Saturday, 12 June 2021

रानभूल..


 निसर्गाची स्वतःची एक समाजव्यवस्था आहे. आमची टेकडी ही व्यवस्था डोळसपणे उलगडून दाखवत असते. लहान मोठी झुडुप, बलाढ्य वेली, वृक्ष, एकमेकांवर अवलंबून असणारे असंख्य जीव यांनी मिळून ही व्यवस्था तयार झाली आहे. 

इथे मोठ्या वृक्षासोबतच वाळलेलं पान, ओबडधोबड वाटणारा दगड, आणि जमीन पोखरून माती खाली वर करणारी मुंगी हे क्षुल्लक वाटणारे घटक तितकेच या व्यवस्थेत महत्वाचे ठरतात. वाळलेला पाचोळा, लहान मोठ्या बारीक सारिक फांद्या, वाळलेलं गवत (biomass) यांचा जमिनीवर तयार झालेला थर नवीन येणाऱ्या रोपांना पोषक ठरतो. टेकडीवर दाट झाडीत पाय टाकल्यावर हा थर पायांना किंचित स्पंज सारखा जाणवतो. पावसाचा जरासा शिपका टाकळा, अनेक प्रकारची गवत, शतावरी, ब्राह्मी यांना हिरवं करून जातो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला दगडांच्या खोबणीत अनेक वर्ष सुरक्षित राहिलेल्या करांदे (Dioscorea bulbifera), करटुले(Momordica dioica) यांचे कंद जोमाने वाढू लागतात.  मोर, टिटव्या, टकाचोर पावलागणिक आवाज देत असतात. काही वेली सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे झाडाच्या खोडात पाय रोवून वर, वर, अजून वर करत चारोळी, मोह, पळसासारख्या मोठ्या वृक्षांच्या माथ्यावर जाऊन बसल्या आहेत.


कुठली वेल हे बघायला आम्ही त्या वृक्षांच्या खाली उभ्या राहतो. माना वर ताणून वेलीची पानं, फुलं शोधू लागतो. त्या वृक्षाच्या खोडावर वाढलेली बुरशी आणि बुडाशी आलेले जंगली सुरणाचे मुकुट निरखतो, मध्येच धामणाची(Grewia tilifollia) ,शिंदीची(Phoenix sylvestris) एक दोन फळं तोंडात टाकतो, रानातील हा बदल निरखण्यात आम्ही भुलतो, आणि काळ वेळाच माप विसरून हा बदल साठवत  चालू लागतो. 


हिला जरा मोकळं हवं असतं, म्हणजे झाडा झुडपांची फारशी गर्दी नकोय, जमिनीला किंचित उतार आणि अधेमधे दगड, बाजूला असलेल्या खैराच्या अंगावर चढण्याचा तिचा विचार असावा. शोधाशोध केल्यावर तीचं नाव या भुलनवेल असल्याचं लक्षात आलं.  


पाने चमकदार, आधी पानेच दिसली, अंडाकृती, मोठी, जाड, जणू काही जमिनीवर समांतर अशी मांडली आहेत की काय. स्पर्श केला तर मेणचट थर असल्यासारखं जाणवलं, पानांची मांडणी सुबक, देठ अगदी छोटासा, कोवळ्या फांदीला दोन्ही बाजूला समोरासमोर रचलेली. कोवळ्या फांदीला, पानांच्या कडेला पांढरी लव. शेंडयावरील कोवळी पाने जरा उभी राहिलेली, जणू किंचित उभं राहून उत्सुकतेने बघत होती.

तिची नाजुक गुलबट जांभळसर फुलं पानाच्या बेचक्यातून वर डोकावत होती, फुलं अतिशय लहान, अगदी नखभरही नसावीत. फुलांचे गुच्छ आणि दांडे छत्रीच्या घेराची आठवण करून देतात. फुलांच्या आजूबाजूला कीटक, छोट्या माशा दिसून आल्या. वेलीची मुळं मुख्य खोडा पासून फुटून आडवी, तिला पसरायला आधार देताना दिसली. 




गेल्या वर्षीही याच जून च्या पहिल्या आठवड्यात तिची विशेष उपस्थिती जाणवली होती. पण पावसाळ्या नंतर शोधाशोध करून नेमकी कुठे होती ते सापडेना, त्यामुळे फळं/ किंवा बिया मिळाले नाहीत. या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तिची उपस्थिती दोन ते तीन ठिकाणी जाणवली.




