Friday, 18 December 2020

सगळ्यांचीच गोष्ट

 

सगळ्यांचीच गोष्ट

रूपाली भोळे

आधी मला वाटलं, ही गोष्ट आहे दोघांचीच. एक झाड तेंदूचं आणि त्याला वेढलेली वेल म्हाळुंगीची. मग नंतर लक्षात आलं, की तेंदुच्या झाडाच्या फांदीवर पूर्वेकडे अगदी कोवळं ऊन मिळेल असा गुंता झाडाला चिटकून आहे. मग लक्षात आलं, ही गोष्ट तिघांची. मग रोज टेकडीवर जाताना मी त्यांची गोष्ट शोधी. त्यांच्याजवळ क्षणभर तिथे विसावा घेई. पण तिघे मात्र गळ्यात गळे घालून, पाय रोऊन उतारावर उभे. तो गुंता मात्र डोक्यात अजून गुंता वाढवत जाई. हा गुंता ओळखायला नेहमीप्रमाणे मंदार दातार या helpline ने मदत केली.


Leafless mistletoe 
तर गोष्टीतलं तिसरं पात्र होतं – Viscum articulatum , पानं नसलेलं बांडगुळ (leafless mistletoe). तेंदू मात्र एखाद्या बलाढ्य पुरूषासारखा एका खांद्यावर म्हाळुंगीची वेल तर दुसरीकडे हे पानं नसलेलं बांडगुळ; आणि पायाशी, त्याच्या बुंध्याशी गिरणूळ (द्राक्षाचं झाड), टणटणी, गवतांचे अनेक प्रकार यांना सांभाळत उतारावर पाय घट्ट रोवून उभा. तेंदुने ज्या प्रकारे या सगळ्यांना कवेत घेतलं होतं, त्यावरून लांबून एकच वनस्पती असल्यासारखं वाटे.

 


उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हातही हे बांडगुळ हिरवं-पिवळसर होतं. पावसाळ्यात हिरवा रंग गडद झाला. पावसाळ्यातील त्याची बारिकशी फुले डोळ्यांनी दिसली नाहीत, पण पावसानंतर मोत्यांसारखी छोटी फळे स्पष्ट दिसू लागली. बोटाएवढी पेरं, अनेक फांद्यांचं जाळं, फांद्या चपट्या, हिरव्या, मांसल. जणू काही दोन्ही बाजूंना कडा असलेल्या बोटभर आकाराच्या पट्ट्या एकमेकींना जोडलेल्या. एक किचकट ओरिगामी रचना. या भौमितीक रचनेत प्रत्येक जोडाला म्हणजे कोनाला ही हिरवट  पांढरी मण्यांसारखी फळे चिकटलेली.

या बांडगुळासाठी तेंदू ही आश्रयी वनस्पती. पण viscum जातीचं हे बांडगुळ पूर्णपणे परजीवी नाही. याची शोषक मुळे तेंदुच्या खोडातून, फांद्यांमधून पाणी, खनिज, क्षार घेतात आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात (अर्धपरजीवी, hemiparasite). तेंदुच्या काही फांद्या वाळून कोरड्या झालेल्याही दिसल्या. काही प्रमाणात आश्रयी वनस्पतीला हानी पोचू शकते.

म्हाळुंगी

यावर अनेक छोटे पक्षी, किटक, फुलपाखरं यांचा वावर यावर दिसून आला. उब मिळवण्यासाठी पायमोज्यासारखं कापड गवतात गुंतवून मुनियासारख्या पक्ष्याचं घरटं यावर दिसून आलं. यावरील फुलटोच्यासारखे अनेक पक्षी आमच्याकडून लांबून का होईना पण फोटो काढून घ्यायला तयार नव्हते. फळ खाऊन फुलटोचा सारखी चोच पुसताना दिसला.

मुनियाचं घरटं

फुलटोचा 

उतारावरील तेंदू, त्याच्या कवेतली म्हाळूंगी आणि अंगावरील  सदाहरित बांडगुळ आणि यामुळे जमा झालेले पक्षी किटक, फुलपाखरं, तळाशी असेलेले गिरणुळ, टणटणी, गवत हे सगळं मिळून एक छोटी परिसंस्थाच तयार झालेली दिसून आली. परजीवी असलेली ही वनस्पती अनेक जिवांचं आश्रयस्थान झालेली दिसत होती.

बांडगुळाला इंग्रजीत mistletoe म्हणतात. जगभरात त्याच्या तेराशे प्रजाती असून त्यातल्या अनेक भारतात सापडतात. जुन्या इंग्रजी भाषेत mistle म्हणजे विष्ठा आणि toe - tan म्हणजे डहाळ्या. बांडगुळाची फळं खाऊन पक्षी विष्ठेद्वारे इतर झाडांच्या फांद्यावर बिजप्रसार करतात. शिवाय त्यांच्या फळातील चिकट द्रवामुळे पक्षी आपल्या चोची इतर झाडांच्या फांद्यांना घासत असतात, आणि त्यामुळे बीजप्रसार होतो.

 


जगभरातील पुराणात mistletoe विषयी अनेक संदर्भ सापडतात.

प्लिनी नावाचा एक कोशकर्ता इसवीसनाच्या पहिल्या शतकात होऊन गेला. त्यानं नॅचरल हिस्टरी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्यात ड्रुइड पंथाची माणसं ओकवृक्षावरून कशाप्रकारे बांडगुळं काढत असत याचं तपशिलवार वर्णन केलं आहे. पायघोळ पांढरं वस्त्र धारण केलेला ड्रुइड सोन्याच्या विळीनं बांडगुळाच्या फांद्या कापून काढत असत आणि खाली उभे राहिलेले इतर त्या बांडगुळाचं एकही पान किंवा फळ जमिनीवर पडू देता शिताफीनं झेलून घेत असत. बांडगुळं झेलण्याचा विधी सुविहीतपणे पार पडण्यासाठी ते दोन बैलांचा बळीही देत असत. या बांडगुळांची पानं वर्षभर हिरवी रहात असल्यामुळे पहिल्या शतकातल्या ड्रुइडांनी बांडगुळांना त्यांच्या संस्कृतीत पवित्र स्थान बहाल केलं होतं. ऐन हिवाळ्यात त्यांना फळ धरत असल्यामुळे त्यांच्यासाठी ती जिवंतपणांची आणि सुपिकतेची प्रतिकं ठरली होती. एवढंच नाही, तर दोन सैनिक जर बांडगुळं असलेल्या झाडाखाली एकमेकांच्या आमनेसामने आले, तर दिवसाभरासाठी त्यांनी संधी करून एकमेकांशी लढू नये, असा संकेतही त्या काळात रुढ होता. ओव्हिड या लॅटिन कविच्या साहित्यातही बांडगुळांचा उल्लेख अनेकवेळा येतो. नॉर्स पुराणात बाल्डर या शांततेच्या देवाची विषारी बांडगुळाचा बाण करून हत्या होते, म्हणून मग बाकीचे सगळे देव त्याला वाचवण्यासाठी प्रेमाच्या देवतेला ते विषारी बांडगुळ अर्पण करतात, प्रेमाची देवता त्यातले विष काढून टाकते आणि शांततेच्या देवाचे प्राण वाचवते असा उल्लेख येतो. शेक्सपिअरच्या टायटस अॅन्ड्रोनिकस नाटकातही हा संदर्भ आढळतो. त्यानंतर बांडगुळाच्या डहाळीखाली कुणी एकमेकांना भेटलं तर त्यांनी एकमेकांचं चुंबन घ्यावं, अशी प्रथाच सुरू झाली. आजही पाश्चिमात्य परंपरेत ख्रिसमसच्या सणाला लोक दारावर बांडगुळाची डहाळी टांगतात आणि सणासाठी घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे त्या डहाळीखाली चुंबन घेतात हा रिवाज आहे. शेतीचं काम सुरु करण्यापूर्वी शेतातल्या जनावरांना बांडगुळाची फांदी चारली तर आपत्ती टळते अशी जुन्या ब्रिटीश शेतकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा होती. तर फ्रेंच शेतकऱ्यांमध्ये पेरणीपूर्वी शेतात बांडगुळ जाळलं तर पिक चांगलं येतं अशी समजूत होती. उपवर मुलीने आपल्या उशीखाली बांडगुळाची फांदी ठेवली तर तिला स्वप्नात तिच्या भावी वराचं दर्शन घडतं, अशीही एक अंधश्रद्धा होती.



