Saturday, 5 December 2020

बाईलवेडा कवडा आणि शिताबाईचे पोहे

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी।

रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी।

रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे।

अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे।

कोकणावर मनस्वी प्रेम करणा-या कवी माधव काटदरे यांच्या ’हिरवे तळकोकण’ या कवितेतल्या या ओळींच्या अर्थाचं गूढ खूप काळ मनात होतं. कोण ही शिताबाई? तिने कसले पोहे केले? बाईलवेड्या कवड्याने ते कोकणच्या सड्यांवर का भिरकावले? 

कवितेतल्या वर्णनावरून ते कातळसड्यांवरचं एखादं तृणपुष्प असेल इतकी कल्पना आली. मग एकदा लायब्ररीत ना. ग. गोरेंचा ’सीतेचे पोहे’ नावाचा कथासंग्रह पाहाण्यात आला. त्यात याबद्दल काही माहिती मिळाली नाही, पण त्याच्या मुखपृष्ठावर चितारलेलं गवत म्हणजेच ’सीतेचे पोहे’ इ्तकं समजलं. मग त्यावरून अधिक शोध घेतला असता, ’सीतेचे पोहे’ म्हणजेच ’चायनीज लव्हग्रास’ नावाचं, चिमणचा-यासारखं दिसणारं, Poeceae कुळातलं, कोकणातल्या घरी कांडलेल्या पोह्यांसरख्या गुलाबी रंगाची पोह्यांसारखीच चपटी फुलं येणारं एक गवत, हा ही शोध लागला. 

निम्मं कोडं सुटलं. 

आता तो बाईलवेडा कवडा आणि गोड चवीचे पोहे कांडणारी ती शिताबाई या मंडळींचा शोध घेणं आलं. कवडा म्हणजे होला/ पारवा. या पक्ष्याचा आणि शिताबाईचा काय संबंध? तो शोध लागला एका लोककथेत! तर, कवडा जेव्हा माणूस होता तेव्हाची ही गोष्ट- सीता ही कवड्याची लहान बहीण. कवडा एकदा शेतातून घरी आला, त्याला पोहे खावेसे वाटले. आता पोहे करायचे म्हणजे भात कांडण्यापासून तयारी. आळशी बायकोने लक्षच दिलं नाही. सीताबाई मात्र सकाळपासून भावासाठी पोहे करण्याच्या कामाला लागली. तिने तांदूळ निवडले, उनउन पाण्यात भिजवले, भाजले, उखळात घालून कांडले आणि भाऊ शेतातून घरी परतण्याआधी त्याच्यासाठी पोहे तयार करून ठेवले. नणंदबाईचं पारडं जड झालेलं भावजयीला काही सहन होईना. तिने मुठभर खडे त्या पोह्यात गुपचुप मिसळून टाकले. पहिल्याच घासाला खडा लागताक्षणी कवड्याचा पारा असा काही चढला, की तिरीमिरीत त्याने सीतेला लाथ घातली. सीतेने कळवळत खरा प्रकार भावाला सांगितला आणि ती जागीच मरुन गेली. भावाला पश्चात्ताप झाला, पण आता फार उशीर झाला होता. शिताबाईच्या हातच्या त्या गोड पोह्यांची फुलं झाली आणि रानोमाळ पसरली. बाईलवेडा कवडा पक्षी झाला आणि  ’तुझ्या हातचे पोहे गोड गोड गोड, तुला मारणारा मी पोर पोर पोर’ असं ओरडत राहीला. हा कवडा आजही माळावर उतरून ते चविष्ट पोहे टिपत असलेला दिसतो!

तर ही हरदासी कथा सांगायचं कारण म्हणजे, नोव्हेंबरतल्या पहाटे टेकडीवरच्या दंवाने भिजलेल्या गवतातून हिंडताना एकदोन ठिकाणीच हे सीतेचे पोहेही दिसले. अगदी जमिनीलगत वाढणारं हे गवत आहे. टेकडीवरच्या कमरेइतक्या उंच वाढणा-या गवतात ते कळूनही येत नाही. बाणाच्या शेपटीसारख्या रचनेची, पण टोकाकडे निमुळती होत जाणारी याची गुलाबीसर रंगाची फुलं थेट पेणच्या पोह्यांसारखी दिसतात. ही पोस्ट टाकण्याआधी याचे जरा बरे फोटो घ्यावेत म्हणुन एकदोन दिवसांपूर्वी टेकडीवर माळावरच्या गवतातून याला शोध शोध शोधलं, पण कवड्यानं टेकडीवरचे सगळे पोहे संपवले असावेत.


