आज चांदणे उन्हात हसले....
Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre, पेंढारी
शहरं, त्यांचा विस्तार आपण फारसा टाळू शकत नाही. त्याच्या बाहेरील कक्षेतील परिसरात खेडी किंवा गावं आणि शहरं यांचा मेळ दिसतो.
उतरत्या छपरांची घरं, शेतं, गोठे, मध्येच कारखाने, सॉफ्टवेअर कंपन्या, उंच डोंगरावर झाडी, तर कुठे Gliricidia सारख्या रांगेत लावलेल्या वनस्पती..किंवा उंचच उंच डोंगरावर टुमदार बंगला, नद्या.. त्यांच्या तीरावरील विस्तीर्ण झाडी किंवा तीरावरील नवीन येणारे प्रकल्प.. हे सगळंच आपण प्रवासात बघत असतो.
अशाच एका प्रवासात आम्ही अचानक थांबलो, नांदे -चांदे -घोटावडे कडून सुस रस्त्याला यायला लागलो की.. एके ठिकाणी शेतात काहीच नव्हतं, काटक्या आणि वळलेलं गवत, तापणारे खडक, मोठ्या शिळा, शेजारी फक्त करवंदाची आणि कोंढुराची झुडुपे तेव्हढी हिरवी होती, काटेरी असली तरी त्यात बऱ्याच पक्षांचा टिव-टिवाट होता. भोरड्या आणि बुलबुलांचाच आवाज तेव्हढा ओळखायला आला,
उन्हाळ्यात शेताच्या बांधावर, लक्ष वेधून घेणारं झाड पूर्ण निष्पर्ण, टोकाला काहीशी मोजकी पाने, सगळ्या पानांची तोंडे आकाशाच्या दिशेला, शेताचा बांध रस्त्यापेक्षा बराच उंच होता, एखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी hording लावावं तशी चार पाच झाडे एक रांगेत बांधावर उंच उभी होती, कुणीही हे चित्रं पहिलं तर विसरू शकणार नाही, यालाही कारण तसचं होतं,
भर उन्हात .. चांदणं ..
चमकदार पांनानसोबत लगडलेली फुले.. फुलांचा परिमळ काय तो वर्णवा, निसर्गाने इथून वळणाऱ्या वाटसरुसाठी हा सुगंध अंथरला असावा, रस्त्यावरून थेट ह्या फुलांजवळ पोचता येईना, बांध उंचावर आणि खाली पाणी वाहून जायला दोन चार फुट खोल चर .. मग लक्षात आलं की इथे पेंढाऱ्याची अनेक झुडुपे आहेत, काही उंच तर काही ठिकाणी जमिनीतून उगून आलेली बिल्लास भर रोपेही आहेत, वाळलेलं गवत आणि काटे बाजूला करत झाडांजवळ पोचले, पांनाची लकाकी उन्हं झेलत होती, सुकलेलं मृत झालेलं, गंजलेलं वाटावं असं झाड मोजक्या पानानमुळे अतिशय तेजस्वी वाटत होतं, फुलांचा सुगंध जणू वैशाखाची धगधग शांत करीत होता. एका उंच पेंढाऱ्याच्या झाडावर अगदी वर वासनवेल तिचा दुपट्टा उडवून घेत होत होती.
पेंढाऱ्याला खूप कमी फांद्या आडव्या वाढलेल्या दिसल्या, झाडाची वाढही अगदी सरळ झालेली.. काही फांद्यांना तर पानेही नव्हती पण टोकाला फुले होती. फांद्यांना काही ठिकाणी काटेही होते, काही ठिकाणी तर खोडालाच बोटभर फांदी येऊन त्यावर कळ्या आलेल्या दिसल्या, खोड आणि फांद्या किंचित लाल, तपकिरी रंगाच्या होत्या.. फांद्या सरळ, ताठ, चौकोनी असून, लहान फांद्या पसरणाऱ्या आणि दाटलेल्या दिसल्या त्यामुळे एक प्रकारची जाळी तयार झालेली दिसली, यात एक घरटही सापडलं.. कदाचित मुनिया सारख्या पक्ष्याचं असावं. खूप शोधल्यावर एकाच ठिकाणी एक फळ सापडलं.
फळ बोरापेक्षा मोठे, अंडाकृती किंवा लंबगोलाकार, गुळगुळीत, हिरवट पिवळे; बिया गुळगुळीत, चपट्या.
पाने आकाराने अंडाकृती पण किंचित टोक असलेली, अंदाजे दोन ते तीन इंच लांबीची, काही ठिकाणी पाने छोट्या फांद्यांच्या टोकावर गुच्छयात ओंजळी प्रमाणे आलेली दिसली. पाने कोवळ्या अंकुरांवर समोरासमोर किंवा लहान फांद्यांच्या टोकांवर जुडग्यांमध्ये दिसली.
