सगळ्यांचीच गोष्ट
रूपाली
भोळे
आधी मला वाटलं, ही गोष्ट आहे दोघांचीच. एक झाड तेंदूचं आणि त्याला वेढलेली वेल म्हाळुंगीची. मग नंतर लक्षात आलं, की तेंदुच्या झाडाच्या फांदीवर पूर्वेकडे अगदी कोवळं ऊन मिळेल असा गुंता झाडाला चिटकून आहे. मग लक्षात आलं, ही गोष्ट तिघांची. मग रोज टेकडीवर जाताना मी त्यांची गोष्ट शोधी. त्यांच्याजवळ क्षणभर तिथे विसावा घेई. पण तिघे मात्र गळ्यात गळे घालून, पाय रोऊन उतारावर उभे. तो गुंता मात्र डोक्यात अजून गुंता वाढवत जाई. हा गुंता ओळखायला नेहमीप्रमाणे मंदार दातार या helpline ने मदत केली.
उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हातही हे बांडगुळ हिरवं-पिवळसर होतं.
पावसाळ्यात हिरवा रंग गडद झाला.
पावसाळ्यातील त्याची बारिकशी फुले डोळ्यांनी दिसली नाहीत,
पण पावसानंतर मोत्यांसारखी छोटी फळे स्पष्ट दिसू लागली.
बोटाएवढी पेरं,
अनेक फांद्यांचं जाळं,
फांद्या चपट्या,
हिरव्या,
मांसल.
जणू काही दोन्ही बाजूंना कडा असलेल्या बोटभर आकाराच्या पट्ट्या एकमेकींना जोडलेल्या.
एक किचकट ओरिगामी रचना.
या भौमितीक रचनेत प्रत्येक जोडाला म्हणजे कोनाला ही
हिरवट पांढरी मण्यांसारखी फळे चिकटलेली.
या बांडगुळासाठी तेंदू ही आश्रयी वनस्पती. पण viscum जातीचं हे बांडगुळ पूर्णपणे परजीवी नाही. याची शोषक मुळे तेंदुच्या खोडातून, फांद्यांमधून पाणी, खनिज, क्षार घेतात आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात (अर्धपरजीवी, hemiparasite). तेंदुच्या काही फांद्या वाळून कोरड्या झालेल्याही दिसल्या. काही प्रमाणात आश्रयी वनस्पतीला हानी पोचू शकते.
म्हाळुंगी |
यावर अनेक छोटे पक्षी, किटक, फुलपाखरं यांचा वावर यावर दिसून आला. उब मिळवण्यासाठी पायमोज्यासारखं कापड गवतात गुंतवून मुनियासारख्या पक्ष्याचं घरटं यावर दिसून आलं. यावरील फुलटोच्यासारखे अनेक पक्षी आमच्याकडून लांबून का होईना पण फोटो काढून घ्यायला तयार नव्हते. फळ खाऊन फुलटोचा सारखी चोच पुसताना दिसला.
मुनियाचं घरटं |
फुलटोचा |
उतारावरील तेंदू, त्याच्या कवेतली म्हाळूंगी आणि अंगावरील सदाहरित बांडगुळ आणि यामुळे जमा झालेले पक्षी किटक, फुलपाखरं, तळाशी असेलेले गिरणुळ, टणटणी, गवत हे सगळं मिळून एक छोटी परिसंस्थाच तयार झालेली दिसून आली. परजीवी असलेली ही वनस्पती अनेक जिवांचं आश्रयस्थान झालेली दिसत होती.
बांडगुळाला इंग्रजीत mistletoe म्हणतात. जगभरात त्याच्या तेराशे प्रजाती असून त्यातल्या अनेक भारतात सापडतात.
जुन्या इंग्रजी भाषेत mistle म्हणजे विष्ठा आणि toe - tan म्हणजे
डहाळ्या.
बांडगुळाची फळं खाऊन पक्षी विष्ठेद्वारे इतर झाडांच्या फांद्यावर बिजप्रसार करतात.
शिवाय त्यांच्या फळातील चिकट द्रवामुळे पक्षी आपल्या चोची इतर झाडांच्या फांद्यांना घासत असतात,
आणि त्यामुळे बीजप्रसार होतो.
जगभरातील
पुराणात mistletoe
विषयी अनेक संदर्भ सापडतात.
प्लिनी नावाचा एक कोशकर्ता इसवीसनाच्या पहिल्या शतकात होऊन गेला.
त्यानं नॅचरल हिस्टरी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता.
त्यात ड्रुइड पंथाची माणसं ओकवृक्षावरून कशाप्रकारे बांडगुळं काढत असत याचं तपशिलवार वर्णन केलं आहे.
