वाटेवरचा परस, शेंडीले कोवळा..
_ रूपाली भोळे
टेकडीवरील माळावर पळस खूप लांबूनच दिसतो. तो फुललेला असला
की त्याचं बहरणं आसमंताला प्रज्वलित करतं. काळ्या भुईवर केशरी सडा सांडून, त्यावर
हा पिवळसर केशरी वस्त्र लेवून, फांद्यांच्या बाहू उघड्या करून तमाम प्राणी
सृष्टीला सामावून घेण्यासाठी ताकदीने उभा, त्याच्या फुललेल्या रुपातून आधार,
बलाढ्यता, सोज्वळता पाझरत असते. हाच तो खरा केशरी वस्त्र परिधान केलेला संत
महात्मा. हे रूप तुम्ही एकदा पहिलं तर विसरूच शकत नाही. रणरणत्या उन्हातही हसरा,
फुललेला, निःस्वार्थी, सतत पक्ष्यांना, प्राण्यांना देण्यासाठी तत्पर असा.
भर थंडीत आपली मोठी सपाट, जाड पानं भुईकडे झेपाऊन देणं हा
त्याचा स्वभावाच. पर्णहीन होऊन काही काळानंतर कोवळ्या लवयुक्त डहाळ्यांचे धुमारे
फुटू लागतात. वसंताच्या चाहुलीत काळ्या मुलायम कळ्या आकाशाच्या दिशेने तोंड करून
फांदीला लगडतात. नभातील मावळतीचे आणि उदयाचे रंग यात अडकून रंगोत्सवाला सुरुवात होते. काळे मखमली पेल्यासारखे पुष्पकोश
आणि केशरी, लाल, नारिंगी रंगाच्या फुलांनी झाड भरून जातं. या पेल्यातील मधूरस
पिण्यासाठी भुंगे, खारी, पक्षी यांची धडपड सुरू होते.
पावसाळा लांबला की पळस बहरण्याचं लांबतं असं महाजन सर आपले वृक्ष मध्ये म्हणतात. टेकडीवरील मोठा पळस यावर्षी अजूनही फुलायचा आहे, पण छोटा पळस मात्र नेहमीच्या वेळेतच फुलला आहे.(लेखातील मोठ्या पळसाची छायाचित्रे ही गेल्या वर्षातील आहेत).
पळसाची पाने मोठी संयुक्त व चामट जाड असतात. पळासाच्या पानाला तीन पर्णिका तर पानाचा देठ अंदाजे दहा ते बारा सेमी लांब आणि जाड मांसल भागाने फांदीला जोडलेला असतो. पळसाच्या पांनापासून पत्रावळ्या करतात. पळसाच्या शेंगा (पळस पापड्या) सुरुवातीला पानांप्रमाणेच भासल्या. पळसाचं शास्त्रीय नाव Butea monosperma शेंगेत एकच बी, म्हणून monosperma, शेंगा वजनाने हलक्या, बीज-प्रसार व्हावा म्हणून वाऱ्यासोबत पसरणाऱ्या. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी टेकडीवर बिया रुजलेल्या दिसून आल्या. बी शेंगेतच रुजताना दिसलं, शेंगेच्या बी असलेल्या भागातून कोंब आणि मूळ फुटलेलं दिसलं. गेल्या महिन्यातील वणवा झेलून त्यातील काही अजूनही तग धरून आहेत.
फुले पोपटाच्या चोचीसारखी वळलेली, गुच्छ्यात, फांदीला चिटकलेली, पाच ते चाळीस सेमी लांबीची.
पळसाची मुळे, फुले, फांद्या, साल यांचे अनेक औषधी आणि इतर उपयोग आहेत, पण सगळ्यात जास्त भावलं ते स्त्रीचं असलेलं भावनिक नातं.
वाटेवरचा परस, शेंडीले कोवळा,
लेकी देऊन सोयरा, पिताजी व ss माझा ||
वाटेवरचा परस, शेंडीले पिकला,
लेकी देऊन चुकला, पिताजी व ss माझा ||
वाटेवरचा परस, शेंडीले पिकला,
सखा निष्ठुर मनाचा, बंधुजी व ss माझा
||
शास्त्रीय नाव: Butea monosperma, Butea frondosa (Flame
of forest),
मराठी नाव: पळस, परस
संस्कृत: पलाश,किंशुक
कुळ : Fabaceae (कडधान्य कुळ)
फारच छान!
ReplyDelete‘त्याचं बहरणं आसमंताला प्रज्वलित करतं’! खूप आवडलं.
धन्यवाद सचिन, गर्द सभोती वरील प्रतिसाद उत्साह वाढवतो.
Deleteमाझ्या गावी जाताना पळस आजुबाजुला दिसतो. पण नजर काही त्याच्या कडे जात नाही. आता आयुष्य भर गावी जाताना पळस त्याच्या कडे ओढत ओढत राहिल. खुप मस्त लेख ताई।
ReplyDeleteधन्यवाद हितेश!
Delete