मिलिंद गिरधारी यांनी घेतलेले भुलनवेलीच्या फळाचे छायाचित्र 

भुलवून टाकणं हे तर तिचं वैशिष्टय वाटत होतंच, पण भुल देणारी भुलनवेल, ‘ज्यानं ती ओलांडली त्याला रानभुल होते, तो रानात एकसारखा भटकत राहतो, त्याचं दिशेच ज्ञान काही काळ नाहीसं होतं, त्याच्या सोबत असणाऱ्यानाही रानभूल होते, रानभूल का होत असावी? या वेलीत शुद्ध हरपणारा किंवा गुंगी आणणारा गुण असावा, त्याचा प्रभाव उतरेपर्यंत तो एकसारखा रानात भटकत असतो.’ असा उल्लेख प्रसाद हिरूरकर आपल्या ‘भुलनवेल’ या पुस्तकात करतात.

अधिक माहिती घेतल्यावर ही वेल आयुर्वेदात औषधी मानली गेली आहे.. दमा, संधिवात, सोरायसिस सारख्या त्वचा विकारांवर गुणकारी असल्याचं वाचनात आलं. या वनस्पतीची औषधांसाठी मुद्दामहून लागवड केल्याचही वाचनात आलं.

भुलनवेलीचं शास्त्रीय नाव Vincentoxicum rotundifolia, Tylophora rotundifolia,

Vinco-toxicum मुळ लॅटिन भाषेत, to overcome or subdue with poison,

Tylophora हा शब्द मुळ ग्रीक भाषेतून आला आहे.  Tylo म्हणजे गाठ, आणि phora म्हणजे आधार देणारं, वजन धरून ठेवू शकणारं.

Rotundifolia म्हणजे गोलाकार पानांचं. Knot किंवा गाठ याचा संदर्भ अजून तरी मिळाला नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

रूपाली भोळे, proopalee@gmail.com 


 

 

Saturday, 5 June 2021

निळावंती

कालच  चैत्राली चांदोरकर यांनी पर्यावरण दिनानिमित्ताने लिहिलेल्या पोस्टमधे महाजन सरांची मुलाखत वाचली. त्यात त्यांनी महावेलींबद्दल सांगितलं आहे. "शहरातील उद्यानांमध्ये तसेच टेकड्या व रहिवासी क्षेत्रातील वृक्षारोपण होताना, महावेल दिसेनासे झाले आहेत. टेकड्यांवरही वेलांचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्यक्षात जंगलात वृक्षांएवढेच महावेलांना महत्व आहे. महावेल ही एक परिसंस्था आहे. वेलींशिवाय उद्यान परिपूर्ण होऊ शकत नाही. महावेल जंगलाला एकसंघ ठेवण्याचे महत्वाचे काम करतात. कीटक, मुंग्या, पक्षी, भुंगे वेलांवर अवलंबून असतात...." 

हे वाचल्यावर टेकडीवरच्या निळावंतीला -एका महावेलीला- भेटल्यावाचून राहावेना. 

गेल्यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास टेकडीच्या DRDO च्या बाजूच्या दाट झाडीत आडवंतिडवं घुसून, मोरांची चाहूल घेत हिंडताना एक अनोळखी वेल भेटली. एक मोठ्या २५-३० मीटरच्या घेऱ्यातल्या सगळ्या झाडांना तिने हिरवं आच्छादन घातलं होतं. एका झाडावर ती इतकी दाट होती, की त्या आधारावर एक घरटंही वसलं होतं. ही एक महावेल (Liana) होती. ठळक शिरा असणारी, लांबट, त्रिदली पाने, त्यातलं मधलं पान सममित आकारात तर कडेची दोन असममित. जराशी पळसाच्या पानांची आठवण करून देणारी. रूपालीला पळसवेलीचं भारी प्रेम. तिला टेकडीवर पळसवेल सापडली म्हणून आनंद झाला. मी मात्र संभ्रमावस्थेत. नंतर बरेच दिवस तिकडे फिरकलो नाही. तिचा माग ठेवायचं राहून गेलं.