याचं वनस्पतीशास्त्रीय नाव Eragrostis unioloides. यातला Eragrostis हा शब्द Eros (Love) आणि agrostis (grass) यापासून बनला आहे. Eragrostis म्हणजे lovegrass आणि Unioloides म्हणजे Uniola किंवा sea oats या गवताच्या एका गटाशी नातं सांगणारं. Uniola या गटात सीतेच्या पोह्यांसारखीच फुलं येणारी अनेक प्रकारची गवतं येतात. आणि त्यातल्या काही जाती अगदी पौष्टीक खाद्य म्हणून वापरल्या जातात

आता lovegrass हे नाव का दिलं गेलं हा एक प्रश्न अजून आहेच. सीतेच्या पोह्याच्या गोष्टीत बहिणीचं प्रेम आहे. lovegrass च्या गोष्टीत कोणाचं प्रेम आहे देव जाणे!

–----–---------------––------------------------------------

–------------------------------------------------------------

ही पोस्ट टाकली आणि एका मित्राने lovegrass या नावामागाची गोष्ट सांगणारा एक ब्लॉग शेअर केला:

https://www.anniesannuals.com/signs/d%20-%20g/eragrostis_spectabilis.htm

" It has been called “lovegrass” since the Middle Ages. The story goes that it was named that because of the tendency of its flower panicles to catch in ladies’ long dresses and petticoats as they walked through pastures. Once caught, the panicles would slowly creep upward as they walk, tickling their legs." 😅😅😅

#tekdi






Saturday, 21 November 2020

गवतातली प्रेम-प्रकरणं

 

गवतातली प्रेम-प्रकरणं

-रूपाली भोळे

मले कयत नही, पाऊस असा कव्हाबी काभ्र येतो! कव्हाबी येनाऱ्या पावसानं किदर आनलाय. पाह्यजे तव्हा टेकाडावर वऱ्हे जाताच येत नही. गाऱ्यात पाय भरता, आनं घरी आलं की सगळं घरदार चिकचिकचिकचिक.

तुम्ही म्हनसान माह्या भाषेले काय झालं? झालंस नं तसंच. टेकाडावर सर्वीकडे गवतच गवत. आनं पक्षीच पक्षी. त्या गवताच्या थायन्यात बाभूय, आपटा, टेम्भूरणं, बोरं, खैर, गुपचुप उभे. आनं त्याह्यच्या खांद्यायवर हा बाजार भरेल, गवताच्या धांड्यात आम्ही दोघी वारा-वाधनासारख्या उंडारत असतो. सोबत ह्ये पाखरं. दाना टिपत भूर्रदिशी यायभरी अढीतढी करत असता. कोन्हाच्या चोचीत गवताचं पातं, तर कोन्हाच्या दाना. त्याह्यच्या चोचीतून गवतच आमचा इठोबा आसं ऐकू यायले लागतं. पाहटे पाहटे हा बाजार भरतो. बाजार कोन्हाचा? तं चिमन्यांसारखाच पक्षी की वं माय. पावसायात त्याह्यच्यातल्या काहींचं डोकं पिवळंधम्मक दिसू राह्यलं. त्याह्यचा खोपा पाहला, आनं माही भाषाच बदलली.



काट्यायच्या झाडा-झुडुपांले हे खोपे टांगेल होते. हे खोपे पाहिसन तढून निंघूच वाटेना. जरासाबी वारा आला की गवताचे धांडे डोलत, आनं मंग हे खोपेबी. आख्खा मया डोले. आमचं बी मन एवढंएवढं हुईसन डोल्याले लागतं.

डांग हाले डांग हाले
नजर नही ठहरे जी
झाली आता झाली आता
धरती खाले वऱ्हे जी




तं तो पिव्व्या डोक्याचा सुग्रणीचा नर खरं तं काया तोंडाचा. पण डोकं विणीच्या हंगामात पिवळंधम्म. कोवळ्या उन्हात हिरव्या बॅकग्राउंडला लग्नकार्यात एखाद्या देखण्या उंच वस्त्र परिधान केलेल्या तरूणासारखा माळावर चमचमत असतो. माळातले घटबोर, खैर, बाभूळ, आपटा हे मालकांगुणी, पिळुक, गुळवेल, रानद्राक्ष ह्या वेलींसोबत उभे. आणि ह्या झाडांवर पिवळ्या डोक्याची नुसती गडबडगडबड. पावसाळा सुरु झाला की लगीनघाई सुरू. सुगरण पक्षिणी मात्र चिमणीसारखी, पिंगट, राखाडी. आंगावर पंखांच्या रेघारेघा.