साहित्यात साधारणपणे जेव्हाही बांडगुळ हा शब्द येतो, तेव्हा तो दुसऱ्याच्या जिवावर जगणरा, परावलंबी अशा काहीशा नकारार्थी स्वरात वापरला जातो. पण टेकडीवरच्या तेंदुच्या झाडावरचं हे बांडगुळ, त्याच्या अवतीभवती असलेले पक्षी, किडे, फुलपाखरं, ह्या सगळ्यांमुळे झाडाच्या परिसरात उगवलेली नवी झाडं-झुडपं - हे सगळं पाहिलं की वाटतं की या बांडगुळानं आपल्या भवताली एक छोटसं विश्वच निर्माण केलंय, जणू विश्वामित्राची प्रतिसृष्टीच. मग ही केवळ कुणा दोघांची वा तिघांचीच गोष्ट रहात नाही तर या प्रतिसृष्टीतल्या सगळ्यांचीच, अवघ्या चराचराची गोष्ट बनते.

- रूपाली भोळे

 proopalee @gmail.com


Ref :

www.flowersofindia.net
https://medium.com/@WriterMariecor/what-to-know-about-mistletoe-facts-and-mythology-959fc8c18934
https://marathivishwakosh.org


 

Tendu Leaves

शास्त्रीय नाव: Diospyrous melonoxylon

कुळ Ebenaceae

मराठी नाव: तेंदु, टेंभुर्णी

 

Leafless Mistletoe, Joined mistletoe  

शास्त्रीय नाव: Viscum articulatum

मराठी नाव: बंदा

 

Purple morning glory

शास्त्रीय नाव: Argyreia cuneata

कुळ Convolvulaceae

मराठी नाव म्हाळुंगी


Saturday, 5 December 2020

बाईलवेडा कवडा आणि शिताबाईचे पोहे

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी।

रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी।

रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे।

अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे।

कोकणावर मनस्वी प्रेम करणा-या कवी माधव काटदरे यांच्या ’हिरवे तळकोकण’ या कवितेतल्या या ओळींच्या अर्थाचं गूढ खूप काळ मनात होतं. कोण ही शिताबाई? तिने कसले पोहे केले? बाईलवेड्या कवड्याने ते कोकणच्या सड्यांवर का भिरकावले? 

कवितेतल्या वर्णनावरून ते कातळसड्यांवरचं एखादं तृणपुष्प असेल इतकी कल्पना आली. मग एकदा लायब्ररीत ना. ग. गोरेंचा ’सीतेचे पोहे’ नावाचा कथासंग्रह पाहाण्यात आला. त्यात याबद्दल काही माहिती मिळाली नाही, पण त्याच्या मुखपृष्ठावर चितारलेलं गवत म्हणजेच ’सीतेचे पोहे’ इ्तकं समजलं. मग त्यावरून अधिक शोध घेतला असता, ’सीतेचे पोहे’ म्हणजेच ’चायनीज लव्हग्रास’ नावाचं, चिमणचा-यासारखं दिसणारं, Poeceae कुळातलं, कोकणातल्या घरी कांडलेल्या पोह्यांसरख्या गुलाबी रंगाची पोह्यांसारखीच चपटी फुलं येणारं एक गवत, हा ही शोध लागला. 

निम्मं कोडं सुटलं. 