मार्च महिन्यात जरा हिरवाई कमी झालेली असताना आम्ही त्या भागात पुन्हा एकदा गेलो. त्या भागात दोन पाण्याच्या वाटा आहेत. आता पाणी वहात नव्हतं, पण तरी मातीचा ओलावा जाणवत होता. आजुबाजूच्या बदलांच्या नोंदी घेत आम्ही  त्या सुकलेल्या ओहोळाच्या कडेकडेने उतरत होतो. वावळ आणि पिळुकवेलीवर फुलोरा दिसत होता, फेट्र्यावर कळ्या आलेल्या दिसल्या, वसंताची चाहूल जाणवू लागली होती. ग्लिरीसीडियाही फुलला होता. ग्लिरीसीडिया च्या जांभळ्या-गुलाबी तु-यांच्या गर्दीत जरा वेगळ्या आकाराच्या, नाजूक कळ्यांच्या निळ्या तुऱ्यांकडे लक्ष गेलं. पानगळ सुरू झालेल्या साताठ झाडांवर तेच तुरे. सगळे उंचीवर. एकही जवळून पाहाता येईना. झाडाच्या तळाशी निळ्या फुलांचा खच पडलेला. ही डिसेंबरात पाहिलेल्या त्याच महावेलीची फुलं, हे कळलं, पण तिची त्रिदली पानं मात्र सगळी गळून गेलेली होती. फॅबेसी म्हणजे घेवडा, वाटाण्याच्या कुळातली ही फुलं होती. किंचित जांभळ्या छटेच्या निदलपुंजातून (Sepal) डोकावणारा निळसर जांभळा बावटा (Banner/Standard), तिच्या तळाशी दोन निळ्याशार छोट्या पाकळ्या (keels) आणि keels च्या दोन्ही बाजूंना दोन पंखांसारख्या निळ्या-जांभळ्या पाकळ्या (wings). लांबचलांब तु-यांवर वरच्या बाजूला छोट्याछोट्या होत गेलेल्या नाजुक नाजुक कळ्यांमुळे तर ही निळावंती आणखीनच खुलून दिसत होती. निळ्या रंगाची भूल काही वेगळीच असते.

 



























थावकाश या निळ्या रानभुलीची नावं कळली -Pueraria tuberosa असं बोटॅनिकल नाव असणारी ही वेल Indian Kudzu, घोडवेल, भुईकोहळा, बेंद्री वेल, भूकुष्मांड, दारी, विदारीकंद अशा अनेक नावांनी ओळखली जाते. याचे कंद कोहळ्यासारखे गोल म्हणून भुईकोहळा किंवा भूकुष्मांड. याचे गोडसर चवीचे कंद घोड्यांना खाऊ घालतात म्हणून ही घोडवेल किंवा गजवाजीप्रिया (इथे गजही आहे, म्हणजे हत्तींनाही खायला घालत असावेत का?). 

p.c.. Milind Giridhari

p.c. Vasant Kale

याबद्दल माहिती मिळवत गेलो तर खजिनाच सापडत गेला. याच्या मुळांचा रस अथवा सुकवलेली मुळे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी वापरतात!! याच्याच एका जपानी भाऊबंदाच्या -  Pueraria montana च्या मुळांपासून काढलेला स्टार्च जपानी आणि चिनी खाद्यप्रकारात पूर्वापार वापरतात. अमेरिकेत ही वेल १९३० च्या सुमारास जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि पशूखाद्य म्हणुन लावली गेली आणि हिने तिथे धुमाकूळ घातला. तिथे ही वेल भसाभस वाढते आणि झाडांना व्यापून संपवून टाकते. तिथे ही invader ठरली आहे. त्याबद्दल वाचताना एका ठिकाणी एक मजेशीर नोंद आढळली: "Stems, leaves, flowers and starch from the root can all be used in cooking. In Asia the flowers and roots are used medicinally. The flowers are quite exquisite, but don’t let its beauty fool you; it’s “the vine that ate the South America” so eat it before it eats your landscape." :)

तर महाजन सरांची मुलाखत वाचून आज सकाळीच या निळावंतीला भेटायला गेलो. 

हिच्या फुलांचा बहर केव्हाच संपला आहे, शेंगा येऊन गळून गेल्या आहेत आणि हिने पुन्हा तिथल्या सगळ्या झाडांना हिरव्या पांघरुणात लपेटून घेतलं आहे. नवे फुटवे जमिनीवरून धावत आजूबाजूच्या नव्यानव्या झाडांना कवेत घ्यायला धावू लागले आहेत. नवी रोपेही तयार होत आहेत. इथे या निळावंतीबरोबर एक मधुवंतीही गळ्यात गळे घालून आहे - द्राक्षवेल (Ampelocissus latifolia) किंवा रानद्राक्षाची वेल हिच्याबरोबरच आडवीतिडवी पसरली आहे. मधुर वासाच्या, चुटुक लाल रंगाच्या रानद्राक्षाच्या फुलांचे घोस निळावंतीच्या अंगाखांद्यावर झुलत आहेत. (ही सुद्धा महावेल (Liana) आहे.) या हिरव्या मंडपाखाली एक गूढरम्य वातावरण आहे. भिजलेल्या पाचोळ्याचा ओला वास, झाडांची दाटी, झाडांभोवती वेटोळे घेत वर गेलेल्या वेली, त्यांची एकमेकांभोवती सर्पिलाकार गुंडाळालेली जाडसर खोडं, जमिनीवरून धावणारे कोवळे फुटवे, असंख्य पक्ष्यांच्या अपरिचित बोली...शिवाय जवळच कुठेतरी मोराची चाहूल! इथे जवळच कुठेतरी मोराची रातथाऱ्याची जागा असावी. 

रानद्राक्ष

रानद्राक्ष


जमिनीवरून धावणारे घोडवेलीचे फुटवे


टेकडीवरच्या रानात या घोडवेल, द्राक्षवेलीबरोबरच गूळवेल (Tinospora cordifolia), पालकंड वेल (Cissus repens), मालकांगुणी (Celastrus paniculatus), कावळी (Cryptolepis buchanani), महाळुंगी (Argyreia cuneta), गुंज (Abrus preercatorius) अशा बहुवर्षायु आणि कितीतरी वर्षायु वेली नांदत आहेत. टेकडीचं वैभव असणा-या या वेली-महावेली आणि त्यांच्या परिसंस्था टिकून राहोत आणि बहरोत ही आजच्यापर्यावरणदिनाच्या निमित्ताने प्रार्थना!

- - अश्विनी केळकर

(घोडवेलीच्या कंदांची प्रकाशचित्रे श्री वसंत काळे आणि श्री मिलिंद गिरिधारी यांच्याकडून साभार)  

  

Friday, 28 May 2021

सोन्याचा काळा कंद

 

टेकडीवर दूरवर एक चारोळीच(Buchanania cochinchinensis) झाड आहे, त्याचं काळं मजबूत खोड पालकंड वेलीने(Cissus repens) वर चढायला वापरलंय. त्याच्या रुंद पांनामुळे आणि रचनेमुळे सावली दाट पडते, उन्हाळ्याच्या शेवटी किंवा मे च्या शेवटी या वेलीला कोवळी रंगीत पाने फुटतात.

पालकंड वेल
 

जमिनीवर अचानक उगून आलेली शेवळं, गोल-अंडाकृती आकाराच्या दगडांच्या खोबणीतील मातीच्या थंडाव्यामुळे उगून आलेले मालकांगुणी सारख्या असंख्य वेलिंचे धुमारे या सावलीत हे अंगण सजवत असतात. या अंगणातील याच दिवसातील पिवळ्या चांदण्याचा सडा पहाटे उमलुन येतो, अगदी जमिनीला टेकलेली, देठ नसलेली, पाच पाकळ्यांची, आकाराने बोरापेक्षाही लहान फुले पाहून आधी खूप आश्चर्य वाटलं. 



काही ठिकाणी पाने नव्हतीच, पण जिथे होती ती खूप लहान अंदाजे वीतभर किंवा बोटभर, लव असणारी दिसली, किंचित मोठ्या पानांना लव नव्हती आणि फुलेही नव्हती. पानं टोकदार, घड्या असलेली, ताठ भाल्यासारखी उभी आणि पानांच्या पायाशी वाहिलेली ही पिवळी धम्म फुलं. संपूर्ण वनस्पतीची रचना अशी वाटत होती की खूप खोलवर भक्कम आधार असावा.


तज्ञांनी ती काळी मुसळी (Curculigo orchoides) असल्याचं सांगितलं, “काळी मुसळी” का म्हणत असावे बरे? ‘हिरवी’ टोकदार रेषांची ताठ पाने, आणि ‘पिवळी’ फुले, मग काळा रंग कुठे असावा? गमक त्याच्या आधारात सापडलं. सोबत खुर्प घेऊन निघालो, एवढी सुंदर फुलं बागेत लावू या, हाही उद्देश होताच, खोदून पहिलं, मातीचा गंध ओलसर वाटू लागला, वीतभर खोदल्यावरही शेवट दिसेना कंदाचा काळा रंग दिसू लागला, मुसळासारखा लांबच लांब जाड, मांसल खोलवर रूतलेला काळं आवरण असलेला कंद.

या कंदाचे अनेक औषधी उपयोग वाचनात आलेत, मुसळीची काळी मुळे शक्तिवर्धक असून वातविकार, पित्तविकार, मधुमेह इत्यादींवर उपयुक्त असतात. अतिसारावर ताकात मूळ उगाळून देतात.

Curculin म्हणजे चवीला गोड असणार आणि पदार्थांची गोडी वाढवणारं (Sweetener). Curculigo ला चीन देशात अनेक वेगवेगळी नावं आहेत. एकल शाकार मूळ (Only thatch root), भू-ताड (ground palm) किंवा ब्राह्मणी जिनसेंग ही नावं त्याच्या दिसण्यावरून, उपयोगांवरून आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या इतिहासावरून पडली असावीत. त्यातला एकल शाकार मूळ हा शब्द या वनस्पतीच्या आकाराचं वर्णन करतो. एकल या शब्दात मूळ एकटंच असतं, त्याला फार फाटे फुटलेले नसतात असा जसा सरळसरळ अर्थ आहे, त्याचप्रमाणे परिणामकारकतेच्या बाबतीत, सेवन करणाऱ्याला शक्ती प्रदान करण्याच्या बाबतीतही ते एकमेव आहे, असा अर्थ निघू शकतो, शिवाय त्याचं पान दिसायला छताच्या शाकारणीच्या गवतासारखं असतं. आणि त्याचं मूळ म्हणजेच कंद हा त्या वनस्पतीतला औषधी भाग आहे, म्हणून एकल शाकार मूळ. जमिनीच्या लगत अगदी जमिनीला चिकटून वाढतं, त्याचं पान ताडासारखं वर आलेलं असतं म्हणून भू-ताड. 

तर ब्राह्मणी जिनसेंग नावाशी एक ऐतेहासिक गोष्ट निगडीत आहे. इसवीसनानंतर आठव्या शतकात टॅंग वंशातला  मद्यपी आणि वासनांध सम्राट शांगझांग आजाराने खूपच अशक्त झाला होता. वेगवेगळे उपचार करूनही गूण येईना, म्हणून अजून कुणाला काही उपचार माहित असल्यास कळवावे, अशी दवंडी पिटण्यात आली. सिल्करूटच्या व्यापार मार्गावरून पश्चिमेकडून म्हणजेच भारतातून काही ब्राह्मण वैद्य तेव्हा तिथे आलेले होते. त्यांनी सम्राटाची अवस्था बघून त्याला काळ्या मूसळीचं चाटण दिलं. शिवाय ते कसं करतात, ते शिकवून नियमित सेवन करायला सांगितलं. काही दिवसांनी सम्राटाची प्रकृती केवळ बरी नाही, तर आधीपेक्षाही ठणठणीत झाली. आपल्या चिरतारूण्याचं रहस्य कुणाला कळू नये, म्हणून सम्राटानं हे औषध करायची कृती गुपीत ठेवली. पण काही वर्षांनंतर झालेल्या हल्ल्यांमध्ये जसा दरबारी खजिना लुटला गेला, तशी अनेक गुपीतंही उघड झाली, आणि या औषधीविषयी जनसामान्यांना कळलं. जिनसेंगच्या अनेक प्रजातींपैकी एक आणि ब्राह्मण वैद्यांनी त्याचा उपयोग कसा करतात ते दाखवलं म्हणून ब्राह्मणी जिनसेंग हे नाव पडलं. या वनस्पतीपासून तयार केलेलं औषध मर्दानगी ताकद वाढवत असल्याचा दावा करत असल्यामुळे ते गुपीत असणं, केवळ काही विशेषतः उच्च वर्गांसाठी राखीव असणं हे संदर्भ आहेत. 

टेकडीवरील निरीक्षणात काळ्या मुसळीला फळे किंवा बिया दिसून आल्या नाहीत. तिची उगवण फक्त सावलीत, तसेच भुसभुशीत जमिनीत झालेली प्रकर्षाने जाणवली. दमट आणि ओलावायुक्त परिसरात तिची वाढ होतं असावी. 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             टेकडीवर रांगेत लावेलेल्या उंदीरमारीच्या (Gliricidea) सावलीतही ती छान पसरली आहे. काळ्या मुसळी चे निरीक्षण करताना या भुसभुशीत परिसरात नानेटा साप, गोम, ई सरपटणारे प्राणी प्रथमच वर्षभरात आढळून आले. 