सुगरण पक्ष्याचं आयुष्य गवतामुळे फुलतं. गवत हे त्यांच्या अधिवासाला, अन्नाला आवश्यक आहे. गवताचं बी, गवततील किटक, फुलपाखरं, छोटे बेडूक हे त्यांचं अन्न. पावसाळ्याच्या तोंडाशी गवत उभरून आल्यावर मध्येच एखादा नर छोट्या, बळकट, टोकदार चोचीत गवताची पाती घेऊन उडताना दिसून आला. शिंदीच्या झाडांवरी त्यांचा वावर लक्षात आला. लांबचलांब गवताची पाती घेऊन त्याच्या पट्ट्या करून विणणे, हे कौशल्याचे काम.




सुगरणीचं (Baya Weaver) शास्त्रिय नाव – Ploceus philippinus.

Ploceus म्हणजे ग्रीक भाषेत विणकर. हा नर आपलं पूर्ण कसब घरटं विणण्यात लावतो. घरट्याची जागा साप, सरडे, इत्यादी भक्षक पोचू शकणार नाही, अशा पद्धतीने निवडली जाते. मिलन हे एकमेक उद्दिष्ट ठेऊन नर काम करत राहतो. घरटं मादीला पसंत पडलं पाहिजे याचा तो पुरेपुर प्रयत्न करतो. दिवसाकाठी गवतात शेकडो फेऱ्या मारल्या जातात. टाके घालायला वेगळं गवत, घरट्याच्या भिंती साठी वेगळं, पाऊस, वारा, ऊन, भक्षक  यापासून संरक्षण व्हावे म्हणून केलेली सुबक रचना, गवतापासून बनलेलं हलक घरट वाऱ्याने पडू नये म्हणून आतून मातीचा गिलावा, सगळं कसं शाश्वत.



हे काम घरट्याच्या मानेपर्यंत आल्यानंतर माद्यांचा थवा येतो. या बया घरट्यावरून बुवाची (नराची) निवड करतात. निवड झाल्यावर आतील भाग मादी निटनेटका करते. घरट्याला आतून मातीचा गिलावा करते.

एकदा का मादी अंडी देऊन उबवायला बसली, की हा Casanova नर, दुसरी मादी शोधायला मोकळा. परत बंगला आणि बया .. किंवा कधी कधी दुसऱ्याच्या घरट्यातही बस्तान बसविले जाते. एकच नर तीन-चार मांद्यांबरोबर जोड्या जमवतो, असे वाचनात आले. मादी मात्र पिल्लासनसोबत असते.  

टेकडीवरील निरिक्षणात असंही दिसून आलं, की सगळी घरटी पूर्वेकडे तोंड करून आहेत. हिवाळ्यात सुर्याची कोवळी किरणं घरट्यापर्यंत पोहचत असावी आणि परतीच्या पावसापासून संरक्षण मिळत असावं. घरट्यासाठी काटेरी वनस्पती निवडल्याचं दिसून आलं. सुगरण पक्षी समाजप्रिय दिसला. झाडांवर घरट्यांच्या वसाहती दिसल्या.

प्राग ऐतिहासिक काळात मानवाने याच पक्षाच्या कौशल्याचा अभ्यास करून चटया, टोपल्या, कापड अशा पद्धतीच्या विणकामाचे कौशल्य मिळवले असेल का? सुतार, शिंपी, खाटीक इत्यादि पक्षांची नावेही असंच काहीसं सुचवितात का?

अशा पद्धतीने टेकडी नेहमीच इतिहासात घेऊन जाते. मुळं शोधायला भाग पाडते. निमित्त जरी सुगरणीच्या गुलछबू नराचं आणि गवताच्या ईवल्याशा पात्याचं असलं तरी मानवेतिहासाचं हे विश्वरूपदर्शन चकित करणारं असतं.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

Photo Credit: Milind Deshpande

Saturday, 7 November 2020

प्राशन करिता रंग जगाचे.....

 प्राशन करिता रंग जगाचे.....

-रूपाली भोळे

शब्द आता संपत येतात आणि टेकडीची नशा चढू लागते. हे सगळं पहाटेच्या निळसर काळ्या रंगात सुरू होतं. आमची पावलं हव्या त्या दिशेला वळू लागतात. गवतातील दगड धोंडयात अडकून घसरू लागतात. घरातील कामांचे व्याप, स्वयंपाक पाणी धाब्यावर बसवून आम्ही हव्या त्या दिशेला उंडारत असतो. आमचं उंडारण आमच्या हातात नसतं. आम्ही वेगळ्या विश्वात प्रवेश करीत असतो.

सध्या तर शरदाच कोवळे ऊन आमचा जाम ओतप्रोत भरत असतं. डोंगरामागून येऊन उर्जेचा संचय हळुवार पाने पसरविणारा तो सोन्याचा गोळा या मैफिलीत साकीच्या भूमिकेतून चैतन्य ओतत असतो. पक्षांचा किलबिलाट जराही बेसुर न होता अगदी तालात ऐकू येतो.


समोरच्या निष्पर्ण झाडावर निलपंखाने (Indian Roller) आपल्या चाकाकणाऱ्या रंगाने आणि देखण्या पर्सनॅलिटीने इतरांचे लक्ष वेधून घेतले. इतरांची इजाजत घेऊन त्याने आपली जागा निश्चित केली. मान किंचितशी तिरकी करून माझ्याकडे एका डोळ्याने कटाक्ष टाकला. मी आपलं याच महफिलीततील आहे असं काहीसं भासवून हळूच कॅमेऱ्याने चीयर्स केलं. निलपंख, कोतवाल, रांगेत बसलेले राघू, छोटी पाखरं, आकाशातील पाकोळया यांचा जोरदार कार्यक्रम आसमंतात ऐकू येत होता. मध्येच चकण्यासाठी गवतात झेपवून किडे मटकावत होती.

निलपंख (Indian Roller)
कवडा झुडूपी गप्पीदास (Pied Bush Chat)
धानचिमणी












दोन धान चिमण्यांनी लपूनच घाबरून आमच्या सोबत यायचा प्रयत्न केला. आम्हाला चीयर्स करावं की नाही हे त्यांना कळेना. मध्येच गवतात मध्येच पायवाटेवर असा लपंडाव त्यांनी चालू केला. हळूच काळ्याभोर दगडा आडून एक कटाक्ष टाकून त्या बडबड करीत गवतात पसार झाल्या.

सगळ्यात जास्त लगबग गवतात होती. गवताच्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, छोटी झुडुपे उदा तेंडु, बाभळी, हेनकळ, खैर हे मुलाकांत का अड्डा बनलेल्या होत्या. इतके दिवस आम्ही हे गवत तुडवून पलीकडील वृक्षराईकडे पोचायचो. पण ही वर्दळ गवतामुळे सुरू झालीय. गवताचे रंग, त्यांची फुलं, त्यांच्यामुळे तयार झालेली अन्न साखळी, गवतांचा एकत्रितपणा, या सगळ्या गोष्टींनी थांबायला आम्हाला भाग पाडलं. गवताळ परिसर आता अनेक कोळी, किटक, चतुर, फुलपाखरे, पक्षी यांनी गजबजून एक वेगळाच ध्वनी निर्माण करतोय.

Lime Butterfly
Blue Pansy
Dragonfly



या सौंदर्यापलिकडे गवत अजुनही काही सांगू पाहत होतं. टेकडी पूर्णपणे शहरीकरणाने वेढली आहे. पण पूर्वी काय असेल इथे? शेती? आणि त्याच्या आधी? आणि त्याच्याही आधी? मी क्षणभर विसावले. शांत झाले. रोज तुडवत जाणाऱ्या गवताकडे निरखून बघू लागले.
खोटा माका (Caesulie axillaris)


खरं तर मानवी युगात शेतीच्या सुरुवातीला गवतच कारणीभूत. शिकार करणाऱ्या आणि कंदमुळं खाणाऱ्या मानवाला सततच्या भटकंतीमुळे मेंदूच्या शक्तीच्या जोरावर निसर्गातील गुपितांची उकल होऊ लागली. त्याने ज्याच्या बिया खाता येतिल असे काही गवतांचे प्रकार ओळखले. त्याच्या वाढीचं आणि हंगामाचं चक्र अभ्यासलं. जमिन साफसूफ करून चांगलं पोषक बी पेरलं आणि त्याच्या शेतीला सुरूवात झाली आणि धान्य निर्मितीलाही. शेती मुळे मानवाच्या वसाहती निर्माण झाल्या. मानव स्थिरावला. खरतर गवत नसतं तर मानवी संस्कृतीही निर्माण झाल्या नसत्या.


