीधमक
होतात. शरदाच्या चांदण्यात मोई लांबूनच ओळखायला येते. म्हणून की काय मोवई आणि सालई
या बहिणी दिवसा झाडाच्या आणि रात्री स्त्रियांच्या रूपात असतात अशी आख्यायिका
आढळते.
‘गोईण’ मध्ये राणी बंग यांनी याबद्दल विस्तृत उल्लेख केला आहे. लक्ष्मणानं सीतेला
रामाच्या आज्ञेवरून जंगलात सोडलं तेव्हा जंगलात सीतेचं रक्षण करण्यासाठीच
लक्ष्मणाने मोवई-सालईला विनंती केली :
सालया मोवया रात्रीच्या बायका,
सीतामाईचा गहिवर आयका |
सालया मोवया आंदिच्या बायका,
सीतामाई गेली वनवासा,
तुम्ही कान देऊन आयका |
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Scientific
Information:
शास्त्रीय नाव: Lannea coromandelica
कुळ: Anacardiaceae (आंब्याच्या कुळातील)
मराठी नावे: मोई, मोवई, मोया, शिंबट, शिमटी, (शिमाग्यात फुलणारे)
पाने/फळे/फुले: उल्लेख वरील लिखणात आला आहे.
खोड: पांढरट मळकट, गुळगुळीत
मोईची साल वेदानाशमक असल्याने अंगदुखी, दाढदुखीच्या औषधानमध्ये वापरतात. मोईची
पाने शिजवून खरचटणे, लचकणे सूज, यावर बाहेरून लावतात, शिवाय पाला गुरांसाठी चार
म्हणून उपयुक्त आहे. लाकूड टिकाऊ, कोरीव कामांसाठी वापरले जाते.
Very interesting information 👍
ReplyDelete