आता तो बाईलवेडा कवडा आणि गोड चवीचे पोहे कांडणारी ती शिताबाई या मंडळींचा शोध घेणं आलं. कवडा म्हणजे होला/ पारवा. या पक्ष्याचा आणि शिताबाईचा काय संबंध? तो शोध लागला एका लोककथेत! तर, कवडा जेव्हा माणूस होता तेव्हाची ही गोष्ट- सीता ही कवड्याची लहान बहीण. कवडा एकदा शेतातून घरी आला, त्याला पोहे खावेसे वाटले. आता पोहे करायचे म्हणजे भात कांडण्यापासून तयारी. आळशी बायकोने लक्षच दिलं नाही. सीताबाई मात्र सकाळपासून भावासाठी पोहे करण्याच्या कामाला लागली. तिने तांदूळ निवडले, उनउन पाण्यात भिजवले, भाजले, उखळात घालून कांडले आणि भाऊ शेतातून घरी परतण्याआधी त्याच्यासाठी पोहे तयार करून ठेवले. नणंदबाईचं पारडं जड झालेलं भावजयीला काही सहन होईना. तिने मुठभर खडे त्या पोह्यात गुपचुप मिसळून टाकले. पहिल्याच घासाला खडा लागताक्षणी कवड्याचा पारा असा काही चढला, की तिरीमिरीत त्याने सीतेला लाथ घातली. सीतेने कळवळत खरा प्रकार भावाला सांगितला आणि ती जागीच मरुन गेली. भावाला पश्चात्ताप झाला, पण आता फार उशीर झाला होता. शिताबाईच्या हातच्या त्या गोड पोह्यांची फुलं झाली आणि रानोमाळ पसरली. बाईलवेडा कवडा पक्षी झाला आणि  ’तुझ्या हातचे पोहे गोड गोड गोड, तुला मारणारा मी पोर पोर पोर’ असं ओरडत राहीला. हा कवडा आजही माळावर उतरून ते चविष्ट पोहे टिपत असलेला दिसतो!

तर ही हरदासी कथा सांगायचं कारण म्हणजे, नोव्हेंबरतल्या पहाटे टेकडीवरच्या दंवाने भिजलेल्या गवतातून हिंडताना एकदोन ठिकाणीच हे सीतेचे पोहेही दिसले. अगदी जमिनीलगत वाढणारं हे गवत आहे. टेकडीवरच्या कमरेइतक्या उंच वाढणा-या गवतात ते कळूनही येत नाही. बाणाच्या शेपटीसारख्या रचनेची, पण टोकाकडे निमुळती होत जाणारी याची गुलाबीसर रंगाची फुलं थेट पेणच्या पोह्यांसारखी दिसतात. ही पोस्ट टाकण्याआधी याचे जरा बरे फोटो घ्यावेत म्हणुन एकदोन दिवसांपूर्वी टेकडीवर माळावरच्या गवतातून याला शोध शोध शोधलं, पण कवड्यानं टेकडीवरचे सगळे पोहे संपवले असावेत.


याचं वनस्पतीशास्त्रीय नाव Eragrostis unioloides. यातला Eragrostis हा शब्द Eros (Love) आणि agrostis (grass) यापासून बनला आहे. Eragrostis म्हणजे lovegrass आणि Unioloides म्हणजे Uniola किंवा sea oats या गवताच्या एका गटाशी नातं सांगणारं. Uniola या गटात सीतेच्या पोह्यांसारखीच फुलं येणारी अनेक प्रकारची गवतं येतात. आणि त्यातल्या काही जाती अगदी पौष्टीक खाद्य म्हणून वापरल्या जातात

आता lovegrass हे नाव का दिलं गेलं हा एक प्रश्न अजून आहेच. सीतेच्या पोह्याच्या गोष्टीत बहिणीचं प्रेम आहे. lovegrass च्या गोष्टीत कोणाचं प्रेम आहे देव जाणे!

–----–---------------––------------------------------------

–------------------------------------------------------------

ही पोस्ट टाकली आणि एका मित्राने lovegrass या नावामागाची गोष्ट सांगणारा एक ब्लॉग शेअर केला:

https://www.anniesannuals.com/signs/d%20-%20g/eragrostis_spectabilis.htm

" It has been called “lovegrass” since the Middle Ages. The story goes that it was named that because of the tendency of its flower panicles to catch in ladies’ long dresses and petticoats as they walked through pastures. Once caught, the panicles would slowly creep upward as they walk, tickling their legs." 😅😅😅

#tekdi