अजूनही रानगहू, रानबाजरी, रानमका, इत्यादी गवतांचे प्रकार सापडतात. ते आपल्या या धान्यांचे पूर्वज. जवळपास जगातील सगळ्यांचे अन्न गवतावर अवलंबून आहे. उदा., सकाळी चहात घालायला साखर उस नावाच्या गवतापासून मिळते, तर भाकरी, पोळी, भात हे पदार्थही याच गवतापासून. मांसाहारासाठी लागणाऱ्या प्राण्यांचे अन्नही गवतच. खरं तर माणसाच्या जास्तीत जास्त गरजा गवतांचे वेगवेगळे प्रकारच भागवत असतात.

टेकडीवरील माळरानावर गवताच्या अंदाजे पंधरा जाती दिसून आल्या. गुरांपासून, माणसांपासून संरक्षण मिळण्यासाठी फुले आल्यानंतर काटेसदृश्य तंतू दिसून आले. अनेक किटक, पक्षी, कोळी, फुलपाखरे यांचा भरघोस सहभाग गवतात जाणवला. एक काही स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षी आजुबाजूच्या झाडांवर स्थिरावलेले दिसले. गवत त्याच्यासोबतच अध्येमध्ये टाकळा, दिपमाळ, रानतूर, रानतिळ, दुध्या, आग्या, गोधडी, तरवड, तिळवण अशा अनेक वनस्पतींना घेऊन आहे. जमिनीलगत वाढणारी ते माणूस लपू शकेल एवढ्या उंचीची गवतं परिसरात आढळली. खवले वाली मुनियासारखे छोटे पक्षी त्यांची पिल्लं घेऊन काही विशिष्ट गवताचे दाणे टिपताना दिसून आल्या.

गवती तिळवण (Cleome simplicifolia) 
पाणलवंग (Ludwigia hyssopifolia)
सोनटिकली (Pulicaria wightiana)

गवतातील काही ठिकाणी असलेली पाण्यांची डबकी ही सुद्धा या परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग जाणवला, डबक्याजवळ पाणलवंग, खोटा माका आणि काही वैशिष्टयपूर्ण गवत दिसून आली, पाण्याच्या पृष्ठभागावर निवळी ही आपले काम करताना दिसून आली, आणि काठावर काही पक्षीही ठाण मांडून बसलेले दिसले.
गवतामुळे आजूबाजूला एक सुदृढ परिसंस्था निर्माण झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
गवतांची रचना फार नजाकतीने केलेली जाणवते. गवताला खालून फुटवे फुटलेले दिसले. वरील पाने गुरांनी, माणसांनी नष्ट केल्यावरही बुंध्यांपासून फुटत गवत वाढलेले दिसले. गवतांबद्दल लिखाण, माहिती, स्थानिक नावे यांविषयी फारशी माहिती सहज मिळाली नाही.


एरवी साहित्यात गवताचं ‘इवलसे’ असं वर्णन केलं जाते किंवा ‘गवतपात्यासारखे क्षुल्लक’ असं म्हणून हिणवलं जातं. पण गवताची ही महती पाहिली की गवत या केवळ इतिहासच नाही तर भूगोल, सर्व मानव्यशास्त्रं, सर्व विज्ञानं, सर्व तंत्रज्ञानं घडवणाऱ्या वनस्पती आहेत, असं मात्र नक्कीच म्हणावं लागेल.

रूपाली भोळे, proopalee@gmail.com

--------------------------------------------------------------------------
वर उल्लेखलेल्या अनेक वनस्पती आणि पक्षी ओळखायला नेहमीप्रमाणेच वनस्पतीतज्ज्ञ मित्र मंदार दातार आणि लेखक मित्र हिमांशु स्मार्त यांनी मदत केली.

Saturday, 31 October 2020

दिवे लागले रे दिवे लागले - तमाच्या तळाशी दिवे लागले

लॉकडाऊनच्या काळात आपल्या जगातले सगळे व्यवहार थंडावले होते, निराशेचं मळभ दाटलं होतं. पुन्हा सगळं पाहिल्यासारखं कधी होणार ते कळत नव्हतं. टेकडीवरचं जीवनचक्र मात्र त्याच्या स्वतःच्याच गतीनं अव्याहत चालू होतं. फुलं फुलत होती, मिटत होती, बीज जमिनीत मिसळत होतं, नवी हिरवाई जन्म घेत होती आणि तिच्या बरोबरीने पक्षी, फुलपाखरं, किडे, जीव-जिवाणूही. त्या काळात टेकडी फिरून आलं की दिल कसं गार्डन गार्डन होऊन जात असे! ते दिवस मागे पडले, पावसाळाही संपला. पावसाळा सरून थंडी सुरु होताना घरी आलेल्या कोरोनामुळे पुन्हा पंधरावीस दिवस घरात बंदिवान व्हावं लागलं. ते नकोनकोसे दिवस संपल्यावर एका भल्या पहाटे शुक्राची चांदणी बघत बघत टेकडी गाठली. 

