जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाच्या चांगल्या सरी बरसून गेल्या होत्या. टेकडीवरच्या काळ्याभोर जमिनीमुळे थोड्या पावसामुळेही तिथे चिखल होतो. (टेकडीवर चढून थोडं अंतर चाललं की हा काळ्या जमिनीचा पट्टा आहे. आम्हाला या काळ्याभोर रंगाचं नेहमीच आश्चर्य वाटतं. अगदी काळीभोर शेतजमीन!) त्यामुळे टेकडीफेरीत थोडा खंडच पडला होता. पावसानंतर दोन दिवसांनी टेकडीवर गेलो तेव्हा जरा तांबड्या कुड्याची वास्तपुस्त करून येऊ असं ठरवलं. हा तांबडा कुडा कायम आम्हाला चकवा देत असतो. छोट्या, रेखीव पानांपलिकडे काही ओळखीची खूण नाही. फुलांना ना आकर्षक रंग, ना सुवास त्यामुळे रानातल्या झाडीत त्याच्यापर्यंत पोचताना आम्ही बरेचदा भलतीकडेच फिरत राहातो. त्यादिवशीही तो असाच जरा भरकटल्यावर सापडला. फुले येऊन गेलेली होती त्यामुळे शेंगा आल्या आहेत का ते आम्ही पाहात होतो. तर अचानक पाणी पडल्याचा टपटप आवाज येऊ लागला. पुन्हा पाऊस? पण नाही, पाऊस नव्हता. नीट पाहिलं, तर एकाच ठिकाणी पाणी गळत होतं. जमिनीवर ओलही दिसत होती. हा काय प्रकार आहे ते कळेना. दंव असेल का? मग ते एकाच ठिकाणी कसं पडेल? पावसाचं साठलेलं पाणी असेल का? पण पाऊस पडून दोन दिवस झाल्यावरही ते कसं पडत राहील? उंबराच्या झाडातून असं अचानकपणे गळू शकतं, - तसं काही आहे की काय? अशा अनेक शक्यता आम्ही बोलत राहिलो पण त्या पाण्याचा माग काही मिळाला नाही. टपकणा-या पाण्याचं गूढ मनात ठेवुनच आम्ही परतलो.
दुसरे दिवशी जरा दाट झाडीच्या भागात जायचं होतं. वाटेत एका मोईच्य़ा झाडावरच्या वेली पाहात थांबलो, तर तिथे पुन्हा तीच कालची टपटप टपटप! मोईची पानं जरा निरिक्षणाच्या टप्प्यात असल्याने जरा बारकाईने तपास करू लागलो...आणि ते गूढ उलगडलं! एका पानाच्या मागे थुंकी किड्याचं घरटं (म्हणजे फेस) होतं आणि त्याच पानातून पाणी गळत होतं. आणखी पाहात गेलो, तर मोईच्या पानांमागे थुंकी किड्यांच्या वसाहतीच दिसू लागल्या! पानापानामागे पांढरा फ़ेस आणि ठिबक सिंचन! थोडं पुढे, सागाच्या झाडीत तर ती टपटप इतकी वाढली, की पाऊसच पडतोय असं वाटावं. पायातळी वाढलेलं गवत, डोक्यावर दाट झाडी, ती पाण्याची टपटप आणि त्या किड्यांच्या मेजवानीसाठी आलेल्या छोट्याछोट्या पक्ष्यांचा किलबिलाट - एक वेगळाच गूढरम्य माहोल तयार झाला होता. एका पानामागच्या फ़ेसाच्या घरातला फ़ेस बाजूला करून बघितलं, तर पांढ-या रंगाचे छोटे छोटे किडे त्यात दिसले.
हा थुंकी किडा, किंवा spittlebug आपल्या वाढीच्या अवस्थेत असताना प्रचंड प्रमाणात पानांमधला जीवनरस शोषून घेतो. प्रचंड म्हणजे आपल्या वजनाच्या दोनशे ते अडीचशे पट! त्याला त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग वापरून उरलेला पाण्याचा भाग तो उत्सर्जित करत राहातो. या उत्सर्जन प्रक्रियेत बाहेर येणा-या पाण्याचा फेस तयार होऊन त्याच्या शरीराभोवती एक संरक्षक आवरण तयार होतं. (अर्थात, तिथे भरलेली पक्ष्यांची जत्रा पाहाता, या फेसामुळे खरोखरच त्यांना संरक्षण मिळत असेल का, हा प्रश्नच आहे.) फेस तयार होतानाच, हे जास्तीचं पाणी पानांवरून ठिबकत राहातं.
आणखी एक निरीक्षण: जवळजवळ सगळ्या झाडांवर कमीअधिक प्रमाणात थुंकीकिडे दिसले. साग आणि मोईची पानं त्यांची विशेष आवडती असावीत. कहांडळाच्या दीड हात रुंद आणि दीड हात लांब अजस्त्र पानांवर मात्र एकही थुंकीकिडा दिसला नाही!
- अश्विनी केळकर
Interesting! Informative and nicely described.
ReplyDeleteकसल्या गंमतीजमती शोधताय तुम्ही!! वाचायला मजा येतेय. 😄😄👍 मस्त!!
ReplyDeleteगंमतच की .. मस्त उलगडलय टपटपचं रहस्य
ReplyDeleteशीर्षक फारच आवडलं 👌🏻👌🏻