Saturday, 14 August 2021

दिवस आणि रात्रीच्या सीमेवरचा, सोहळा चांदणं फुलण्याचा!


 

दिवस आणि रात्रीच्या सीमेवरचा,
सोहळा चांदणं फुलण्याचा!

--रूपाली भोळे 

आमच्या टेकडीवर एक आजोबा रहातात. त्यांच्या झोपडीच्या पूर्वेकडे मोईचं बन आहे. मोईच्या बनात अधुनमधून आपटा, खैर. आणि ही जागा विशेष लक्षात रहाते, ती लाल-तांबड्या आईन्यामुळे. मोईची झाडं आता पसरून त्यांचा विशिष्ट घेर जाणवू लागलाय. एका ठिकाणी तर चारपाच जणींनी एकत्र येऊन त्यांच्या फांद्या जमिनीकडे टेकवून त्यांचा घुमट किंवा डोम तयार केलाय. पावसात, उन-वाऱ्यांत सुरक्षितपणे त्याच्या आत राहता येईल असा. आम्हाला भूलवणारे मोरांचे आवाज कादाचित इथूनच येत असावेत. मोईच्या बुडाशी वासनवेली, द्राक्षवेली, अनेक प्रकारची गवतं, रानभेंडी यांचंही अस्तित्त्व अनेक पक्ष्यांच्या, किटकांच्या पुढील पिढ्यांना संरक्षित करताहेत. काही ठिकाणी मोईच्या पानांना चाळणी प्रमाणे छिद्रे दिसत आहेत.

मोईचं बन 

जून महिन्यात टेकडीवर गेलो होतो तेव्हा एका मोईच्या झाडाला वेढलेली एक वेल का कोण जाणे पण लक्षात राहिली. तशी तिची आणि माझी पहिली ओळख गेल्या वर्षीच झाली होती




लहान बाळाच्या हाताच्या तळव्याएवढी पानं, त्यावर जणू छान कोरीव मेंदी काढल्याप्रमाणे ठळक जांभळ्या रेषा. आजोबांच्या झोपडीला पाठ करू उभं राहिलं आणि डावा हात सरळ आणि उजवा काटकोनात वळवून उभं राहिलं की बरोबर हाताच्या टोकांच्या दिशेनं या दोन वेली सापडतात.   

या वेलीचा किंचित पांढरट खोडाचा पीळ मोईला घट्ट बिलगून होता, विळखा म्हणता येईल असा.   

वेलीच्या फांद्या जांभळ्या, बारीक, शिडशिडीत. मोईला बिलगून, घट्ट वेढून सरासरा चढली असेल वेल, असं वाटत होतं. ही वेल फांजीची वेल म्हणून मला माहित होती. याच्या पानांच्या वड्या करतात, भाजी करतात, म्हणून ही माहित होती.




पानांची मांडणी एका आड एक दिसून आली, फुले आलेल्या वेलीची पाने तशी आकाराने लहान वाटली, बदामाच्या आकारासारखी, पाने आणि कोवळ्या फांद्या किंचित लवयुक्त दिसल्या. पानांना मध्यातून  घडी घातली असल्याप्रमाणे अर्धवट मुडपलेली, स्पष्ट जांभळी मुख्य शीर. 

पानांवर काही बारीक काळे केसांसारखे तंतू दिसून आले होते. पण ते काय असेल हे काही लक्षात येत नव्हतं. नेहमी जाता-येता तिची ख्याली-खुशाली विचारून पुढे जायचो.  तिचं खोड, फांद्या, पानं, पानांवरची बारीक नक्षी डोळ्यात साठवायचो. पण काही केल्या फुलं काही दिसेच ना, सकाळी आम्ही जेव्हा जायचो, तेव्हा सगळी फुलं कोमेजून गेलेली, कधी दिसतील हिची फुलं?

मध्येच ऑगस्टच्या सुरुवातीला डावीकडच्या वेलीवर अजून असंख्य केसांसारखे तंतु पानांना चिटकलेले दिसून आले 
,वेगळीच बुरशी दिसतेय अस काहीसं वाटू लागलं, 

उजवीकडच्या दुसऱ्या वेलीवर मात्र काही कळ्या दिसून आल्या. पण फुलं नाहीच.

नंतर कधीतरी कळलं, हिचंच दुसरं नाव म्हणजे - सांजवेल, म्हणजे संध्याकाळी उमलणारी.

मग ठरवंल, संध्याकाळी जाऊन बघूया.



संध्याकाळी आम्ही टेकडीवर पोचलो, तेव्हा साधारण सहा वाजले असावेत. सांजवेलीला अनेक कळ्या लगडलेल्या होत्या. आणि कळ्यांच्या टोकांवर अनेक बारिक-बारिक किडे, माश्या बसलेल्या दिसत होत्या. कळ्यांच्या अवतीभवती रेंगाळत होत्या.   

 Golden Tortoise Beetle  

कळ्या अजून फुलण्याची काही चिन्हं दिसत नसल्यामुळे, अश्विनीला म्हटलं, ‘चल, तोवर ती केसाळ तंतु असलेली वेल बघून येऊ या’. थोड्या अंतरावरची ती वेल आम्ही बघायला निघालो. निट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं, की पानांवर मागे जे काळे तंतू दिसून आले होते, ते खरं तर सोनेरी कासवकिड्यांचे कोष (Golden Tortoise Beetle) होते. त्यांच्या खालून कासवकिडे येऊन पानं गट्टम करत होते.    

आम्ही हात लावल्याबरोबर ते दोन-तीन साकव किडे खाली पडले, जणू काही त्यांनी मेल्याचं सोंग केलं. ह्या कासवकिड्यांना प्लास्टिकसारखं ट्रान्सपरंट पांढरं वलय होतं आणि मध्ये पेरभर लांबीचे कासवकिडे. कासवकिड्याच्या समूहाने सबंध वेलीची पानेच्या पाने कुरतडून खाल्ली होती ,




दरम्यान दुसऱ्या वेलीवरची फुलं आता फुलली असतील म्हणून आम्ही परत उजव्या वेलीकडे निघालो. आणि लांबूनच आम्हाला मोठ्ठीच्या मोठी, टप्पोरी, पांढरी फुलं दिसू लागली. हे सगळं दृश्यच एवढं विलक्षण होतं की, आजुबाजूचा संधीप्रकाश, भवतालातले वेगवेगळे रंग, आकाशाच्या विविधरंगी छटा, पक्ष्यांची गाणी, खाली-वर होत जाणारी क्षितीजरेषा ह्या सगळ्यांनी मिळून जणू ती वेल तयार झाली आहे, असंच भासत होतं. आम्ही वेलीजवळ जाऊन पोचलो. वेलीवर काही फुलं फुललेली होती, पण काही मात्र अजून कळ्याच होत्या. एका टपोऱ्या कळीकडे आम्ही निरखून पाहू लागलो. आमच्यासारखेच कळीच्या आजुबाजूला दबा धरून बसलेले छोटे छोटे किटक, माश्या ती कळी उमलण्याची वाट पहात होत्या. आणि . . 

.

 . . आणि त्या स्वर्गिय क्षणाच्या आम्ही साक्षिदार झालो. आमच्या डोळ्यांदेखत ती इवलिशी कळी हळूहळू उमलत गेली आणि तिचं एका देखण्या, टप्पोऱ्या, डौलदार फुलात रुपांतर झालं. सृष्टीचा हा नयनमनोहर चमत्कार आम्ही थेट बघत होतो, प्रत्यक्ष ! मग अजून एक, अजून आणखी एक. एका पाठोपाठ एक कळ्या उमलत होत्या, अंधुक होत चाललेल्या वातावरणात गर्द, दाट हिर्व्या पानांच्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग परीघ वाढवत दिसू लागला. एकेक फुल फुलू लागताच संपूर्ण आसमंत त्या फुलांच्या मंद मादक वासानं सुगंधीत होऊ लागला. आणि एकेक फुल जसंजसं उमलायचं तसंतशी फुलाच्या आतल्या मधावर डल्ला मारायला आजुबाजू्च्या किड्यांची फौज फुलाच्या घेऱ्यात भस्सकन शिरायची. जादूने भरलेला-भारलेला सोहळा आपल्या डोळ्यांनी, नाकांनी किती टिपू आणि किती नको, असं आम्हा दोघींना झालं. टेकडीनं आम्हाला हा सुखाचा क्षण बहाल केला होता, तो आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. आपण राहतो त्या परिसरात एवढ्या अमूल्य गोष्टी आहेत, केवळ काही पावलं चालून जाताच सृष्टीचा हा चित्तचक्षुचमत्कारिक सोहळा आपण स्वादू शकतो, अनुभवू शकतो - याचंच अप्रूप वाटत राहतं.

 



निसर्गानं प्रछन्नपणे मांडलेल्या या उत्सवाला पुन्हा अनुभवण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पावलं आपसूकच टेकडीकडे वळली. संध्याकाळ खरंतर होऊन गेली होती, कालच्यापेक्षा जरासा उशिरच झाला होता. बरीचशी फुलं तर उमलूनही गेली असतील. आम्ही पटापटा टेकडी चढू लागलो. पायाशी येणाऱ्या दगड-धोंड्यांची तमा बाळगता, चिखल, राडा-रोडा तुडवत कशातरी आम्ही एकदाच्या वेलीपर्यंत पोचलो. आणि उमलणारी फुलं बघतबघत शांत झालो.

 

सांज, संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्रीला जोडणारा काळ, उजेड आणि अंधार यांच्यामधला पुल. सांज जसजशी ढळत जाते, रात्रीच्या अंधाऱ्या चादरीवर एकेक चांदणी चमकू लागते. एकेक करता करता सगळं आकाश चांदण्यांनी फुलून जातं. रात्र हळूहळू उमलू लागते. संध्याकाळी सांजवेलीवर फुलं उमलतात नी वाऱ्यासोबत त्यांचा सुगंध आकाशाला जाऊन भिडतो. रात्रीच्या वेळी आकाशात चांदण्या फुलण्याचा प्रवास सांजवेलीच्या फुलण्यापासूनच तर सुरु होत नसावा?   

 ---------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय नाव: Rivea hypocrateriformis, Convolvulus hypocrateriformis

कुळ: Convolvulaceae

Midnapore Creeper, Commom night glory, कल्मीलता

स्थानिक नावे: मराठी: फांग, फांजी, तमिळ: मुसुटाईकोडी बुधीकीराई, कानडी: बोड्डी कुरा

Hypocrateriform:  hypo म्हणजे खालच्या बाजूला, आत, crater म्हणजे bowl वाडग्या सारखं आणि form म्हणजे आकार. जुन्या ग्रीक भाषेतल्या शब्दावरून हे नाव तयार झालेलं असून त्याचा ढोबळमानानं अर्थ वाडग्यासारख्या आकाराखाली आधारासाठी नळीसारखा भाग असतो, अशी फुलं.   

या सदाहरित वेलीची पाने आणि कोवळे शेंडे भाजी साठी वापरतात, तर मुळे आणि बिया, खोड  औषध म्हणून त्वचा विकार, डोकेदुखी, खोकला अशा अनेक विकरांवर गुणकारी असल्याचे वाचनात आले.

 

रूपाली भोळे, proopalee@gmail.com

15 ऑगस्ट 2021

 

 

 

Saturday, 3 July 2021

.. बाई फुलात न्हाली..

 

.. बाई फुलात न्हाली..

महाजन सरांनी त्यांच्या एका मुलाखतीत वृक्षांसोबतच वेलींचा अधिवासही महत्वाचा असल्याचं सांगितलं आणि गुरूच्या एका वक्तव्यानं दृष्टी प्राप्त होऊन टेकडीवर भरपूर वेली आमच्या नजरेस पडू लागल्या. टेकडीवर जैवविविधतेच्या दृष्टीने एक hotspot आहे. आम्ही गोमेटीचे फोटो काढत असताना परवाच तिथून एक भेकर पळताना दिसलं. शंभरात एखाद्याचं व्यक्तिमत्व कायमस्वरूपी लक्षात राहावं अशी गोमेटी गेल्या वर्षीपासून डोक्यात होतीच. काटक, शिळशिळीत बांध्याची, ही भर ज्वानीतली नार पहिल्या पावसासोबत जमिनीतील कंदामधून उफाळून आकाशाच्या दिशेने आधार घेत झेपावली होती

.
मादी पुष्प 

टेकडीवर गोमेटीनं धामणाच्या फांद्यांना आणि धावड्याच्या खोडाला प्रेमानं कवेत घेतलंय. धावड्याच्या शेंड्यावार पोचायचा तिचा हेतु तिच्या हालचालींवरुन स्पष्ट होतोय. धामणाला मिळेल तिथे विळखा घालत सुटली, तर धावड्याच्या पांढरट सुटणाऱ्या सालीत आपले तणाव गुंतवून तिचा प्रवास वेगात सुरू आहे. नाहीतरी सध्या भरपूर फळलेल्या धामणाच्या वाळलेल्या काड्यांना कोण विचारणार. एके ठिकाणी ऐन तारुण्यातील गोमेटीनं, चिल्हारीच्या सुकलेल्या काटेरी फांद्या तिच्या चमकदार कोवळ्या पांनानी आणि कोवळ्या फळांनी वेढून जीवंत केल्या आहेत, तिचं खोड करंगळीपेक्षाही बारीक शिळशिळीत आणि तर इतर पानं खरखरीत स्पर्शाची. 



धावड्याच्या झाडावरील गोमेटी 
गोमेटी अजून लक्षात राहिली ती तिच्या पानांमुळे, पानं साधी पण एकाच वेलीवर विविध आकाराची. पानं विविध प्रकारे खंडित झालेली (lobed), काही ठिकाणी तर हाताची बोट असल्यासारखा भास होणारी, कोवळी पानं बदामी आकाराची स्पर्शाने किंचित मऊ, तर जुन झालेली त्रिकोणी आकाराची टोकदार खरखरीत, पानांची कडा काही ठिकाणी दातेरी तर काही ठिकाणी लहरीसारखी (wavy), पानांचा आकार काही ठिकाणी हाताच्या पंजासारखा पसरट तर काही ठिकाणी त्रिकोणी टोकदार तर कुठे किंचित गोल, छोट्याशा देठाची, देठ खोडाला चिटकलेला पण पटकन न दिसणारा कारण पानाच्या तळानं  (leaf base) खोडाला गोलाकार पद्धतीने वेढलेलं दिसलं आणि त्याखाली देठ लपलेला असतो. या रचनेमुळे वेलीची फांदी तोरणाप्रमाणे भासते. गोमेटी मुळात Cucurbitaceae कुळातील, म्हणजे काकडी किंवा भोपाळ्याच्या कुळातील.

नर पुष्पे 



गोमेटीची प्रत्येक गोष्ट फुरसत से बनाई असं वाटत राहतं, पानाच्या बेचक्यातून, जिथे देठ खोडाला चिटकला आहे तिथूनच तणाव निघालेले दिसतात. तणाव घट्ट आणि मजबूत पकडीचे, वेलीच्या वाढीची दिशा ठरवणारे, तिला ठामपणे उभं करणारे, धामणावरील गोमेटीची याच पानाच्या बेचक्यातून एकेकटी स्त्री पुष्पे लगडलेली दिसली. पांढऱ्या  घंटेसारख्या लोंबणाऱ्या फुलासोबत लांबट गोल तोंडल्या सारखे ovary (अंडाशय) जोडलेले, त्यावर बारीक पांढरे लांबट ठिपके, अंडाशयाच्या मानाने फुल अतिशय छोटे, मेणचट. पांढऱ्या creamy रंगाचे, पाच छोट्या पाकळ्या, फुल उमलल्यावर पाकळ्या टोकाला किंचित वळतात, बाकी मुळ घंटेचा आकार तसाच. उमललेल्या फुलाच्या पाकळ्या वळून किंचित त्रिकोणी दिसत होत्या, मध्ये गोल आणि चांदणी सारखा आकार वाटू लागतो.

फळ मोठे झाल्यावर अंदाजे दीड ते दोन इंच लांबीचे, त्यावर दोडक्यासारख्या कडा, तोंडलीचा आकार आणि दोडक्याच्या कडा एकत्र मिळून तयार व्हावे तसं फळं दिसत होतं, फळ पिकल्यावर लालसर होतं.


गोमेटी चे फळ 


पण वेलीवर नर पुष्पे दिसेच ना, मग परागीभवन कसं होत असेल, स्त्री पुष्पासोबत असलेलं फळही काही लवकर मोठं होईना, नजर नुसती गोंमेठ गोंमेठ होऊन गेली होती, धामणावरील वेल उंच वाढलेली, फुले आणि फळे जवळून बघायला तसं अवघडच जात होतं, आठवडाभर जवळजवळ रोज गोमेटीला भेट देत होतो, एके दिवशी काय तो साक्षात्कार झाला, जवळच अजून एक गोमेटीची वेल सापडली, पाने तशीच वैविध्यपूर्ण, फुले तशीच पण स्त्री पुष्प असल्याप्रमाणे एकेकटी नव्हती, छत्रीच्या आकाराच्या गुच्छ्यात होती, ही नर पुष्पे असावीत, ही वेल फारशी उंच चढलेली नव्हती, दोन्हीही वेली असंख्य फुलांनी आंगोपांगी फुलल्या होत्या.

या दोन्ही वनस्पती एकलिंगी (monocious) आढळून आल्या, पण ही वनस्पती diocious (नर आणि मादी फुले एकाच वेलीवर) ही असू शकते, हिची मुळं tuberous असतात म्हणजे कंदयुक्त असतात, कंदाची वाढ पुरेशी नसेल तर त्यावेळी शक्यतो नरफुलं उत्पादित होतात, जेणे करून फळासाठी आणि वेलीच्या इतर वाढीसाठी लागणारी अन्न/ऊर्जा योग्य प्रमाणात वापरता यावी, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ मित्र मंदार दातार याने दिली, आणि फळे आणि फुलांचे नियमित निरीक्षण करायला सांगितलं. गोमेटीच्या पानाफुलातील काही विशिष्ठ गंधद्रव्यामुळे काही कीटक आकर्षित होतात, परागीभवन होण्यासाठी मदत करतात.

गोमेटीच्या पांनामधील वैविध्यामुळे आणि रचनेमुळे तिला अनेक नावे दिलेली दिसली, काही ठिकाणी ही नावे synonames असल्याचं दिसून आलं, तर काही ठिकाणी ती वेगवेगळी असल्याचं, त्यातील काही नावे:  Solena amplexicaulius, solena म्हणजे गोड, मधुर चवीचं, गोमेटीच हिरवं फळ किंचित काकडीच्या चवीचं आणि पिकल्यावर मधासारखं गोड, amplexus म्हणजे मागून किंवा एका विशिष्ट पद्धतीने धरून ठेवणारं, caulius म्हणजे खोड, वर उल्लेखल्या प्रमाणे पानाचा तळ खोडाला एका विशिष्ट पद्धतीने पकडून ठेवतो.

Solena heterophylla पानांमध्ये वैविध्य असल्यामुळे तिच्या नावात heterophylla, hetero म्हणजे विविधता असणारी, आणि phylla म्हणजे पाने. पण पानाच्या आकारात एवढी विविधता का असावी? या वनस्पतीची उगवण, वाढीचा काळ आणि किटकांचा, फुलपाखरांचा अंडी देण्याचा काळ सारखाच म्हणता येईल, Solena सारखी पाने कातरलेली किंवा खंडित पाने दिसलीत की कीटक फुलपाखरांना आधीच तिथे कुणाचं तरी अस्तित्व जाणवतं, आणि तिथे अंडी घालायच टाळलं जातं,

Solena या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक solen किंवा सेलेनी या शब्दापासून झालेली असावी, ग्रीक पूराणांमध्ये सेलेनी नावाच्या चंद्रदेवतेचा उल्लेख येतो. आर्टिमीज, सेलेनी आणि होकाटे या तीन चंद्रदेवता असतात, पैकी आर्टिमीज वाढत जाणारा, सेलेनी पूर्ण तर हेकाटे कमी होत जाणारा चंद्र असतो. या तिन्ही देवता मिळून स्त्रीत्वाचं रूपक मांडत असतात. सेलेनीला भरपूर अपत्ये असल्यामुळे तिला तिन्ही अवस्थांमधली पूर्णचंद्राची अवस्था दिली गेली, आणि पौर्णिमेचा दिवस तिच्या पूजेसाठी दिला गेला. 

गोमेटीची पाने, फळे, कंद खाद्य आहेत, ओरिसा मध्ये घराभोवती बागेत या वेली मुद्दाम लावल्या जातात, पावसानंतर याची फळं मिळतात, तामिळनाडूमधील मित्रानं आथालाककाई (Athalakkai fry) म्हणून त्याची आवडती डिश असल्याचं सांगितलं, https://www.youtube.com/watch?v=nncmza4QDSQ

महाराष्ट्रातही गोमेटीची पानं आणि फळं खाद्य असल्याचं वाचनात आलं, पण फळं पुरेशी मिळत नाहीत असा उल्लेख आढळतो.   गोमेटीला गोंमेठ, गोमाट, शिंदोंडे , हिंदीत तरली, कुंदरी, केरळ मध्ये काककरिका तर संस्कृत मध्ये अम्लवेतस,  अशी अनेक नवे सापडतात, तर इंग्रजीत Creeping cucumber म्हणतात.

उत्तम चवी बरोबर मधेमह, दात दुखी, कान दुखी, कॅन्सर, ट्यूमर, पित्त ई विकरांवर आणि उष्णता  रोधक म्हणून उपयुक्त ठरते.  नागपंचमीच्या दिवशी गोमेटी, करटोली, आणि तोंडली या वेलीनची पूजा केली जाते असा उल्लेख निलम जोरवर यांनी आपल्या बखर रानभाज्या या पुस्तकात केला आहे.

रूपाली भोळे, proopalee@gmail.com  

#tekadi

 

                  

Saturday, 19 June 2021

जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती!

टेकडीवरच्या माळावर एक लेकुरवाळी बाभूळ आहे. कोतवाल (Drongo), चास (Indian Rollar), बुलबुल, धानचिमण्या वगैरे छोटी मंडळी तिच्या अंगाखांद्यावर कायम किलबिलत असतात. सुगरणी तिथे दरवर्षी खोपे बांधतात. कधीतरी तिथे अगदी शांतता असते कारण बाभळीच्या शेंड्यावर एखादी कापशी घार सावजाची टेहळणी करत बसलेली असते. ही जागा तिच्यासाठी Vantage point असते. अगदी मोक्याची जागा. आसपासचा केवढातरी परिसर तिच्या टेहळणी टापूत येतो. या बाभळीच्या शेजारी आणखीही मंडळी आहेत. एक मोईचं झाड वाढतंय, थोडी टणटणी वाढली आहे, आणि बाभळीला बिलगून वर वर चढत एका वेलीने बाभळीच्या माथ्यावर आपला संसार मांडला आहे. ही वेलही बाभळीसारखीच लेकुरवाळी आहे. मुंग्या, अफिड्स, सनबर्ड्स, वेगवेगळे कीटक, फुलपाखरं, त्यांच्या अळ्या - असा सगळा गोतावळा तिच्याबरोबर नांदतो. ही हरणदोडी! आणखी एक देखणी वेल. बाभूळ आणि ही हरणदोडीची वेल या सख्ख्या मैत्रिणी आहेत. "चंद्रिके गं सारिके गं - बरी हायस नव्हं?" अशी एकमेकींची मायेने विचारपूस करत एकमेकींच्या गळ्यात गळे घालून नांदतात. टेकडीवर आणखीही कुठे कुठे ही हरणदोडी बाभळीच्या, खैराच्या, चारोळीच्या झाडांच्या आधाराने, आपला पसारा आटोक्यात ठेवून गुण्यागोविंदाने राहाते. हरणदोडी ही बहुवर्षायु woody climber आहे. वेलीच्या खोडाच्या आकारावरून वेल बरीच जुनी आहे ते कळतं, पण तिचा पानांचा पसारा मात्र त्यामानाने आटोपशीरच. टेकडीच्या पायथ्याशी पाषाण-NDA रस्त्याकडेला रामनगर कॉलनीच्या गेटसमोर एका तारेच्या कुंपणावरही ही वेल पसरली आहे. बहुदा बरेच वर्षांपासून आहे. त्या वेलीच्या दाट, गार सावलीत एका चांभारदादांनी आपलं दुकान थाटलं आहे! एकदा त्या वेलीच्या फळांचे फोटो काढायला गेलो, त्यावेळी तिच्या पानावर blue tiger फुलपाखराची अळी शांतपणे चरताना दिसली - milkweed प्रकारची (म्हणजे पान/ देठ/ खोड तोडल्यास चीक येणारी) वेल असल्याने  tiger आणि crow जातीची फुलपाखरं हरणदोडीच्या आसऱ्याला असतात (host plant). 



  


अतिशय गुणी, देखणी असूनही कोणाला फारशी माहिती नसलेली अशी ही वेल आहे. साधारण एप्रिल - मे मधे वेलीवर कळ्यांची झुंबरं लटकू लागतात आणि पुढे बरेच दिवस ही वेल फुलत राहाते. तजेलदार हिरव्या-पोपटी रंगाची, एकमेकींना जोडलेल्या जाडसर पाच किंवा सहा पाकळ्यांची, अगदी एखादा सेंटीमीटर आकाराची हरणदोडीची फुलं विलक्षण सुंदर दिसतात. जडावाची पाचुफुलं! umbel म्हणजेच छत्रीच्या आकाराच्या गुच्छात ही फुलं येतात. फुलाच्या मध्यभागी पुंकेसर-स्त्रीकेसरांच्या जागी नुसतेच खडे जडवल्यासारखे दिसतात. ही या Asclepiadaceae कुळातल्या फुलांमधली एक अनोखी रचना असते. ती म्हणजे, या फुलांच्या पुंकेसरांत सुट्या परागकणांऐवजी एकमेकींना बारीक धाग्याने जोडलेल्या दोन परागपिशव्या असतात. परागीभवन करणारा कीटक फुलावर बसतो, त्यावेळी पिशव्यांना जोडणारा धागा कीटकाच्या पायात अडकतो आणि त्याच्याबरोबर दोन्ही परागपिशव्या आतले परागकण वाया न जाता निगुतीने दुसऱ्या फुलाकडे पोचत्या होतात (कशी गुणाची बाय ती हरणदोडी!) स्त्रीकेसरात दोन बीजांडकोश असल्याने फळेही एका देठावर जोडीने येतात. फळांवर, पानांवर छान मऊ लव असते. फळे उकलतात त्यावेळी आतल्या चंदेरी केसांच्या म्हाताऱ्या वाऱ्यावर तरंगत दूरदूर जातात. 

 
 
निलिमा जोरवरांच्या रानभाज्यांच्या पुस्तकात या फुलांच्या भाजीची कृती दिलेली आहे. त्यांनी तर ही फुलं सलाडसारखी वापरतात असंही दिलं आहे. दक्षिणेकडे हिच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. बंगालात हिला ’जुकती फूल’ म्हणतात आणि ही फुलं तिथे बाजारात विकायलाही येतात!. या जुकतीच्या फुलांचा उपयोग तिकडे भाज्यांच्या स्ट्यु्ला किंचित कडवट चव येण्यासाठी करतात
 (https://www.euphorhea.com/2018/03/sukto-with-jukti-phool.html ). 
फुलांची भाजी आणि फुलं घालून केलेला स्ट्यु हे दोन्हीही माझ्या ’एकदा करून बघायचं आहे' च्या यादीत आहेत.  हरणदोडीची संस्कृत नावं तर कमालच - हेमजीवन्ती, हेमक्षीरी, हेमलता, हेमपुष्पी, हेमवल्ली, हिमवती, जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती, क्षुपडोडमुष्टि, मधुरसा, मधुस्रव, शाकश्रेष्ठ, शार्ङ्गेष्टा, सुमङ्गला, स्वर्णजीवा, स्वर्णलता.....आणखी कितीतरी. यातले हेम, स्वर्ण या शब्दांचा संबंध हिच्या पाना-खोडातल्या पीतवर्णी चिकाशी आहे. हिला शाकश्रेष्ठाही म्हणलंय. पोषणमूल्य भरपूर असणारी ही भाजी आहे. हिचं आणखी एक मजेशीर नाव म्हणजे नाकशिंकणी- sneez wort! हरणदोडीच्या मुळ्यांचा रस नाकात गेला तर शिंका येतात (म्हणे) म्हणुन ही नावं. हरणदोडी या नावामागचं काय कारण असावं ते मात्र कळत नाही. महाजन सरांच्या पुस्तकात दिलंय की हिची जोडीने येणारी फळं हरणाच्या शिंगांसारखी दिसतात, म्हणून हरणजोडी वरून हिचं नाव हरणदोडी पडलं असावं. ...हिरवागार हरणटोळ साप आणि ही हिरव्यागार फुलांची हरणदोडी यांच्या नावातल्या ’हरणाचा’ हिरव्या रंगाशी संबंध असावा का? 






मुळ्या, पानं, फुलं सगळ्याचे खाद्य आणि औषधी उपयोग असणारी; मुंग्या, फुलपाखरं, पक्षी - सगळ्यांचा गोतावळा सांभाळून असणारी; शिवाय स्वतःचा संसारही टुकीनं, नीटनेटका करणारी ही हरणीबाई सध्या तिचा जडावाच्या पाचूफुलांचा हिरवा साज ल्याली आहे. आधाराच्या वृक्षांवरही तिने मखमली पानांची पाखर घातली आहे. हरणवेलीचं हे प्रसन्न रूप आणि परिसंस्थेतलं तिचं महत्वपूर्ण स्थान अनुभवलं की जीवदात्री, सुमंगला, सुजीवंती अशी तिची नावं किती अर्थवाही आहेत हे जाणवतं; आणि हे परिसरवैभव टिकवून ठेवणं किती आवश्यक आहे, हे ही.

-अश्विनी केळकर
--------------------------------
हरणदोडी/ हरणवेल
Botanical name: Dregea volubilis (Drege हा जर्मन वनस्पतीतज्ञ होता, तर volubilis म्हणजे twining/ आधाराभोवती गुंडाळत वर चढणारी)
Family: Asclepiadaceae (Milkweed family)
-------------------------------
#tekdi






Saturday, 12 June 2021

रानभूल..


 निसर्गाची स्वतःची एक समाजव्यवस्था आहे. आमची टेकडी ही व्यवस्था डोळसपणे उलगडून दाखवत असते. लहान मोठी झुडुप, बलाढ्य वेली, वृक्ष, एकमेकांवर अवलंबून असणारे असंख्य जीव यांनी मिळून ही व्यवस्था तयार झाली आहे. 

इथे मोठ्या वृक्षासोबतच वाळलेलं पान, ओबडधोबड वाटणारा दगड, आणि जमीन पोखरून माती खाली वर करणारी मुंगी हे क्षुल्लक वाटणारे घटक तितकेच या व्यवस्थेत महत्वाचे ठरतात. वाळलेला पाचोळा, लहान मोठ्या बारीक सारिक फांद्या, वाळलेलं गवत (biomass) यांचा जमिनीवर तयार झालेला थर नवीन येणाऱ्या रोपांना पोषक ठरतो. टेकडीवर दाट झाडीत पाय टाकल्यावर हा थर पायांना किंचित स्पंज सारखा जाणवतो. पावसाचा जरासा शिपका टाकळा, अनेक प्रकारची गवत, शतावरी, ब्राह्मी यांना हिरवं करून जातो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला दगडांच्या खोबणीत अनेक वर्ष सुरक्षित राहिलेल्या करांदे (Dioscorea bulbifera), करटुले(Momordica dioica) यांचे कंद जोमाने वाढू लागतात.  मोर, टिटव्या, टकाचोर पावलागणिक आवाज देत असतात. काही वेली सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे झाडाच्या खोडात पाय रोवून वर, वर, अजून वर करत चारोळी, मोह, पळसासारख्या मोठ्या वृक्षांच्या माथ्यावर जाऊन बसल्या आहेत.


कुठली वेल हे बघायला आम्ही त्या वृक्षांच्या खाली उभ्या राहतो. माना वर ताणून वेलीची पानं, फुलं शोधू लागतो. त्या वृक्षाच्या खोडावर वाढलेली बुरशी आणि बुडाशी आलेले जंगली सुरणाचे मुकुट निरखतो, मध्येच धामणाची(Grewia tilifollia) ,शिंदीची(Phoenix sylvestris) एक दोन फळं तोंडात टाकतो, रानातील हा बदल निरखण्यात आम्ही भुलतो, आणि काळ वेळाच माप विसरून हा बदल साठवत  चालू लागतो. 


हिला जरा मोकळं हवं असतं, म्हणजे झाडा झुडपांची फारशी गर्दी नकोय, जमिनीला किंचित उतार आणि अधेमधे दगड, बाजूला असलेल्या खैराच्या अंगावर चढण्याचा तिचा विचार असावा. शोधाशोध केल्यावर तीचं नाव या भुलनवेल असल्याचं लक्षात आलं.  


पाने चमकदार, आधी पानेच दिसली, अंडाकृती, मोठी, जाड, जणू काही जमिनीवर समांतर अशी मांडली आहेत की काय. स्पर्श केला तर मेणचट थर असल्यासारखं जाणवलं, पानांची मांडणी सुबक, देठ अगदी छोटासा, कोवळ्या फांदीला दोन्ही बाजूला समोरासमोर रचलेली. कोवळ्या फांदीला, पानांच्या कडेला पांढरी लव. शेंडयावरील कोवळी पाने जरा उभी राहिलेली, जणू किंचित उभं राहून उत्सुकतेने बघत होती.