आssहा!! वीस दिवसात टेकडी किती बदलली होती!. माळावरच्या गवताचा रंग बदलला होता, कमरेइतकता वाढलेल्या गवतातून चालताना दहिवरामुळे कपडे ओलेचिप्प होत होते. प्रत्येक पावलाबरोबर खंडोबाचे घोडे, टाचण्या, नाकतोडे, फुलपाखरं टणाटणा उड्या मारत होते. पाऊस थांबून आठवडा उलटला, तरी अजून कुठेकुठे पाणथळ जागा शिल्लक होत्या, ओहोळ वाहात होते. आम्ही त्यादिवशी एका ओहोळाच्या कडेकडेने झाडीत खोलवर घुसलो. ओळखीच्या आणि अनोळखी झाडावेलींबरोबर ओहोळाच्या पाण्याचा नाजूक खळखळाट, पाखरांची किलबिल आणि झाडीतला गारवा अनुभवणं हे इतकं सुखद होतं की डोळ्यात पाणीच येऊ लागलं. तरवड पिवळेधमक फुलले होते, पंधरवड्यापूर्वी पाहिलेलया जांभळ्या कोरांटीला बी धरलं होतं, बीजाच्या पिवळ्या फुलांची जागा गोल चपट्या बियांनी घेतली होती, कहांडळाची जुनी साल निघून आतलं तजेलदार हिरव्या रंगाचं खोड दिसू लागलं होतं. वारसावर नवी पालवी दिसू लागली होती. बराच वेळ तिथे उगीचच रेंगाळून झाडीतून बाहेर पडलो.

तरवड
 
कहांडळ


बीजाची गोल चपटी फळे








परतीच्या वाटेवर एका भागात खूपसा राडारोडा टाकलेला आहे. बहुदा तो एखाद्या रस्त्याचं काम करताना निघालेला आहे. त्या बाजूला तारेचं कुंपण असल्याने आम्ही तिकडे कधी गेलो नव्हतो. आणि तिकडे कधी लक्षही गेलं नव्हतं . रुपालीला त्या बाजूला काहीतरी खास दिसलं होतं. तिने त्या राड्यारोड्यात फुललेल्या केशरी फुलांच्या असंख्य दीपमाळांकडे लक्ष वेधलं. दगडधोंडे आणि तारेचं कुंपण ओलांडत आम्ही तिथे पोचलो. तेवढ्याच थोड्याशा भागात या दीपमाळा Leonotis nepetifolia फुललेल्या आहेत. ळाकडच्या बाजूस हिरव्यागार, त्रिकोणाकृती आणि दंतूर कडांचा पर्णसंभार, त्यातून सात आठ फूट उंच वाढलेलं चौकोनी खोड आणि त्यावर थोड्या थोड्या अंतरावर खोडाला वेढून असणारी, समईच्या केशरी ज्योतींची आठवण करून देणारी कळ्या-फुलांची मंडलं! किती देखणं रूप! Leonotis nepetifolia: Leon-otis म्हणजे सिंहाच्या कानासारखी (फुलं येणारं ) आणि nepetifolia म्हणजे Nepeta या युरोपात आढळणाऱ्या वनस्पतीसारखी पानं (foliage) असणारं. कळ्यांच्या काटेरी मंडलांमधून तेजस्वी केशरी रंगाची, मऊ लव असणारी नलिकाकार फुलं डोकावतात. ही फुलं सिंहाच्या कानासारखी दिसतात, म्हणून हे Leonotis. पुदिना/ तुळशीच्या Lamiaceae कुळातली ही वर्षायु वनस्पती मूळची आफ्रिकेतून आलेली असली तरी आता ती जगभर पोचलेली आहे. टेकडीवर इतर भागात आम्हाला ती अजूनतरी कुठे दिसलेली नाही. मग या राडारोड्यातून हिचं बी आलं असेल का? पुढच्या वर्षी या दीपमाळा सगळी टेकडी व्यापतील का? माहिती नाही.



त्यादिवशी बराच उशीर झालेला होता म्हणून तिथे फार वेळ थांबलो नाही.

दुसरे दिवशी टेकडीवरच्या गवताच्या प्रकारांची ओळख करून घ्यावी म्हणून झाडीत न जाता माळावरच गवतातून हिंडत होतो. लांबून परत दीपमाळा दिसल्या आणि राहवलं नाही. ओलं गवत तुडवत पुन्हा तिथे गेले. चार पिटकुले पक्षी दीपमाळेवरून भुर्र्कन उडून गेले. मी बहुदा त्यांच्या मधुरसपानात व्यत्यय आणला होता. मी एका दगडावर शांत बसून राहिले. मग तिथल्या छोट्या छोट्या हालचाली जाणवू लागल्या. बारीकसे आवाजही लक्षात येऊ लागले. समोर पुरुषभर वाढलेल्या गवतावर बी धरलं होतं. हे जसे आपले सुगीचे दिवस, तसेच पाखरांचेही सुगीचेच दिवस की. मुनिया, वटवट्या आणि आणखीही कितीतरी अनोळखी चिन्न्याभिन्न्या पाखरांची हालचाल गवतात जाणवू लागली. झुलणाऱ्या गवतावर बसून त्यांचं माना वेळावत, एकेक दाणा टिपणं चालू होतं. दाणे टिपणं आणि कुलकुलत बोलणं यातुन अगदी उसंत मिळत नव्हती त्यांना. दीपमाळेच्या काटेरी मंडलांमध्ये मधमाशांची ये जा चालू होती. निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या केशरी ज्योतींवरून नजर हटत नव्हती. मधेच एखादं फुलपाखरु भिरभिरत जात होतं. माझ्या जवळच एक मोराचं पीस पडलेलं दिसलं. पण ते घेऊन पिशवीत टाकावंसं वाटेना. ते तिथून हलवायला नको. या चित्रातलं काहीच हलवायला नको. इथलं इतक्या सगळ्या प्रकारचं गवत, झाडं झुडुपं, वेली, ओहोळ, त्यावर अवलंबून असणारे सगळे जीव - या साखळीतला प्रत्येक दुवा महत्वचा आहे. त्या प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. त्या साखळीतला कोणताही दुवा कधीही निखळता कामा नये. सकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हात न्हालेल्या त्या चैतन्यमय परिसराचा मी ही एक भाग होऊन गेले. दीपमाळेच्या केशरी ज्योतीतुन एक रसरशीत, जिवंत, प्रवाही, चैतन्यमय अशी काहीतरी जाणीव जणू आत आत पाझरत होती. आतला अंधार उजळून टाकत होती. नवल वर्तले गे माये। उजळला प्रकाशु। मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु॥




मागे वळून पाहिलं, तर रुपालीही एका दगळावर अशीच पुतळा होऊन बसलेली दिसली. म्हणाली, इथून जावंसंच वाटत नाहीये. पुन्हा वेळ काढून येऊ असं म्हणत ती चैतन्यमय रानभूल आत साठवत आम्ही हलकेच परत फिरलो.  

- अश्विनी केळकर 



Sunday, 25 October 2020

काटंकिंजाळ केकताड

 

"काटंकिंजाळ केकताडाचा ह्यो पांढराफेक वाख कसा हुतो गं आये ?"

"बाळा, पाण्याच्या पोटात केकताडाची आग थंड हुती नि त्येचाच रेसमागत मऊलूस वाख हुतो." काट्यावरची पोटं' या उत्तम बंडू तुपे यांच्या आत्मचरित्रात त्यांची आई त्यांना काटेरी केकताडाच्या पोटातल्या रेशमी मायेबद्दल सांगते. केकताड, म्हणजेच घायपातापासून वाख बनण्याचा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय. या वाखापासून दोरखंड बनवला जाई. घायपाताची पानं डोहाच्या पाण्यात दहा-बारा दिवस भिजत ठेवायची, त्यापासून वाख काढायचा आणि त्याचा दोरखंड वळायचा. घायपातापासून दोरखंड करण्यासाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत घायपात मुद्दाम लावला जात असे. दोरखंडाला बरेच पर्याय उपलब्ध झाल्यानेही असेल बहुदा, पण हल्ली मात्र याची मुद्दाम लागवड केली जात नाही. पण शेताच्या बांधांवरून हा बरेच ठिकाणी वाढलेला दिसतो.


टेकडीवरही तुरळक काही ठिकाणी घायपात आहेत. बांधांवरून आहेत, मुद्दाम लावलेले असावेत.

