Saturday, 8 March 2025

पारुल फूल

बंगाली लेखक दक्षिणरंजन मित्र मजूमदार यांनी १९०७ साली "ठाकुरमार झूली" या पुस्तकात बंगालमधील लोककथा एकत्रित केल्या. त्यातली एक कथा "शात भाई चंपा". एक राजा, त्याच्या सात राण्या. धाकटी राणी सर्वात आवडती. तिला दिवस गेले तेव्हा हिचं स्थान आणखी बळकट होणार म्हणून बाकी राण्या चिंतेत. राणीने सात मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला आणि ती बेशुद्ध पडली, तेव्हा बाकी राण्यांनी ती मुलं परसदारी शेणाच्या ढिगार्‍यात पुरली आणि त्यांच्याजागी धाकट्या राणीच्या कुशीत कुत्र्या मांजराची पिल्लं ठेवली. राजाने धाकट्या राणीला घराबाहेर हाकललं (बिनडोक माणूस). इकडे शेणाच्या ढिगार्‍यातून आठ झाडं उगवली आणि भराभर वाढून उंचच उंच गेली. सात झाडांवर सोनचाफ़े फुलले ाणि एकावर पारूल फुलं. राजाचा माळी फुलं काढू गेला, तर झाडं उंच जाऊ लागली. राजाने, त्याच्या सहा राण्यांनी प्रयत्न केले, तरी फुलं हातास येईनात. शेवटी धाकट्या राणीला बोलावलं, तेव्हा सगळी चाफ्याची आणि पारुलची फुलं तिच्या ओंजळीत आली तिची सात मुलंही मानवी रूपात समोर उभी ठाकली. मग राजाला खरी गोष्ट कळली, वगैरे... बंगालात या गोष्टीवर चित्रपट आणि मालिका येऊन गेल्या. १९७८ सालच्या त्या चित्रपटात लता मंगेशकरांनी गायलेलं "सात भाई चंपा जागो रे" हे अत्यंत मधुर गीत आहे https://www.youtube.com/watch?v=qvBL0M_AGR4 इथे जरूर ऐका. कथेतल्या पारुलच्या तोंडी असलेलं हे गाणं आजही बंगालमधलं लोकप्रिय बालगीत आहे.

तर, या कथेतलं पारुल फूल म्हणजे पाटलफूल. संस्कृत नाव पाटल/ पाटला/ पाटलि तर मराठी नाव पाडळ/ पाडळी. संस्कृतात "पाटल"चा अर्थच मुळी गुलाबी रंग. नाजूक झालरीसारख्या पाकळ्यांच्या, मऊ लव असलेल्या पाडळीच्या फुलांत हलक्या पिवळसर, गुलाबीसर ते गहिर्‍या गुलाबी रंगापर्यंत मनोहारी छटा आढळतात. ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स/ Flame University च्या टेकडीवरून सुसच्या Sunny's world कडे जाणार्‍या वाटेवर पिवळसर फुलांच्या पाडळीची झाडं मुबलक आहेत. त्या भागाला पाडळीवन म्हणावं, इतकी आहेत. आणखी एक पिवळ्या पाडळीचा वृक्ष कर्वे रस्त्यावरच्या मृत्युंजयेश्वराच्या देवळाच्या मागच्या रस्त्यावर (तग धरून उभा) आहे. याचं इंग्रजी नाव स्नेक ट्री. फूट-दीड फूट लांबीच्या सापासारख्या फळांवरून पडलेलं. शेंगेसारखी दिसणारी ही फळं खरेतर बोंड प्रकारात मोडतात. फळाच्या आत एक धांडोरा असतो आणि त्याच्या खाचांमधे वार्‍यावर उडणार्‍या पंखधारी बिया असतात. ऐन ग्रीष्मात फुलणारा सुगंधी फुलोर्‍याचा हा वृक्ष फुलतो तेव्हाही नीट पाहिल्याशिवाय फुललेला कळत नाही. मी टेकडीवर पहिल्यांदा उंचच उंच वाढलेला पाडळ पाहिला, तो नवी पालवी आणि फुलं एकाच वेळी आलेला. 









टेकडीवरचे पिवळ्या फुलांचे पाडळ पाहिल्यावर गुलाबी फुलांच्या पाटलाला पहायचे वेध लागले. इंगळहळ्ळीकर सरांच्या पुस्तकात तो woodland society त आहे असं दिलंय, पण तो काही बघता आला नाही. मग एक दिवस उषाताईंनी टेकडीवरची गुलाबी पाडळीची झाडं दाखवली.  त्यांना एकदाच इथे एक वाळलेलं गुलाबी फूल सापडलं म्हणाल्या. परमहंस नगरमधून मारुती मंदिराकडून म्हातोबाकडे जाणार्‍या टेकडीरस्त्यावर गुलाबी पाडळीची, वेगवेगळ्या वयाची आणि उंचीची सहा झाडं एकाच ठिकाणी आहेत. मग जानेवारीअखेरपासून त्या झाडांच्या मागावर राहिले, पण ती काही फुलण्याची चिन्हं दिसेनात. आजही सकाळी गेले तेव्हा प्रत्येक झाड बघितलं. सगळी झाडं राठ, जून पाने घेऊन ढिम्म उभी. यांच्यावर कधी फूल फुलणारच नाही असं वाटणारी. एक झाड ग्लिरीसिडियाजवळ उभं. याच्या फांद्या, त्याच्या फांद्या एकमेकात गुंतून गेलेल्या. ग्लिरीसिडियाच्या गुलाबीसर फुलोर्‍यात दोन गर्द गुलाबी ठिपके दिसले. मानेला रग लागेतो नीट पाहिलं, तेव्हा त्या फुलोर्‍याची नेटकी मांडणी कळत गेली. टोकाला फुललेलं फूल, त्याच्या खाली दोन कळ्या, उपशाखा, शाखा, मग मुख्य फांदी - ओबडधोबड आणि रुक्ष पानांची. पण आता उंच शेंड्यावर नाजूक गुलाबी फुलं माळलेलं ते झाड तितकंसं जून आणि ओबडधोबड वाटेना. हिमाचलमधले उंचेपुरे पहाडी मेंढपाळ आठवले - हसर्‍या चेहर्‍याचे आणि टोपीत फुलं खोवणारे! 





- अश्विनी केळकर

पाटल, पाडळ, पादरी, snake tree, Fragrant Padri Tree 

Stereospermum chelonoides/ Stereospermum suaveolens 

॑Tekdi 



No comments:

Post a Comment