Wolf spider
जातीच्या कोळयाची मादी आपली अंड्याची पिशवी मिरवतांना दिसून आली. अश्विनी म्हणते त्याप्रमाणे नम्र झाल्याशिवाय निसर्गाची खरी ओळख आणि त्याचे कंगोरे दिसत नाहीत हेच खरं!






रूपाली भोळे, proopalee@gmail.com


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

शास्त्रीय नाव: Curculigo Orchiodes, Curculigo ensifolia, Hypoxis orchiodes

Common Name: golden eye grass, xian mao, black musali

कुळ: Hypoxidaece (Star graas family)

मराठी: काळी मुसळी, मुसली कांदा

 

 

#tekadi

 

Saturday, 22 May 2021

घंटांचं झाड

 टेकडी चढताना एका ठिकाणी ’हुंबाचं बेट’ आहे. म्हणजे तिथे हुंबाची (Milliusa tomentosa) पाच-सहा झाडं एकत्र आहेत, म्हणून आम्ही त्या जागेला तसं नाव दिलंय. त्याच्या बाजूने बहावा, खैर, असाणा, करंजही नांदतात. त्यातच एक मुलायम, पोपटी, चमकदार पानांचं झाड आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे मधे टेकडीशी मैत्री केली, त्यावेळी त्या झाडाशी ओळख नव्हती. झाडावर ना फूल होतं, ना फळ. अशा वेळी नम्र होऊन झाडाची ओळख विचारावी. झाड आपल्याला एखादी ओळखीची खूण देतं. तसं ’नम्र’ होऊन आम्ही त्याच्या बुंध्याच्या आसपासची जमीन धुंडाळू लागलो. तर एक सुकलेलं फूल झाडाने आमच्यासाठी ठेवलेलं दिसलं. सुकून तपकिरी रंगाचं झालेलं, सहा पाकळ्यांचं, छोट्या नळीसारख्या देठाचं, अगदी एखाद्या सेंटीमीटर आकाराचं फूल. अजून शोधलं, तर एक सुकलेलं फळही मिळालं. ते दोन भागात उकललेलं, लांबट, घंटेसारखं दिसणारं फळ बघितलं, आणि सुटलंच कोडं. हा ’मोखा’ होता बहुदा. मग घरी जाऊन थोडी शोधाशोध केली आणि त्याची ओळख पक्की केली. 

हुंबाच्या बेटातला मोखा
ओळख पटली, पण आता जास्तच रुखरुख लागली. मोखा, म्हणजे Schrebera swietenioides, हे oleaceae म्हणजे पारिजातक, जाई-जुई-मोगऱ्याच्या कुळातलं झाड. ओलिएसी कुळातली बहुतेक फुलं रात्री फुलणारी आणि सुगंधी. आता फुलांचा बहर सरून गेलेला दिसत होता, म्हणजे फुलं बघण्यासाठी वर्षभर वाट बघावी लागणार. आणि रात्री फुलणारी फुलं असतील तर अजूनच अवघड काम. 

टेकडीवरच्या वर्षभराच्या भ्रमंतीत त्याच्या फळाच्या वाढीचे सगळे टप्पे बघितले. ही फळं हिरवी असताना आणि सुकल्यावरही अगदी वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. हिरवी असतात तेव्हा त्यावर आगदी बारीक बारीक पांढरट उंचवटे दिसतात. पावसाळ्यात अर्धवट सुकलेली फळं खाली पडतात, त्यांना एक विशिष्ट वासही असतो असं दिसलं. 



आम्ही नेहमी हिंडतो, त्या टेकडीच्या उतारावरच्या झाडीत मोख्याची दहा-बारा तरी झाडं आहेत. गंमत म्हणजे, जिथे जिथे मोखा आहे, तिथे तिथे बोंडाराही आहे. जशा सालई-मोई या दोघी बहिणी, तसे मोखा-बोंडारा भाऊ भाऊ अस कुठेसं वाचल्याचं आठवतंय. उंचापुरा, पोपटी पर्णसंभाराचा हा वृक्ष दिसतोही छान. बुंधा सरळसोट वाढतो आणि त्याला जरा उंचीवर फांद्या फुटलेल्या असतात. (हे लाकूड हातमागाच्या दांड्या तयार करण्यासाठी वापरतात, त्यामुळे याला weavers beam tree असंही नाव आहे.) याची संयुक्त पाने वर वर्णन केल्याप्रमाणे मुलायम, पोपटी, चमकदार असतात. संमुख पर्णिकांच्या तीन ते चार जोड्या, टोकाला एक पान आणि पानांची टोकं निमूळती होत लांबलेली. 

    


एप्रिल महिन्यापर्यंत वर्षभर झाडावर लटकणा-या फळांच्या घंटा दोन भागात उकलून आतल्या बिया वाऱ्याबरोबर उडून गेल्या. फळांचा झाडावरचा मुक्काम संपला आणि सगळ्या घंटा गळून पडू लागल्या. एक चक्र पूर्ण झालं. आता नव्या बहराची, फलधारणेची तयारी.




खूप दिवसांपासून मोख्याच्या फुलांची वाट बघत होते. एप्रिल-मे मधे मोखा फुलेल, तो बहर यावर्षी चुकवायचा नव्हता. रात्री फुलणारी फुलं, म्हणजे त्यांचा सुवास अनुभवायचा तर अगदी पहाटे तरी जायला हवं, नाहीतर संध्याकाळी उशीरापर्यंत टेकडीवर थांबायला हवं. एप्रिल महिन्यात रूपालीही काही दिवस गावाला गेलेली. मग एकदा अगदी दिवस सरता सरता एकटीच टेकडीवर गेले. हुंबाचं बेट तसं जवळ आहे. त्यामुळे तिथे गेले. पहाते, तर झाडावर अगदीच थोडी फुलं शिल्लक होती. बहुदा मला काही दिवस उशीर झाला होता. जी होती, तीही उंचावर. अंधारही पडत चालला होता, मग निराशेनेच परतले. मग पुन्हा सकाळी उठून टेकडीच्या DRDO च्या बाजूकडे गेले. बोंडाऱ्याचा बहर आता सरत चालला होता, मोहावर आणि मोईवर फळाचे घोस लटकू लगले होते. मोह, बोंडारा आणि मोईच्या पलिकडे जरा जरा उतारावर एक वेगळाच फुलोरा दिसला. पिवळसर-तपकिरी फुलांनी मोख्याचं झाड डंवरलं होतं! पण मोख्याचं झाड जरा तो-याचंच. याची फुलं आणि त्यांचा सुगंध असा सहजच नाही लाभत. फुलं इतकी उंचावर, की कॅमेऱ्यातही मुश्किलीने पकडता आली. ओंजळीत घेऊन वास वगैरे घ्यायचं तर दूरच. बरोबरच आहे म्हणा, मोखा हा शब्द आला आहे "मोक्षा"वरून.  संस्कृतातल्या याच्या अनेक नावांपैकी एक नाव मोक्ष! मोक्ष असा सहजासहजी थोडीच मिळेल? तपश्चर्या तर करायलाच हवी. नंतरही आम्ही दोघी पहाटे अगदी लवकर गेलो मोख्याची फुलं बघायला. पण सुकून जमिनीवर पडलेल्या चारदोन फुलांपलिकडे काहीच हाती लागलं नाही. त्या चारदोन फुलांनी त्याच्या सुगंधाची कल्पना मात्र दिली. घरी येईपर्यंत हातावर फुलांचा गंध रेंगाळत होता! आता बहुतेक सगळ्या झाडांचा बहर संपत आला आहे. पुढच्या वर्षी तरी ही फुलं जवळून पहायला मिळावीत यासाठी पुढच्या एप्रिलची वाट पहात आहोत. 

- अश्विनी केळकर 




---------------------------------------------

मोखा 

Schrebera swietenioides

(यातील श्रेबेरा हे नाव श्रेबेर या जर्मन वनस्पतीतज्ञाच्या स्मरणार्थ आणि swietenioides म्हणजे स्वीटेनिया महोगनी सारख्या पानांचा)

इतर नावे: घंटापाटली, गोलिध, मुष्क, काष्ठपटोला, मखर, घंटफल, घंटीमार

कुळ: ओलिएसी

---------------------------------------------


Sunday, 16 May 2021

वाटेवरचा परस, शेंडीले कोवळा..

 

वाटेवरचा परस, शेंडीले कोवळा..