फांद्यांच्या टोकांवर त्यांच्या लहान देठांवर फुले एकटी तर गुच्छातही दिसली, फुले मोठी, पांढरी आणि अतिशय सुगंधी. पुष्पकोष वरच्या बाजूला नळीसारखा, बोथट पाच दात असलेला. फुलाच्या पांढऱ्या, मऊ आणि सुगंधी सहा सहा पाकळ्या दिसून आल्यात. त्या जाडसर व बाहेर पसरलेल्या असल्यामुळे फूल ताऱ्यासारखे भासले. पाकळ्या एकावर एक अशा रचलेल्या होत्या. पाकळ्यांच्या खाली असलेले हिरवट छोटे पुष्पदल कळीचे संरक्षण करतात. ही सगळी तळाशी घंटेसारखे जोडलेले दिसून आलेत. पुंकेसर फुलाच्या मध्यभागी पिवळसर रंगात स्थिर दिसून आलेत.
या फुलाच्या सुगंधामुळे या वनस्पतीला Divine Jasmine म्हणतात, या उल्लेखामुळे ही वनस्पती घराघरातील अंगणात, सोसायत्यांमध्ये अंगणात असावी असं सारखं वाटू लागलं,
एखाद्या वनस्पतीला संशोधकावरून आणि तिच्या मूळच्या जागेवरून नामकरणाची ही पद्धत मला फार आवडते, त्या नावासोबतच तिचा इतिहासही प्रवास करत असतो.
Danish शास्त्रज्ञ Anders Jahan Retzius यांनी सर्वप्रथम १७८१ मध्ये त्यांच्या 'Observationes Botanicae' या प्रकाशनात 'Gardenia uliginosa' या नावाने या वनस्पती प्रजातीचे वर्णन केले. म्हणून वनस्पतीशास्त्रीय नामकरणामध्ये, "(Retz.)" हा उल्लेख सूचित करतो की Retzius हे त्या प्रजातीचे मूळ लेखक आहेत.
त्या नंतर फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ Jean-Louis Marie Poiret यांनी 1817 मध्ये या प्रजातीचे पुनर्वर्गीकरण केले. आणि ही वनस्पती Randia ulignosa (Retz.) Poir अशी ओळखली जाऊ लागली. भारतात १९७९ मध्ये D. D. Tirvengadum आणि C. Sastre या शास्त्रज्ञांनी या प्रजातीचे पुनर्वर्गीकरण केले. आणि याचे Tamilnadia uliginosa असे नामकरण झाले, या वनस्पतीचे Tamilnadia हे प्रजातीचे नाव भारतीय राज्य तमिळनाडूवरून आले आहे, जिथे ही वनस्पती प्रामुख्याने नोंदवली गेली आहे आणि मूळची आहे. यात Gardenia मधून Randia आणि नंतर Tamilnadia करण्यात आले, तर मूळ प्रजातीचे नाव (uliginosa) कायम ठेवण्यात आले.
Tamilnadia uliginosa
Family: Rubiaceae (कॉफी फॅमिली)
Common name: Divine Jasmine
Botanical Name:
Gardenia uliginosa Retz. in Observ. Bot. (1781)
Posoqueria uliginosa (Retz.) Roxb. (1824)
Randia uliginosa (Retz.) Poir. (1812)
Xeromphis uliginosa (Retz.) Maheshw. 1961
Tamilnadia uliginosa (Retz.) Tirveng. & Sastre in 1979
मराठी नाव: पेंढारी, पेंढरा, पेंडारी, पेंडर, पेंडू, पेंढूर
संस्कृत नाव: पिण्डालु, पिण्डितक
झाडाचे मुळं, पाने, कच्ची आणि पिकलेली फळे याचा अनेक आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केल्याचा उल्लेख आढळतो, गुरे ढोरे, शेळ्या बकऱ्या याचा पाला खातात, डायरिया, दाढ दुखी, अतिसार अशा अनेक आजारांवर उपचारासाठी हे झाड उपयुक्त ठरते.
टेकड्या, डोंगर हे जर आपण व्यापत असू तर या दैवी सुगंधाची निर्मिती आपण आपल्या बागांमध्ये, घराजवळ अशी केली तर.. हा नैसर्गिक सुगंध आपल्या आजूबाजूला आपल्या परसात दरवळू लागला तर...माणसाने मिरावला तर.. असा सुगंध ज्याला पैशाचं मोल नाही, कसला हव्यास नाही, कशाशी तुलाना नाही, त्यावर कुणाची मालकी नाही..
म्हणूनच तर हे सगळं दिव्य आणि दैवी.
Ref: https://powo.science.kew.org/taxon/urn:lsid:ipni.org:names:767328-1
https://www.jbsd.in/Vol%209%20No%201/Jasbir%20Bagga97-99.pdf
https://www.researchgate.net/publication/337393965_AN_UPDATED_REVIEW_ON_TAMILNADIA_ULIGINOSA
https://efloraofindia.com/efi/tamilnadia-uliginosa/
https://www.researchgate.net/publication/337393965_AN_UPDATED_REVIEW_ON_TAMILNADIA_ULIGINOSA
https://indiaflora-ces.iisc.ac.in/FloraPeninsular/herbsheet.php?id=8673&cat=7
रूपाली भोळे
Proopalee@gmail. Com
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment