Saturday, 31 October 2020

दिवे लागले रे दिवे लागले - तमाच्या तळाशी दिवे लागले

लॉकडाऊनच्या काळात आपल्या जगातले सगळे व्यवहार थंडावले होते, निराशेचं मळभ दाटलं होतं. पुन्हा सगळं पाहिल्यासारखं कधी होणार ते कळत नव्हतं. टेकडीवरचं जीवनचक्र मात्र त्याच्या स्वतःच्याच गतीनं अव्याहत चालू होतं. फुलं फुलत होती, मिटत होती, बीज जमिनीत मिसळत होतं, नवी हिरवाई जन्म घेत होती आणि तिच्या बरोबरीने पक्षी, फुलपाखरं, किडे, जीव-जिवाणूही. त्या काळात टेकडी फिरून आलं की दिल कसं गार्डन गार्डन होऊन जात असे! ते दिवस मागे पडले, पावसाळाही संपला. पावसाळा सरून थंडी सुरु होताना घरी आलेल्या कोरोनामुळे पुन्हा पंधरावीस दिवस घरात बंदिवान व्हावं लागलं. ते नकोनकोसे दिवस संपल्यावर एका भल्या पहाटे शुक्राची चांदणी बघत बघत टेकडी गाठली. 

आssहा!! वीस दिवसात टेकडी किती बदलली होती!. माळावरच्या गवताचा रंग बदलला होता, कमरेइतकता वाढलेल्या गवतातून चालताना दहिवरामुळे कपडे ओलेचिप्प होत होते. प्रत्येक पावलाबरोबर खंडोबाचे घोडे, टाचण्या, नाकतोडे, फुलपाखरं टणाटणा उड्या मारत होते. पाऊस थांबून आठवडा उलटला, तरी अजून कुठेकुठे पाणथळ जागा शिल्लक होत्या, ओहोळ वाहात होते. आम्ही त्यादिवशी एका ओहोळाच्या कडेकडेने झाडीत खोलवर घुसलो. ओळखीच्या आणि अनोळखी झाडावेलींबरोबर ओहोळाच्या पाण्याचा नाजूक खळखळाट, पाखरांची किलबिल आणि झाडीतला गारवा अनुभवणं हे इतकं सुखद होतं की डोळ्यात पाणीच येऊ लागलं. तरवड पिवळेधमक फुलले होते, पंधरवड्यापूर्वी पाहिलेलया जांभळ्या कोरांटीला बी धरलं होतं, बीजाच्या पिवळ्या फुलांची जागा गोल चपट्या बियांनी घेतली होती, कहांडळाची जुनी साल निघून आतलं तजेलदार हिरव्या रंगाचं खोड दिसू लागलं होतं. वारसावर नवी पालवी दिसू लागली होती. बराच वेळ तिथे उगीचच रेंगाळून झाडीतून बाहेर पडलो.

तरवड
 
कहांडळ


बीजाची गोल चपटी फळे








परतीच्या वाटेवर एका भागात खूपसा राडारोडा टाकलेला आहे. बहुदा तो एखाद्या रस्त्याचं काम करताना निघालेला आहे. त्या बाजूला तारेचं कुंपण असल्याने आम्ही तिकडे कधी गेलो नव्हतो. आणि तिकडे कधी लक्षही गेलं नव्हतं . रुपालीला त्या बाजूला काहीतरी खास दिसलं होतं. तिने त्या राड्यारोड्यात फुललेल्या केशरी फुलांच्या असंख्य दीपमाळांकडे लक्ष वेधलं. दगडधोंडे आणि तारेचं कुंपण ओलांडत आम्ही तिथे पोचलो. तेवढ्याच थोड्याशा भागात या दीपमाळा Leonotis nepetifolia फुललेल्या आहेत. ळाकडच्या बाजूस हिरव्यागार, त्रिकोणाकृती आणि दंतूर कडांचा पर्णसंभार, त्यातून सात आठ फूट उंच वाढलेलं चौकोनी खोड आणि त्यावर थोड्या थोड्या अंतरावर खोडाला वेढून असणारी, समईच्या केशरी ज्योतींची आठवण करून देणारी कळ्या-फुलांची मंडलं! किती देखणं रूप! Leonotis nepetifolia: Leon-otis म्हणजे सिंहाच्या कानासारखी (फुलं येणारं ) आणि nepetifolia म्हणजे Nepeta या युरोपात आढळणाऱ्या वनस्पतीसारखी पानं (foliage) असणारं. कळ्यांच्या काटेरी मंडलांमधून तेजस्वी केशरी रंगाची, मऊ लव असणारी नलिकाकार फुलं डोकावतात. ही फुलं सिंहाच्या कानासारखी दिसतात, म्हणून हे Leonotis. पुदिना/ तुळशीच्या Lamiaceae कुळातली ही वर्षायु वनस्पती मूळची आफ्रिकेतून आलेली असली तरी आता ती जगभर पोचलेली आहे. टेकडीवर इतर भागात आम्हाला ती अजूनतरी कुठे दिसलेली नाही. मग या राडारोड्यातून हिचं बी आलं असेल का? पुढच्या वर्षी या दीपमाळा सगळी टेकडी व्यापतील का? माहिती नाही.



त्यादिवशी बराच उशीर झालेला होता म्हणून तिथे फार वेळ थांबलो नाही.

दुसरे दिवशी टेकडीवरच्या गवताच्या प्रकारांची ओळख करून घ्यावी म्हणून झाडीत न जाता माळावरच गवतातून हिंडत होतो. लांबून परत दीपमाळा दिसल्या आणि राहवलं नाही. ओलं गवत तुडवत पुन्हा तिथे गेले. चार पिटकुले पक्षी दीपमाळेवरून भुर्र्कन उडून गेले. मी बहुदा त्यांच्या मधुरसपानात व्यत्यय आणला होता. मी एका दगडावर शांत बसून राहिले. मग तिथल्या छोट्या छोट्या हालचाली जाणवू लागल्या. बारीकसे आवाजही लक्षात येऊ लागले. समोर पुरुषभर वाढलेल्या गवतावर बी धरलं होतं. हे जसे आपले सुगीचे दिवस, तसेच पाखरांचेही सुगीचेच दिवस की. मुनिया, वटवट्या आणि आणखीही कितीतरी अनोळखी चिन्न्याभिन्न्या पाखरांची हालचाल गवतात जाणवू लागली. झुलणाऱ्या गवतावर बसून त्यांचं माना वेळावत, एकेक दाणा टिपणं चालू होतं. दाणे टिपणं आणि कुलकुलत बोलणं यातुन अगदी उसंत मिळत नव्हती त्यांना. दीपमाळेच्या काटेरी मंडलांमध्ये मधमाशांची ये जा चालू होती. निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या केशरी ज्योतींवरून नजर हटत नव्हती. मधेच एखादं फुलपाखरु भिरभिरत जात होतं. माझ्या जवळच एक मोराचं पीस पडलेलं दिसलं. पण ते घेऊन पिशवीत टाकावंसं वाटेना. ते तिथून हलवायला नको. या चित्रातलं काहीच हलवायला नको. इथलं इतक्या सगळ्या प्रकारचं गवत, झाडं झुडुपं, वेली, ओहोळ, त्यावर अवलंबून असणारे सगळे जीव - या साखळीतला प्रत्येक दुवा महत्वचा आहे. त्या प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. त्या साखळीतला कोणताही दुवा कधीही निखळता कामा नये. सकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हात न्हालेल्या त्या चैतन्यमय परिसराचा मी ही एक भाग होऊन गेले. दीपमाळेच्या केशरी ज्योतीतुन एक रसरशीत, जिवंत, प्रवाही, चैतन्यमय अशी काहीतरी जाणीव जणू आत आत पाझरत होती. आतला अंधार उजळून टाकत होती. नवल वर्तले गे माये। उजळला प्रकाशु। मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु॥




मागे वळून पाहिलं, तर रुपालीही एका दगळावर अशीच पुतळा होऊन बसलेली दिसली. म्हणाली, इथून जावंसंच वाटत नाहीये. पुन्हा वेळ काढून येऊ असं म्हणत ती चैतन्यमय रानभूल आत साठवत आम्ही हलकेच परत फिरलो.  

- अश्विनी केळकर 



Sunday, 25 October 2020

काटंकिंजाळ केकताड

 

"काटंकिंजाळ केकताडाचा ह्यो पांढराफेक वाख कसा हुतो गं आये ?"

"बाळा, पाण्याच्या पोटात केकताडाची आग थंड हुती नि त्येचाच रेसमागत मऊलूस वाख हुतो." काट्यावरची पोटं' या उत्तम बंडू तुपे यांच्या आत्मचरित्रात त्यांची आई त्यांना काटेरी केकताडाच्या पोटातल्या रेशमी मायेबद्दल सांगते. केकताड, म्हणजेच घायपातापासून वाख बनण्याचा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय. या वाखापासून दोरखंड बनवला जाई. घायपाताची पानं डोहाच्या पाण्यात दहा-बारा दिवस भिजत ठेवायची, त्यापासून वाख काढायचा आणि त्याचा दोरखंड वळायचा. घायपातापासून दोरखंड करण्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत घायपात मुद्दाम लावला जात असे. दोरखंडाला बरेच पर्याय उपलब्ध झाल्यानेही असेल बहुदा, पण हल्ली मात्र याची मुद्दाम लागवड केली जात नाही. पण शेताच्या बांधांवरून हा बरेच ठिकाणी वाढलेला दिसतो.


टेकडीवरही तुरळक काही ठिकाणी घायपात आहेत. बांधांवरून आहेत, मुद्दाम लावलेले असावेत.

घायपात! नावातच घातपाताचा संशय, शिवाय एकंदरीत नूरही नामांकितच. थेट जमिनीतून वर येऊन झुपक्यात वाढलेली, एक दीड मीटर लांब, रुक्ष हिरव्या रंगाची  मांसल पाने. त्यांच्या दोन्ही कडांवर आणि टोकाला बारीक, अणकुचीदार, पिवळसर काट्यांचा कडक पहारा. पुन्हा, एक रोप लावलं की यांच्या मुळांपासून निघणारे फुटवे एकाशेजारी एक वाढत, आपल्या काटेरी तलवारी परजत उभ्या असणाऱ्या सैन्याची पलटणच तयार करणार. काय बिशाद की कोणी याच्या वाटेस जाईल!

टेकडीच्या एका भागात ग्लिरिसिडियाचं एकसुरी जंगल आहे. तिथे फक्त ग्लिरिसिडियाच आहे. अगदीच कुठेतरी दोनपाच इतर झाडे आहेत. तिथे गेलं की ग्लिरिसिडियाचा उग्र गंध सतत जाणवत राहातो. पावसाळी दिवसात तो गंध, तिथली अंधारी सावली आणि थंड हवा हे सगळे मिळून एक विचित्र, गूढ वातावरण तयार होतं. या जंगलात इतर झाडं नसली, तरी इथे एक लांबचलांब घायपाताचा पट्टा मात्र पसरलेला आहे. घायपाताच्या काटेरी तलवारींचं सैन्य मुळांचे फुटवे फुटत फुटत आडवंतिडवं पसरलेलं आहे.

तसा हा घायपात मूळचा मेक्सिकोमधला. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी त्याला इथे आणला. तिकडे यांच्या ब्लु अगेव या प्रजातीपासून अगेव सिरप तयार करतात. तो गोड रस मधाला पर्याय म्हणून वापरला जातो. आपल्याकडे जरी घायपाताचा असा काही उपयोग करीत असल्याचे ऐकिवात नसले, तरी यांच्या उग्र, रुक्ष बाह्यरूपाच्या आत मधाचा गोडवा असणार नक्कीच. आयुष्यभर असा सर्वांशी फटकून राहाणारा घायपात आयुष्याच्या अखेरीच्या दिवसात जरासा मवाळतो. म्हणजे पानांचा काटेरी आवेश तोच असतो, पण आतली कधी दिसलेली कोवळीक जागी होते. त्याच्या पानांच्या वर्तुळामधून फुलोऱ्याचा दांडा वर येऊ लागतो आणि उंचच उंच वाढू लागतो. दांड्यांच्या वरच्या टोकाकडच्या बाजूला आडवे फांदोरे फुटून त्यावर आभाळाकडे तोंड केलेल्या हिरव्या कळ्यांचे घोस दिसू लागतात आणि तो असा एकदम मायाळू, कुटुंबवत्सलच बनून जातो. गेले सात आठ महिने आम्ही टेकडीवरच्या दोन घायपातांवर असे फुलोऱ्याचे पंधरा-वीस फूट उंच दांडे पाहात आहोत. साधारण जुलै महिन्यात त्यातून पिवळ्या रंगाची फुलं डोकावू लागली आणि त्यावर बुलबुल, सनबर्डस आणि किडे-मधमाशांची झुंबड उडू लागली. यथावकाश ही फुलंही गळाली. मध्ये काही काळ टेकडीवर जाणं झालं नाही. जेव्हा गेलो, तेव्हा त्या फुलांच्या जागी घायपाताच्या  कटिखांद्यावर छोटीछोटी बाळं जन्मलेली!!


घायपाताच्या बिया झाडावरच रुजतात आणि वाढतात. ही बाळं पुरेशी मोठी झाली की तहानलाडू भूकलाडूची शिदोरी बांधून देऊन घायपात त्यांचं बोट सोडतो आणि ती त्या उंच मनोऱ्याच्या महालातून जमिनीवर येऊन रुजू लागतात. मुख्य घायपाताची भूमिका आता संपलेली असते. फुलोऱ्याचा दांडा वाळून जातो आणि त्याबरोबर घायपातही.

- अश्विनी केळकर

----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.



Friday, 16 October 2020

आम्ही आंदिच्या बायका, तुम्ही कान देऊन आयका..

 

-रूपाली भोळे

मार्च महिन्यात टेकडी सोनेरी दिसायची. टिटव्या, चंडोल, चिमण्या, सुगरणी काळ्याभोर मातीत आणि सोनेरी गवतात सतत सोबत करायच्या. एके ठिकाणी माळरानाचा मोकळा भाग संपून दाट झाडीचा परिसर सुरू होतो. एका वळणावर आलं की वाटायचं की आता वाट संपली. पुढे राडारोडा, टेकाड असं काहीसं दिसायचं. पुढे जावं की नाही या द्विध्येत असतांनाच एकदा एका देखण्या वृक्षानं लक्ष वेधून घेतलं. वेशीवरील त्या निष्पर्ण वृक्षाच्या शेंडयावर कोतवाल शांत होता. जवळ जवळ रोजच कुठला तरी पक्षी नक्की तिथे लांबूनच दिसे. हा वृक्ष आपलं फळाफुलांचा डेरा सावरीत उभा होता. एक म्हणजे एकही पान नाही! फुलं आंब्याच्या मोहरासारखी, फळं घोसानं . . जांभळसर हिरवी . . किंचित चिप्पट, दोन्ही बाजूनी चेपल्यासारखी . . दोन पावलं पुढे आल्यावर परत तेच झाड, तसाच पसारा . . फुलांच्या मंजिऱ्याही तशाच . . पण काही फळं मात्र गोल घुमटाकार. फळं म्हणवीत की नाही? . . तज्ज्ञांना दोन्ही झाडांची फळे दाखवली . . दोन्हीही मोईचीच झाडं . .


आमचे शिलिंब(मावळात)मधील आप्पा या झाडाला मोगर असं म्हणतात.

अश्विनीची सोबत मिळाल्यावर कानाकोपऱ्यात कुठेही शिरण्याचे धाडस होऊ लागलं. पण दरवेळी वाट मोईवरून जाई. मे महिन्यात झाडाला पालवी दिसू लागली. निष्पर्ण फांदीला टोकाला फळांचे घोस आणि मध्यभागी नवीन पानं. हळूहळू फळांची संख्या कमी झाली. पाने तरारून मोठी होऊ लागली. पण ते गोल तपकिरी गोळे मात्र तसेच . .




पावसाळ्यात पर्णसंभार जड झाला . . मोई नटू लागली . . दोन महिन्यांपूर्वी निष्पर्ण असलेला वृक्ष बहरू लागला. पानं मोठी, संयुक्त, पर्णीका विषम संख्येत, पानं टोकदार, पण पानाच्या शिरा मात्र ठसठशीत.

पानांच्या मुख्य शिरेजवळ त्याच पिवळसर तपकिरी गाठी. पानाच्या आरपार असणाऱ्या. म्हणजे ही फळं नाहीत. जसा पावसाळा सुरू झाला या गाठींची संख्या वाढू लागली.


मोईच्या पर्णीकेतील मुख्य शिर आणि उपशिरेजवळ या गाठी दिसून आल्या. काही ठिकाणी पानांना  छोटी भोकंही दिसली. या गाठींना इंग्रजीत gall असं म्हणातात तर मराठीत गुल्म. आपण बऱ्याचदा उंबराच्या पानांवर पाहिलेले असतात अगदी तसेच फोड.

काही विशिष्ठ परजीवी कीटक, बुरशी, कवक, विषाणू ईत्यादींच्या संपर्कामुळे वनस्पतीच्या एखाद्या भागात ही अस्वाभाविक वाढ होते आणि या गाठीची / फुगवट्याची वाढ होते. काही कीटक वनस्पतीच्या पृष्ठभागावर राहतात, भरपूर अन्नरस असलेल्या मुख्य शिरेजवळ भोसकून अंडी घालतात. आणि अशा वनस्पतींवर या परजिवी किटकांचे जिवनचक्र अवलंबून असतं. या किटकांनी स्त्रवलेल्या पदार्थामुळे पानांच्या कोशिकांची वाढ होण्यास चालना मिळते. आणि किटकांच्या वसाहतींना संरक्षण मिळते. वनस्पतीतज्ज्ञ मित्र मंदार दातार यानं या परजिवीसंबंधाची ओळख उलगडून दाखविली. मोईवरील गुल्म म्हणजेच Odinadiplosis odinae (Diptera) नावाचा किटक.

काही दिवसातच मोईची पानं गुंडाळल्यासारखी दिसली. हळूहळू जाळं-जळमट चढून पानांचा गुंता दिसू लागला. मोई आक्रसलेली, आजारी वाटू लागली. एकदा एक गुंता उलगडण्याचा प्रयत्न केला तर लालसर तपकिरी अळी भस्सकन बाहेर आली. 


मोई खूप अनुभवी, विचारी, स्थिर, झुकलेली दिसत होती. जणू आपल्या कवेत खूप इतिहास तिनं साठवून ठेवलाय असं वाटे.

मोईला इंग्रजीत Indian Ash Tree असं म्हणतात. हा वृक्ष मुळ युरोपीय पर्वतराजींमधला. आपल्याकडे मुख्यत्वेकरून हिमालयाच्या परिसरात आढळतो. पण भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ दिसून येतो. ह्या वृक्षाशी संबंधीत अनेक परिकथा, दंतकथा सागण्यात येतात. एका ग्रीक पुराणकथेनुसार युरेनस हे स्वर्गाचं व्यक्तिरूप आहे. तो पृथ्वीशी संग करतो. याचा तिच्या आणि त्त्याच्या सगळ्यात धाकट्या मुलाला राग येऊन त्यानं हातातल्या विळ्यानं युरेनसचं वृषण छाटून समुद्रात फेकून दिलं, त्याचं रक्त जमिनीवर जिथं सांडलं तिथून हे वृक्ष उगवले. एका आदिवासी गीतात मोईचे डेरे विळ्यासारखे दिसतात, असा उल्लेख आढळतो. तर नॉर्स (उत्तर युरोप) पुराणात या झाडाला Yggdrasill म्हणतात, म्हणजे त्यांच्या ओडिन नावाच्या देवतेचा घोडा. हा घोडा म्हणे नऊ विश्वांना जोडतो. काही अभ्य़ासकांच्या मते ओडिन आपल्या घोड्याला ह्या झाडाच्या बुंध्याला बांधत असे, म्हणून हे नाव पडलं असावं. मोईच्या पानांवर आढळणाऱ्या किटकांच्या नावातही ओडिन नावाशी साधर्म्य आढळते.



 

मोई असणाऱ्या परिसरात सालई (Bosewellia serrata)चंही झाड असतंच असं म्हणतात. मोई आणि सालईची झाडं पवित्र मानली जातात. मोईची पानं गळण्यापूर्वी पिवळीधमक होतात. शरदाच्या चांदण्यात मोई लांबूनच ओळखायला येते. म्हणून की काय मोवई आणि सालई या बहिणी दिवसा झाडाच्या आणि रात्री स्त्रियांच्या रूपात असतात अशी आख्यायिका आढळते.

‘गोईण’ मध्ये राणी बंग यांनी याबद्दल विस्तृत उल्लेख केला आहे. लक्ष्मणानं सीतेला रामाच्या आज्ञेवरून जंगलात सोडलं तेव्हा जंगलात सीतेचं रक्षण करण्यासाठीच लक्ष्मणाने मोवई-सालईला विनंती केली :

 

सालया मोवया रात्रीच्या बायका,

सीतामाईचा गहिवर आयका |

सालया मोवया आंदिच्या बायका,

सीतामाई गेली वनवासा,

तुम्ही कान देऊन आयका |

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

Scientific Information:

शास्त्रीय नाव: Lannea coromandelica

कुळ: Anacardiaceae (आंब्याच्या कुळातील)

मराठी नावे: मोई, मोवई, मोया, शिंबट, शिमटी, (शिमाग्यात फुलणारे)

पाने/फळे/फुले: उल्लेख वरील लिखणात आला आहे.

खोड: पांढरट मळकट, गुळगुळीत

मोईची साल वेदानाशमक असल्याने अंगदुखी, दाढदुखीच्या औषधानमध्ये वापरतात. मोईची पाने शिजवून खरचटणे, लचकणे सूज, यावर बाहेरून लावतात, शिवाय पाला गुरांसाठी चार म्हणून उपयुक्त आहे. लाकूड टिकाऊ, कोरीव कामांसाठी वापरले जाते.

 

Friday, 9 October 2020

पैचान कौन!

 तसं पाहिलं तर झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत. एखादया झाडाची ओळख पटली नाही की त्याच्या पानाफुलांची, खोडाची, फांद्यांची निरीक्षणं लिहून काढायची, फोटो काढायचे, पुस्तकं आणि वेबसाईटी धुंडाळून त्याची ओळख शोधायची, आणि नाहीच जमलं तर आमच्या वनस्पतीतज्ञ मित्रमैत्रिणींकडे, गुरूंकडे धाव घ्यायची यातून आम्ही टेकडीवरचं वानसवैविध्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. टेकडी वाचणं, समजुन घेणं आणि त्यातून शिकणं हा फार म्हणजे फारच मजेचा आणि आनंदाचा उद्योग आहे. प्रत्येक टेकडीभेट आमच्या ओंजळीत एकतरी साक्षात्काराचा क्षण टाकत असते :)

’झाडं ओळखण्याच्या बाबतीत आम्ही अजून प्राथमिक पायरीवर आहोत’ हा साक्षात्कार आम्हाला घडवला तो टेकडीवर मुबलक आढळणा-या, पण बरेच दिवस ओळखीची एकही खूण न दाखवणा-या एका झाडाने. दरवेळी आम्ही त्याच्यापाशी जायचो, पानाचे फोटो काढायचो, वर्णनं लिहायचो - पाने साधी आहेत, एकांतरीत आहेत, देठापाशी गोलाकार आणि टोकाला रुंद आहेत, पानांच्या खालच्या बाजूस मऊ लव, मध्यशीर फुगीर आणि लालसर, देठही लालसर, खोडाची साल सुटी होऊन खोडावर पांढरट चट्टे दिसत आहेत, खोड पेरूसारखे आहे, पानांना कसलाही वास नाही...अशी सगळ्या प्रकारची वर्णनं लिहून झाली. गूगल लेन्स वापरून शोध घेतला, महाजन सरांच्या पुस्तकात शोधलं. (शेवटी कुकसाहेबांच्या पुस्तकातही शोधायचा प्रयत्न केला - पण त्यात कसं शोधावं तेच कळेना :D ). खोडाची साल निघते आहे, तर सालईचा भाऊबंद असेल का अशा (अडाणी) शंकेने एकदा त्याच्या खोडावर सापडलेला डिंक आणि सालही जाळून पाहिली - नाकपुड्या फुलवत काही सुगंध वगैरे येतोय का ते पाहिलं - पण नुसताच जळका वास.    