घायपात! नावातच घातपाताचा संशय, शिवाय एकंदरीत नूरही नामांकितच. थेट जमिनीतून वर येऊन झुपक्यात वाढलेली, एक दीड मीटर लांब, रुक्ष हिरव्या रंगाची  मांसल पाने. त्यांच्या दोन्ही कडांवर आणि टोकाला बारीक, अणकुचीदार, पिवळसर काट्यांचा कडक पहारा. पुन्हा, एक रोप लावलं की यांच्या मुळांपासून निघणारे फुटवे एकाशेजारी एक वाढत, आपल्या काटेरी तलवारी परजत उभ्या असणाऱ्या सैन्याची पलटणच तयार करणार. काय बिशाद की कोणी याच्या वाटेस जाईल!

टेकडीच्या एका भागात ग्लिरिसिडियाचं एकसुरी जंगल आहे. तिथे फक्त ग्लिरिसिडियाच आहे. अगदीच कुठेतरी दोनपाच इतर झाडे आहेत. तिथे गेलं की ग्लिरिसिडियाचा उग्र गंध सतत जाणवत राहातो. पावसाळी दिवसात तो गंध, तिथली अंधारी सावली आणि थंड हवा हे सगळे मिळून एक विचित्र, गूढ वातावरण तयार होतं. या जंगलात इतर झाडं नसली, तरी इथे एक लांबचलांब घायपाताचा पट्टा मात्र पसरलेला आहे. घायपाताच्या काटेरी तलवारींचं सैन्य मुळांचे फुटवे फुटत फुटत आडवंतिडवं पसरलेलं आहे.

तसा हा घायपात मूळचा मेक्सिकोमधला. पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी त्याला इथे आणला. तिकडे यांच्या ब्लु अगेव या प्रजातीपासून अगेव सिरप तयार करतात. तो गोड रस मधाला पर्याय म्हणून वापरला जातो. आपल्याकडे जरी घायपाताचा असा काही उपयोग करीत असल्याचे ऐकिवात नसले, तरी यांच्या उग्र, रुक्ष बाह्यरूपाच्या आत मधाचा गोडवा असणार नक्कीच. आयुष्यभर असा सर्वांशी फटकून राहाणारा घायपात आयुष्याच्या अखेरीच्या दिवसात जरासा मवाळतो. म्हणजे पानांचा काटेरी आवेश तोच असतो, पण आतली कधी दिसलेली कोवळीक जागी होते. त्याच्या पानांच्या वर्तुळामधून फुलोऱ्याचा दांडा वर येऊ लागतो आणि उंचच उंच वाढू लागतो. दांड्यांच्या वरच्या टोकाकडच्या बाजूला आडवे फांदोरे फुटून त्यावर आभाळाकडे तोंड केलेल्या हिरव्या कळ्यांचे घोस दिसू लागतात आणि तो असा एकदम मायाळू, कुटुंबवत्सलच बनून जातो. गेले सात आठ महिने आम्ही टेकडीवरच्या दोन घायपातांवर असे फुलोऱ्याचे पंधरा-वीस फूट उंच दांडे पाहात आहोत. साधारण जुलै महिन्यात त्यातून पिवळ्या रंगाची फुलं डोकावू लागली आणि त्यावर बुलबुल, सनबर्डस आणि किडे-मधमाशांची झुंबड उडू लागली. यथावकाश ही फुलंही गळाली. मध्ये काही काळ टेकडीवर जाणं झालं नाही. जेव्हा गेलो, तेव्हा त्या फुलांच्या जागी घायपाताच्या  कटिखांद्यावर छोटीछोटी बाळं जन्मलेली!!


घायपाताच्या बिया झाडावरच रुजतात आणि वाढतात. ही बाळं पुरेशी मोठी झाली की तहानलाडू भूकलाडूची शिदोरी बांधून देऊन घायपात त्यांचं बोट सोडतो आणि ती त्या उंच मनोऱ्याच्या महालातून जमिनीवर येऊन रुजू लागतात. मुख्य घायपाताची भूमिका आता संपलेली असते. फुलोऱ्याचा दांडा वाळून जातो आणि त्याबरोबर घायपातही.

- अश्विनी केळकर

----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.----------------------------------------

घायपात: Agave sisalana

Family: Asparagaceae

उपयोग: वर दिल्याप्रमाणे वाख बनवण्यासाठी. शिवाय याच्या फुलांची भाजीही करतात. भाजी करताना फुले वाफवून, तीन चारदा पाण्याने धुवून मगच वापरतात. शेताच्या बांधावर लावलेला घायपात वणवा पसरू देत नाही अशेही एक माहिती समजली.