_ रूपाली भोळे 

टेकडीवरील माळावर पळस खूप लांबूनच दिसतो. तो फुललेला असला की त्याचं बहरणं आसमंताला प्रज्वलित करतं. काळ्या भुईवर केशरी सडा सांडून, त्यावर हा पिवळसर केशरी वस्त्र लेवून, फांद्यांच्या बाहू उघड्या करून तमाम प्राणी सृष्टीला सामावून घेण्यासाठी ताकदीने उभा, त्याच्या फुललेल्या रुपातून आधार, बलाढ्यता, सोज्वळता पाझरत असते. हाच तो खरा केशरी वस्त्र परिधान केलेला संत महात्मा. हे रूप तुम्ही एकदा पहिलं तर विसरूच शकत नाही. रणरणत्या उन्हातही हसरा, फुललेला, निःस्वार्थी, सतत पक्ष्यांना, प्राण्यांना देण्यासाठी तत्पर असा.


भर थंडीत आपली मोठी सपाट, जाड पानं भुईकडे झेपाऊन देणं हा त्याचा स्वभावाच. पर्णहीन होऊन काही काळानंतर कोवळ्या लवयुक्त डहाळ्यांचे धुमारे फुटू लागतात. वसंताच्या चाहुलीत काळ्या मुलायम कळ्या आकाशाच्या दिशेने तोंड करून फांदीला लगडतात. नभातील मावळतीचे आणि उदयाचे रंग यात अडकून रंगोत्सवाला  सुरुवात होते. काळे मखमली पेल्यासारखे पुष्पकोश आणि केशरी, लाल, नारिंगी रंगाच्या फुलांनी झाड भरून जातं. या पेल्यातील मधूरस पिण्यासाठी भुंगे, खारी, पक्षी यांची धडपड सुरू होते.




पावसाळा लांबला की पळस बहरण्याचं लांबतं असं महाजन सर आपले वृक्ष मध्ये म्हणतात. टेकडीवरील मोठा पळस यावर्षी अजूनही फुलायचा आहे, पण छोटा पळस मात्र नेहमीच्या वेळेतच फुलला आहे.(लेखातील मोठ्या पळसाची छायाचित्रे ही गेल्या वर्षातील आहेत). 

पळसाची पाने मोठी संयुक्त व चामट जाड असतात. पळासाच्या पानाला तीन पर्णिका तर पानाचा देठ अंदाजे दहा ते बारा सेमी लांब आणि जाड मांसल भागाने फांदीला जोडलेला असतो. पळसाच्या पांनापासून पत्रावळ्या करतात. पळसाच्या शेंगा (पळस पापड्या) सुरुवातीला पानांप्रमाणेच भासल्या. पळसाचं शास्त्रीय नाव Butea monosperma शेंगेत एकच बी, म्हणून monosperma, शेंगा वजनाने हलक्या, बीज-प्रसार व्हावा म्हणून वाऱ्यासोबत पसरणाऱ्या. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी टेकडीवर बिया रुजलेल्या दिसून आल्या. बी शेंगेतच रुजताना दिसलं, शेंगेच्या बी असलेल्या भागातून कोंब आणि मूळ फुटलेलं दिसलं. गेल्या महिन्यातील वणवा झेलून त्यातील काही अजूनही तग धरून आहेत.  




फुले पोपटाच्या चोचीसारखी वळलेली, गुच्छ्यात, फांदीला चिटकलेली, पाच ते चाळीस सेमी लांबीची.

पळसाची मुळे, फुले, फांद्या, साल यांचे अनेक औषधी आणि इतर उपयोग आहेत, पण सगळ्यात जास्त भावलं ते स्त्रीचं असलेलं भावनिक नातं. 


पळसाच्या फांद्याना लाख येते, लाखेपासून मणी करून
  मंगळसूत्रात ओवले जातात. रामजन्माच्या वेळी पळस फुलतो म्हणून पळस हा सीतमायचा पुरुष असा उल्लेख गोईण मध्ये आढळतो. पळसाचे झाड रामाचे म्हणून ग्रामीण स्त्री आपल्या नवऱ्याची तक्रार पळसाजवळ करते. तर पिताजी आणि बंधुजी यांची आठवण ती पळसाजवळ काढते आणि मन मोकळं करते.  



वाटेवरचा परस, शेंडीले कोवळा,

लेकी देऊन सोयरा, पिताजी व ss माझा ||

वाटेवरचा परस, शेंडीले पिकला,

लेकी देऊन चुकला, पिताजी व ss माझा ||

वाटेवरचा परस, शेंडीले पिकला,

सखा निष्ठुर मनाचा, बंधुजी व ss माझा ||

 

शास्त्रीय नाव: Butea monosperma, Butea frondosa (Flame of forest),

मराठी नाव: पळस, परस

संस्कृत: पलाश,किंशुक

कुळ : Fabaceae (कडधान्य कुळ)