तिची नाजुक गुलबट जांभळसर फुलं पानाच्या बेचक्यातून वर डोकावत होती, फुलं अतिशय लहान, अगदी नखभरही नसावीत. फुलांचे गुच्छ आणि दांडे छत्रीच्या घेराची आठवण करून देतात. फुलांच्या आजूबाजूला कीटक, छोट्या माशा दिसून आल्या. वेलीची मुळं मुख्य खोडा पासून फुटून आडवी, तिला पसरायला आधार देताना दिसली. 




गेल्या वर्षीही याच जून च्या पहिल्या आठवड्यात तिची विशेष उपस्थिती जाणवली होती. पण पावसाळ्या नंतर शोधाशोध करून नेमकी कुठे होती ते सापडेना, त्यामुळे फळं/ किंवा बिया मिळाले नाहीत. या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तिची उपस्थिती दोन ते तीन ठिकाणी जाणवली.




मिलिंद गिरधारी यांनी घेतलेले भुलनवेलीच्या फळाचे छायाचित्र 

भुलवून टाकणं हे तर तिचं वैशिष्टय वाटत होतंच, पण भुल देणारी भुलनवेल, ‘ज्यानं ती ओलांडली त्याला रानभुल होते, तो रानात एकसारखा भटकत राहतो, त्याचं दिशेच ज्ञान काही काळ नाहीसं होतं, त्याच्या सोबत असणाऱ्यानाही रानभूल होते, रानभूल का होत असावी? या वेलीत शुद्ध हरपणारा किंवा गुंगी आणणारा गुण असावा, त्याचा प्रभाव उतरेपर्यंत तो एकसारखा रानात भटकत असतो.’ असा उल्लेख प्रसाद हिरूरकर आपल्या ‘भुलनवेल’ या पुस्तकात करतात.

अधिक माहिती घेतल्यावर ही वेल आयुर्वेदात औषधी मानली गेली आहे.. दमा, संधिवात, सोरायसिस सारख्या त्वचा विकारांवर गुणकारी असल्याचं वाचनात आलं. या वनस्पतीची औषधांसाठी मुद्दामहून लागवड केल्याचही वाचनात आलं.

भुलनवेलीचं शास्त्रीय नाव Vincentoxicum rotundifolia, Tylophora rotundifolia,

Vinco-toxicum मुळ लॅटिन भाषेत, to overcome or subdue with poison,

Tylophora हा शब्द मुळ ग्रीक भाषेतून आला आहे.  Tylo म्हणजे गाठ, आणि phora म्हणजे आधार देणारं, वजन धरून ठेवू शकणारं.

Rotundifolia म्हणजे गोलाकार पानांचं. Knot किंवा गाठ याचा संदर्भ अजून तरी मिळाला नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

रूपाली भोळे, proopalee@gmail.com 


 

 

Saturday, 5 June 2021

निळावंती

कालच  चैत्राली चांदोरकर यांनी पर्यावरण दिनानिमित्ताने लिहिलेल्या पोस्टमधे महाजन सरांची मुलाखत वाचली. त्यात त्यांनी महावेलींबद्दल सांगितलं आहे. "शहरातील उद्यानांमध्ये तसेच टेकड्या व रहिवासी क्षेत्रातील वृक्षारोपण होताना, महावेल दिसेनासे झाले आहेत. टेकड्यांवरही वेलांचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्यक्षात जंगलात वृक्षांएवढेच महावेलांना महत्व आहे. महावेल ही एक परिसंस्था आहे. वेलींशिवाय उद्यान परिपूर्ण होऊ शकत नाही. महावेल जंगलाला एकसंघ ठेवण्याचे महत्वाचे काम करतात. कीटक, मुंग्या, पक्षी, भुंगे वेलांवर अवलंबून असतात...." 

हे वाचल्यावर टेकडीवरच्या निळावंतीला -एका महावेलीला- भेटल्यावाचून राहावेना. 

गेल्यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास टेकडीच्या DRDO च्या बाजूच्या दाट झाडीत आडवंतिडवं घुसून, मोरांची चाहूल घेत हिंडताना एक अनोळखी वेल भेटली. एक मोठ्या २५-३० मीटरच्या घेऱ्यातल्या सगळ्या झाडांना तिने हिरवं आच्छादन घातलं होतं. एका झाडावर ती इतकी दाट होती, की त्या आधारावर एक घरटंही वसलं होतं. ही एक महावेल (Liana) होती. ठळक शिरा असणारी, लांबट, त्रिदली पाने, त्यातलं मधलं पान सममित आकारात तर कडेची दोन असममित. जराशी पळसाच्या पानांची आठवण करून देणारी. रूपालीला पळसवेलीचं भारी प्रेम. तिला टेकडीवर पळसवेल सापडली म्हणून आनंद झाला. मी मात्र संभ्रमावस्थेत. नंतर बरेच दिवस तिकडे फिरकलो नाही. तिचा माग ठेवायचं राहून गेलं.

मार्च महिन्यात जरा हिरवाई कमी झालेली असताना आम्ही त्या भागात पुन्हा एकदा गेलो. त्या भागात दोन पाण्याच्या वाटा आहेत. आता पाणी वहात नव्हतं, पण तरी मातीचा ओलावा जाणवत होता. आजुबाजूच्या बदलांच्या नोंदी घेत आम्ही  त्या सुकलेल्या ओहोळाच्या कडेकडेने उतरत होतो. वावळ आणि पिळुकवेलीवर फुलोरा दिसत होता, फेट्र्यावर कळ्या आलेल्या दिसल्या, वसंताची चाहूल जाणवू लागली होती. ग्लिरीसीडियाही फुलला होता. ग्लिरीसीडिया च्या जांभळ्या-गुलाबी तु-यांच्या गर्दीत जरा वेगळ्या आकाराच्या, नाजूक कळ्यांच्या निळ्या तुऱ्यांकडे लक्ष गेलं. पानगळ सुरू झालेल्या साताठ झाडांवर तेच तुरे. सगळे उंचीवर. एकही जवळून पाहाता येईना. झाडाच्या तळाशी निळ्या फुलांचा खच पडलेला. ही डिसेंबरात पाहिलेल्या त्याच महावेलीची फुलं, हे कळलं, पण तिची त्रिदली पानं मात्र सगळी गळून गेलेली होती. फॅबेसी म्हणजे घेवडा, वाटाण्याच्या कुळातली ही फुलं होती. किंचित जांभळ्या छटेच्या निदलपुंजातून (Sepal) डोकावणारा निळसर जांभळा बावटा (Banner/Standard), तिच्या तळाशी दोन निळ्याशार छोट्या पाकळ्या (keels) आणि keels च्या दोन्ही बाजूंना दोन पंखांसारख्या निळ्या-जांभळ्या पाकळ्या (wings). लांबचलांब तु-यांवर वरच्या बाजूला छोट्याछोट्या होत गेलेल्या नाजुक नाजुक कळ्यांमुळे तर ही निळावंती आणखीनच खुलून दिसत होती. निळ्या रंगाची भूल काही वेगळीच असते.

 



























थावकाश या निळ्या रानभुलीची नावं कळली -Pueraria tuberosa असं बोटॅनिकल नाव असणारी ही वेल Indian Kudzu, घोडवेल, भुईकोहळा, बेंद्री वेल, भूकुष्मांड, दारी, विदारीकंद अशा अनेक नावांनी ओळखली जाते. याचे कंद कोहळ्यासारखे गोल म्हणून भुईकोहळा किंवा भूकुष्मांड. याचे गोडसर चवीचे कंद घोड्यांना खाऊ घालतात म्हणून ही घोडवेल किंवा गजवाजीप्रिया (इथे गजही आहे, म्हणजे हत्तींनाही खायला घालत असावेत का?). 

p.c.. Milind Giridhari

p.c. Vasant Kale

याबद्दल माहिती मिळवत गेलो तर खजिनाच सापडत गेला. याच्या मुळांचा रस अथवा सुकवलेली मुळे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी वापरतात!! याच्याच एका जपानी भाऊबंदाच्या -  Pueraria montana च्या मुळांपासून काढलेला स्टार्च जपानी आणि चिनी खाद्यप्रकारात पूर्वापार वापरतात. अमेरिकेत ही वेल १९३० च्या सुमारास जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पशूखाद्य म्हणुन लावली गेली आणि हिने तिथे धुमाकूळ घातला. तिथे ही वेल भसाभस वाढते आणि झाडांना व्यापून संपवून टाकते. तिथे ही invader ठरली आहे. त्याबद्दल वाचताना एका ठिकाणी एक मजेशीर नोंद आढळली: "Stems, leaves, flowers and starch from the root can all be used in cooking. In Asia the flowers and roots are used medicinally. The flowers are quite exquisite, but don’t let its beauty fool you; it’s “the vine that ate the South America” so eat it before it eats your landscape." :)

तर महाजन सरांची मुलाखत वाचून आज सकाळीच या निळावंतीला भेटायला गेलो. 

हिच्या फुलांचा बहर केव्हाच संपला आहे, शेंगा येऊन गळून गेल्या आहेत आणि हिने पुन्हा तिथल्या सगळ्या झाडांना हिरव्या पांघरुणात लपेटून घेतलं आहे. नवे फुटवे जमिनीवरून धावत आजूबाजूच्या नव्यानव्या झाडांना कवेत घ्यायला धावू लागले आहेत. नवी रोपेही तयार होत आहेत. इथे या निळावंतीबरोबर एक मधुवंतीही गळ्यात गळे घालून आहे - द्राक्षवेल (Ampelocissus latifolia) किंवा रानद्राक्षाची वेल हिच्याबरोबरच आडवीतिडवी पसरली आहे. मधुर वासाच्या, चुटुक लाल रंगाच्या रानद्राक्षाच्या फुलांचे घोस निळावंतीच्या अंगाखांद्यावर झुलत आहेत. (ही सुद्धा महावेल (Liana) आहे.) या हिरव्या मंडपाखाली एक गूढरम्य वातावरण आहे. भिजलेल्या पाचोळ्याचा ओला वास, झाडांची दाटी, झाडांभोवती वेटोळे घेत वर गेलेल्या वेली, त्यांची एकमेकांभोवती सर्पिलाकार गुंडाळालेली जाडसर खोडं, जमिनीवरून धावणारे कोवळे फुटवे, असंख्य पक्ष्यांच्या अपरिचित बोली...शिवाय जवळच कुठेतरी मोराची चाहूल! इथे जवळच कुठेतरी मोराची रातथाऱ्याची जागा असावी. 

रानद्राक्ष

रानद्राक्ष


जमिनीवरून धावणारे घोडवेलीचे फुटवे


टेकडीवरच्या रानात या घोडवेल, द्राक्षवेलीबरोबरच गूळवेल (Tinospora cordifolia), पालकंड वेल (Cissus repens), मालकांगुणी (Celastrus paniculatus), कावळी (Cryptolepis buchanani), महाळुंगी (Argyreia cuneta), गुंज (Abrus preercatorius) अशा बहुवर्षायु आणि कितीतरी वर्षायु वेली नांदत आहेत. टेकडीचं वैभव असणा-या या वेली-महावेली आणि त्यांच्या परिसंस्था टिकून राहोत आणि बहरोत ही आजच्यापर्यावरणदिनाच्या निमित्ताने प्रार्थना!

- - अश्विनी केळकर

(घोडवेलीच्या कंदांची प्रकाशचित्रे श्री वसंत काळे आणि श्री मिलिंद गिरिधारी यांच्याकडून साभार)