ज्ञानेश्वरीत म्हणलं आहे, "तरी जाणिजे झाड फुलें। का मानस जाणिजे बोलें॥" - फुलांवरून झाडाची ओळख होते आणि बोलण्यावरून अंतरंगाची. वनस्पतीशास्त्रातही, वनस्पतीचं कुळ (Family) हे त्याच्या फुलाच्या रचनेवरून ठरतं. (सारख्या रचनेची फुलं येणारे वृक्ष, वेली, झुडुपं एकाच कुळातली असतात.) हे झाड काही अद्याप फुलायला तयार नव्हतं आणि आपली ओळख द्यायला तयार नव्हतं. 

मग सप्टेंबर मध्ये, फुलपाखराचे फोटो काढण्याचे अयशस्वी प्रयत्न चालू असताना, रुपालीने थोड्या अंतरावरचं एक बहरलेलं झाड दाखवलं. कमरेपर्यंत वाढलेलं गवत तुडवत आम्ही झाडाजवळ पोचलो. सोनसळी रंगाच्या बारीक बारीक फुलांचे झुपके प्रत्येक पानाच्या बेचक्यातुन फुलले होते. पाकळ्या नसलेल्या छोट्या फुलांचे आणि कळ्यांचे गेंद, आणि नुकतीच आलेली हिरव्या रंगाची पंखवाली फळं.  ..भराभर फायली ओपन झाल्या..आणि साक्षात्कार झाला - हा तर धावडा!  कॉम्ब्रेटेसी.. अर्जुन-आईनाच्या कुळातलं झाड..पंखवाल्या बिया! मग पानांकडे लक्ष गेलं...तर दुसरा साक्षात्कार झाला - इतके दिवस जे झाड आपल्याला ओळख देण्यासाठी झुलवतंय, ते हेच लालसर देठांच्या पानांचं झाड! ...तरी जाणिजे झाड फुलें!! 

महाजन सरांच्या पुस्तकात तीन प्रकारच्या धावड्यांची माहिती आहे - धावडा (Anogeissus latifolia), महाधावडा (Anogeissus acuminata) आणि रेशम धावडा (Anogeissus sericea). टेकडीवर आढळतो तो Anogeissus latifolia- रुंद पानांचा धावडा! हा पुण्यातल्या सगळ्याच टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात आढळतो. याचा डिंक गमघट्टी किंवा घाटी गम म्हणुन ओळखला जातो. डिंकाचे अनेक उपयोग आहेत - विशेषतः कापड उद्योगात आणि स्फोटकांच्या उद्योगात बाईंडर म्हणून. अनेक पेयांमध्ये हा डिंक emulsifier आणि stabilizer म्हणून वापरला जातो. तसेच पॉलिमर आणि पेट्रोलियअम उद्योगातही. बाभळीच्या डिंकासारखाच हा डिंकही खाद्य पदार्थात वापरला जातो. राणी बंग लिखित ’गोईण’ मधे याच्या सालीचे, डिंकाचे, बुंध्याचे पारंपरिक उपयोग दिलेले आहेत. यातल्याच एका लोकगीतात, लक्ष्मणाने सीतेला वनात सोडल्यावर त्या निबीड वनाचे वर्णन करताना ’येन-धावडे स्वर्गाला जाती - ससे खोडाशी दडती’ अशा ओळी आहेत. त्या लोकगीतातला, स्वर्गाची उंची गाठणारा धावडा काही इथल्या परिसरात अद्याप आढळला नाही. इथली सगळी धावडे मंडळी बेताच्या उंचीची आहेत.     

धावड्याला बंगालात चकवा म्हणतात. आम्हालाही याने ’पैचान कौन’ म्हणत इतके दिवस चांगलंच चकवलं होतं. आम्हाला हसायला आलं ... धावडाही पानापानांत फुललेल्या फुलाफुलातुन हसत उभा होता!  
- अश्विनी केळकर
------------------------------------------
धावडा : Anogeissus latifolia
Family: Combretaceae 
इतर नावे: Button tree, Indian gum tree, धौया, धौरा, इंद्रवृक्ष, धवल, धुरंधर. 
फुलांचे, पानांचे आणि खोडाचे वर्णन वर दिलेले आहेच. 
फळे: पिवळसर तपकिरी, पंखवाली फळे फुलांसारखीच एका झुपक्यात दाटीवाटीने असतात.