पायघोळ पांढरं वस्त्र धारण केलेला ड्रुइड सोन्याच्या विळीनं बांडगुळाच्या फांद्या कापून काढत असत आणि खाली उभे राहिलेले इतर त्या बांडगुळाचं एकही पान किंवा फळ जमिनीवर पडू न देता शिताफीनं झेलून घेत असत.
बांडगुळं झेलण्याचा विधी सुविहीतपणे पार पडण्यासाठी ते दोन बैलांचा बळीही देत असत.
या बांडगुळांची पानं वर्षभर हिरवी रहात असल्यामुळे पहिल्या शतकातल्या ड्रुइडांनी बांडगुळांना त्यांच्या संस्कृतीत पवित्र स्थान बहाल केलं होतं.
ऐन हिवाळ्यात त्यांना फळ धरत असल्यामुळे त्यांच्यासाठी ती जिवंतपणांची आणि सुपिकतेची प्रतिकं ठरली होती.
एवढंच नाही,
तर दोन सैनिक जर बांडगुळं असलेल्या झाडाखाली एकमेकांच्या आमनेसामने आले,
तर दिवसाभरासाठी त्यांनी संधी करून एकमेकांशी लढू नये,
असा संकेतही त्या काळात रुढ होता.
ओव्हिड या लॅटिन कविच्या साहित्यातही बांडगुळांचा उल्लेख अनेकवेळा येतो.
नॉर्स पुराणात बाल्डर या शांततेच्या देवाची विषारी बांडगुळाचा बाण करून हत्या होते,
म्हणून मग बाकीचे सगळे देव त्याला वाचवण्यासाठी प्रेमाच्या देवतेला ते विषारी बांडगुळ अर्पण करतात,
प्रेमाची देवता त्यातले विष काढून टाकते आणि शांततेच्या देवाचे प्राण वाचवते असा उल्लेख येतो.
शेक्सपिअरच्या टायटस अॅन्ड्रोनिकस नाटकातही हा संदर्भ आढळतो.
त्यानंतर बांडगुळाच्या डहाळीखाली कुणी एकमेकांना भेटलं तर त्यांनी एकमेकांचं चुंबन घ्यावं,
अशी प्रथाच सुरू झाली.
आजही पाश्चिमात्य परंपरेत ख्रिसमसच्या सणाला लोक दारावर बांडगुळाची डहाळी टांगतात आणि सणासाठी घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे त्या डहाळीखाली चुंबन घेतात हा रिवाज आहे.
शेतीचं काम सुरु करण्यापूर्वी शेतातल्या जनावरांना बांडगुळाची फांदी चारली तर आपत्ती टळते अशी जुन्या ब्रिटीश शेतकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा होती.
तर फ्रेंच शेतकऱ्यांमध्ये पेरणीपूर्वी शेतात बांडगुळ जाळलं तर पिक चांगलं येतं अशी समजूत होती.
उपवर मुलीने आपल्या उशीखाली बांडगुळाची फांदी ठेवली तर तिला स्वप्नात तिच्या भावी वराचं दर्शन घडतं,
अशीही एक अंधश्रद्धा होती.
साहित्यात साधारणपणे जेव्हाही बांडगुळ हा शब्द येतो,
तेव्हा तो दुसऱ्याच्या जिवावर जगणरा,
परावलंबी अशा काहीशा नकारार्थी स्वरात वापरला जातो.
पण टेकडीवरच्या तेंदुच्या झाडावरचं हे बांडगुळ,
त्याच्या अवतीभवती असलेले पक्षी,
किडे, फुलपाखरं, ह्या सगळ्यांमुळे झाडाच्या परिसरात उगवलेली नवी झाडं-झुडपं - हे सगळं पाहिलं की वाटतं की या बांडगुळानं आपल्या भवताली एक छोटसं विश्वच निर्माण केलंय,
जणू विश्वामित्राची प्रतिसृष्टीच.
मग ही केवळ कुणा दोघांची वा तिघांचीच गोष्ट रहात नाही तर या प्रतिसृष्टीतल्या सगळ्यांचीच,
अवघ्या चराचराची गोष्ट बनते.
- रूपाली भोळे
proopalee @gmail.com
Ref :
https://medium.com/@WriterMariecor/what-to-know-about-mistletoe-facts-and-mythology-959fc8c18934
https://marathivishwakosh.org
Tendu Leaves
शास्त्रीय नाव: Diospyrous melonoxylon
कुळ Ebenaceae
मराठी नाव: तेंदु, टेंभुर्णी
Leafless Mistletoe, Joined mistletoe
शास्त्रीय नाव: Viscum articulatum
मराठी नाव: बंदा
Purple morning glory
शास्त्रीय नाव: Argyreia cuneata
कुळ Convolvulaceae
मराठी नाव म्हाळुंगी
No comments:
Post a Comment